Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

नात्यांची वीण | ललित लेख | सौ.क्रांती पाटील

Natyanchi Veen, Natyanche Bandhan, Kranti Patil

'नाती' हा किती सुंदर शब्द. अगदी जीवाभावाचा, आपलेपणाने नटलेला जिव्हाळ्याचा शब्द म्हणजे 'नाती'!. या नात्यांची वीण तयार होते ती जन्मापासूनच… जन्मानंतर आई, बाबा, आजी, आजोबा, काका, काकी, आत्या, मावशी, ताई, दादा अशी अनेक नाती रक्ताची नाती म्हणून जन्म घेतात. आई बरोबर बोबडे बोल बोलत. बाबांचे बोट धरून आपली बाळपावले धुळीत उमटवत. तसेच आजी, आजोबांच्या मांडीवर गोष्टी ऐकत. काका, काकीच्या अंगा, खांद्यावर. ताई, दादाबरोबर हसत, खेळत, कौतुक, हट्ट, लाडाकोडात या नात्यात आपण कधी लहानाचे मोठे होतो हे समजत देखील नाही.

        नात्यांच्या या टप्प्या-टप्प्यातून जाता-जाता आयुष्यात पुन्हा एक बहुमूल्य असं नवीन नातं एका नाजूक चिवट तंतुनी तयार केलेल्या रेशमी धाग्यात विणलं जातं. ते नातं म्हणजे मैत्रीचं नातं. मैत्री ही अशी गोष्ट आहे, जी दाखविण्यापेक्षा मनापासून मानावी लागते. मग ती मैत्री कोणाचीही असो. मैत्री ही चुकल्या मार्गाला, बुडत्या मनाला, प्रत्येक क्षणाला साथ देते. मायेचा ओलावा देते. खचल्या मनाला सोबतीचा हात देते. मैत्री ही हळव्या मनांनी जपावी लागते. बालपणाच्या एका कोपर्‍यात 'मित्र' किंवा 'बालसखी' हा शब्द ठरलेला असतो. एकमेकांच्या खोड्या काढत, एकमेकांची गुपिते ही हृदयाच्या कोपर्‍यात दडविण्याची अनोखी शक्ती परमेश्वराने या बालवयातच दिलेली असते. या खोडकर वयातील हे कोवळं मन बघता-बघता तरुण होते. आणि मग त्यानंतर झालेले मैत्रीचे पाश कधीकधी इतके घट्ट होऊन जातात हे आपणास कळत सुध्दा नाही. मैत्री ही स्वच्छ व नितळ पाण्यासारखी असते. त्यात खोलवर डोकावले तरी जिवलग मित्राचीच प्रतिमा दिसते. आयुष्यात मैत्रीचे हे नातं अनमोल असेच असते. या नात्यात फक्त प्रेमाची व स्नेहाची भावना असते. रडता-रडता हसविणारी, दु:खात सुख देणारी, मनातील भावनांना वाट मोकळी करून देणारी ही नातीचं असतात. खरंच या नात्यांचा विचार मनात आला की वाटतं प्रत्येक नातं हे किती वेगवेगळ्या भावनांनी विणलेले असते. या नात्यांची वीण आईच्या नाळेसोबतच घट्ट विणलेली असते. कळायला लागल्यानंतर या नात्यांची ओळख पटते.

        जीवनात टप्प्या टप्प्याने जुळणारी ही नाती कधी रक्ताची, कधी मैत्रीची, कधी शेजारधर्माची, कधी सहप्रवासातली तर कधी सहजीवनासाठी जुळलेली तर कधी रक्ताच्या नात्याच्या पलीकडची ही काही नाती तयार होतात. देव ज्या नात्यांना रक्ताच्या नात्यात घालायला विसरतो. त्यासाठी हे मानलेले नातं निर्माण झालं असावं…भावनिक बंधांनी गुंफलेलं आपलेच मन जेंव्हा आपले राहत नाही, त्याची समजूत घालणं आपल्याला शक्य होत नाही, तेंव्हा त्याला समजून घेणार्‍या, त्याला प्रेरणा, आधार आणि बळ देणार्‍या विश्वात ते जिथं रमतं तिथं हे नातं भावनिक बंधांची गुंफण असणारं, आपल्या भावनांना जपणारं, मायेची ऊब देणारं, जाणिवांना समजून आधार देणारं असं हे नातं. कधीकधी एखादी व्यक्ती खूप जवळची आपलीच वाटू लागते. तिचे विचार म्हणजे आपल्या हृदयातील भावनांचे प्रतिबिंब वाटू लागतात, अशावेळी तिथे जे नातं जन्म घेतं त्याला रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त महत्त्व असतं. अशी ही रक्ताच्या पलीकडच्या नात्यांची वीण.

        नातं कोणतं का असेना त्यात मायेचा ओलावा, सुख-दु:खात समजून घेण्याची क्षमता व एकमेकांना आधार देण्याची तसेच समर्पण व त्यागाची भावना असायला हवी. मनापासून जपलेल्या नात्यात कितीही संकटे येऊ देत. कितीही रुसवे-फुगवे असू देत. पण तरी अशा नात्याशिवाय जगणं कठीण असतं. अशी नाती रक्ताचीच असतात असे नाही. त्यांना वयाचे, जातीचे, धर्माचे वा कुठल्याच परिस्थितीचे बंधन नसते. नात्यांच्या घट्ट धाग्यांनी विणलेले हे रेशमी, मुलायम वस्त्र आपण आयुष्यभर पांघरतो. विविध रंगांनी, विविध अंगांनी सजलेली. आपल्या जन्माबरोबरच निर्माण झालेली ही नात्यांची वीण आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत सोबत असतात. मृत्यूनंतर ही मनुष्य एका नवीन नात्यांच्या प्रवासाठीच निघालेला असतो. म्हणूनच याला नात्यांची वीण म्हणावे लागेल.

"ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्ठता मोठी"

-सौ.क्रांती तानाजी पाटील.
मु.पो. दुशेरे. ता.कराड. जि.सातारा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या