Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

अंधकवी चंद्रकांत देशमुखे (बाबूजी)

अंधकवी चंद्रकांत देशमुखे (बाबूजी) कविता व लेख | Vijaya Patil Karad

अंधकवी चंद्रकांत देशमुखे अर्थात बाबूजींचे अचानक जाणे मनाला चटका लावून गेले...

खरंच असा माणूस होणे नाही. बाबूजी म्हणजे स्वावलंबी, स्वाभिमानी आणि स्वयंप्रकाशी व्यक्त्तीमत्व, साधी रहाणी तरीही उच्च विचारांची देणगी लाभलेले प्रतिभाशाली बाबूजी.
    बाबूजी पहिल्यांदा भेटले ते मायणीच्या साहित्य संमेलनात. माझ्याबरोबर बहीण आणि तिच्या सासूबाई होत्या. बाबूजींच्या कविता ऐकून आम्ही मंत्रमुग्ध झालो आणि माहुलीला बहिणीच्या घरी घेऊन आलो आणि दोन-तीन तास मनसोक्त कविता ऐकल्या. मग अनेक संमेलनातून भेटत राहिलो.
    कुठेही संमेलन असो बाबूजी फोन करून आग्रहाचे निमंत्रण देत. आमच्या जागृतीच्या प्रत्येक साहित्य संमेलनास तर बाबूजी आवर्जून उपस्थित असायचे. कवीसंमेलनात सहभागी व्हायचे. कधी संमेलनाच्या अध्यक्षपदी, कधी प्रमुख अतिथी तर कधी परीक्षक असायचे. आम्हाला फार कौतुक वाटायचे. एक दोन कवी मित्रांना बरोबर घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेआधी पोहोचायचे. बाबूजींना जागृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला तेव्हा तर बाबूजींना अतीव आनंद झाला.
    बाबूजींचा उत्साह तर वाखाणण्याजोगा होता. स्पष्ट, शुध्द उच्चार, खडा आवाज ही बाबूजींची ठळक वैशिष्ट्ये. भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्त्तीबद्दल आपलेपणाची भावना बाबूजींच्या मनात असे. "येता-जाता घरी येत जा", असा बाबूजींचा आग्रह असे. बहिणीकडे जाता-येता आम्ही बाबूजींच्या घरी जात असू. बाबूजी कुटुंबियांची आत्मियतेने ओळख करून द्यायचे. जेवणासाठी आग्रह करायचे. मग तोवर छान काव्यमैफिल रंगायची. बाबूजींच्या कविता जीवनावर भाष्य करणाऱ्या, वास्तव प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या असत.
    अंध असूनही डोळसपणे जीवनाकडे पाहणारा असा हा अवलिया. दृष्टीहीन असूनही दूरदृष्टी असणाऱ्या बाबूजींच्या कविता सहज सुंदर नि मार्मिक असत.
      बाबूजींची ही कविता तर मनाला अक्षरशः वेडावून जाते. कविता अशी आहे..

जग छोटं झालं तसं
    बारकी झाली माणसं... 
परस्परांच्या प्रेमाला पण
    पारखी झाली माणसं !

पाळणागृहात बालक गेले
    वृध्दाश्रमात पालक.
पैसे मिळवणारेच ठरतात
    संसाराचे मालक !
ज्यांनी दाखविलं जग तीच
    पोरकी झाली माणसं...
परस्परांच्या प्रेमाला पण
    पारखी झाली माणसं !

काल हाती हात त्याला
    आज देती शिव्या !
काल मारी लाथ, त्याच्या
    आज गाती ओव्या... 
तात्पुरत्या स्वार्थापायी
    बेरकी झाली माणसं... 
परस्परांच्या प्रेमाला पण
    पारखी झाली माणसं !

एकमेकांच्या देशात धाडतात
    अतिरेक्यांच्या टोळ्या !
पिसाटलेली माणसंच झाडतात
    माणसांवरती गोळ्या... 
कोठेही जा जगात
    एकसारखी झाली माणसं!
परस्परांच्या प्रेमाला पण
    पारखी झाली माणसं !

काॅम्प्युटर-इंटरनेटनं
    नवं ज्ञान येतं घरी...
माणसा-माणसांत वाढू लागली
   खोल रूंद दरी..
उंटाची चाल पाहून
    तिरकी झाली माणसं..
परस्परांच्या प्रेमाला पण
    पारखी झाली माणसं !

आजच्या विश्वाचं किती परखड सत्य मांडलय ना बाबूजींनी.

अशा या प्रतिभासंपन्न बाबूजींना साश्रू नयनांनी विनम्र अभिवादन.. 

भावपूर्ण श्रद्धांजली 🌼🌹💐

-विजया पाटील, कराड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या