निघताना भिंती, खिडक्या, पडद्यावरून पुन्हा पुन्हा हात फिरत राहतो. प्रत्येक वेळी घर बदलताना माझी अवस्था केविलवाणी होते. दोन किलो वजन कमी होते हो दोन दिवसात डाएट न करता…वाटतं एखादा वानप्रस्थाश्रम उभारावा. एक किलो तांदूळ आणि अर्धा किलो तूप पुरे की आपल्याला. कित्येक दिवसांची चिंता मिटली.चैन म्हणून वरण-भात-तूप-लिंबूची मेजवानी अधूनमधून. एक साडी, पाच पन्नास पुस्तके याशिवाय माझ्या गरजाच काय आहेत? पण शेवटी बाईची जात हो..! हजार पुस्तके ग्रंथालयात दिली तरी पाचशे तरी जवळ ठेवावीशी वाटतातच. अहो, टोचत असली तरी सुईत सुध्दा जीव अडकतो बाईचा. कितीही देवून टाकू म्हणून बाजूला काढल्या तरी चारेक बाॅक्स होतातच साड्यांची. तरी बरं हक्काचं घर नाही. वर्षा-दोन वर्षांत उचलबांगडी होते. तेव्हा वाटतं बरं का, "हे काही खरं नाही. एक घर हवंच हो आपल्याला.. घर हवं पण स्वकष्टार्जित हवं. तरच घरात रहायला मजा, नाही का..?आणि मग मनसोक्त स्वतःवरच हसत सुटते मी..काहीच काम-धाम न करता घर काय आभाळातून पडेल काय? स्वतःलाच विचारते. विचाराधीन होते. या परिघात राहून मी काय करू शकते बरं? आणि मला आठवतो बागबान मधील अमिताभ. त्याच्या सारखं चरित्र लिहिता आलं तर..?काय धमाल येईल नाही..? पत्नीची ताटातूट एवढीच त्याची समस्या.. आम्हा बायकांपुढे मात्र नित्य नूतन प्रश्न उभे..जबाबदारी झटकता येत नाही आणि परिघ ओलांडता येत नाही. स्वतःभोवती फिरत रहाण्याचं कौशल्य अवगत आहे ना आम्हाला..कर्तृत्वाहून कर्तव्याचं पारडं नेहमीच जड. पण आता डोईजड होतय हो. अखेरचे काही क्षण तरी मनाजोगते जगता यावेत बुवा..
पहाटे पुस्तकाबरोबर आयता वाफाळता चहा हाती आलाय..समाजव्यवस्था सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो? यावर नवरा आपल्याशी चर्चा करतोय.. आई मी बाहेर चाललोय. नवीन कोणतं पुस्तक आणू तुला? मुलगा आत्मियतेने विचारतोय. राधाची काळजी करू नकोस. मी सांभाळीन तिला.. तुझं तू लिही गं.. लेक कळकळीने सांगतेय. आई बसा हो निवांत. चालू द्या तुमच्या गप्पा. तुमचे साहित्यिक सगेसोयरे जमलेत. मी सांभाळेन सगळं व्यवस्थित...सुनबाई मोठ्या प्रेमाने बोलतेय. विश्वविख्यात प्रकाशक साहित्यकृती मिळविण्यासाठी धडपडताहेत. "आता असे अपेक्षा मोठ्या पराक्रमाची" म्हणत आई-बाबा कवितेतून आशिष देताहेत. आणि मी माझ्या : "हदयस्थ भगवंताची आराधना करते आहे..!!" दिवसा उजेडी अशी डोळस स्वप्ने पहायला काय हरकत आहे नाही का..? कदाचित पुढे ही स्वप्ने पूर्ण होतीलही.. हो ना..? असा एखादा वानप्रस्थ हवाय बुवा आम्हा बायकांना..."गुंतूनी गुंत्यात साऱ्या, पाय मोकळा ठेवणारा !!"
-विजया पाटील, कराड
0 टिप्पण्या