
प्रत्येक रंगाचे आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. पण या सगळ्या रंगात माझ्या आवडीचा रंग म्हणजे जो अशुभ शकुनाचा शिक्कामोर्तब झालेला, जो युगानुयुगे दरिद्री, अभद्र म्हणून डिवचलेला गेलेला 'काळा' रंग होय! दुःख, शोक, किंवा विरोध यासाठीच याचे खास स्थान ठरले आहे. या रंगाची मजा तर भलतीच न्यारी आहे, म्हणजे शुभकार्यात याला अजिबात स्थान नाही. तिथं तो असणं म्हणजे भयंकर वाईट घडणार. हा मात्र शुभकार्यात विवाहात काळेमणी चालतात हे विशेष आहे बरका! तसेच आपल्या केसात चांदी असेल तर मुद्दाम कार्यक्रम प्रसंगी केसातील चांदी घालवण्यासाठी काळा कल्प केला जातो. तो चालतो, मात्र काळ्या रंगाचे वस्त्र, बापरे! ते नाही चालत हं अजिबात. पुजा कार्यात या काळ्या रंगाला कवडीचीही किंमत नाही.
काही ठरावीक ठिकाणीच या काळ्या रंगाला काळेपणा देऊन चालतं. काळा रंग आभाळात येतो तेव्हा तर नभाचा पान्हा फुटतो आणि सरी कोसळून बळीराजा आणि सारा आसमंत सुखाच्या वर्षावात न्हाहतो. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरणारा शाळेतला फळा हा काळाच असतो. या काळ्या फळ्यावरच आपल्या आयुष्याचे रंगीबेरंगी भविष्य झळकत असते. मग सांगा हा काळा रंग अशुभ का?
सौंदर्याच्या परिभाषेत काळ्या रंगाला कवडीमोल किंमत नाही. रंगावरून सौंदर्य ठरवण्यापेक्षा अंर्तमनाचे विविध गुण पहायला हवे. शेवटी रंग कोणता घ्यावा हे आपल्या हातात नसते. म्हणून कोणालाही काळा रंग म्हणून हिणवणे, चिडवणे, कमी लेखने अशा बिनबुडाच्या गोष्टी सोडून द्याव्यात. कारण केवळ गोऱ्या रंगावरून सौंदर्य पारखणे किंवा गोऱ्या रंगामुळे सुंदरतेची पदवी देणं हे मनाला न पटण्यासारखं आहे. काळा रंग माझ्या मनाला भावणारा, खूप छान अनुभूती देणारा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत हे जर काळ्या रंगाचे असते तर किती छान. अशीच प्रतिक्रिया असते. असा हा माझा आवडीचा काळा रंग होय.
सध्याच्या आधुनिक काळात फँशन युगात काळ्या रंगाला आता बरीच डिमांड आहे. ब्लॅक ब्युटी नावाचा ट्रेंड सध्या जोरदार चालू आहे. शेवटी रंग कोणताही असू दया, आपल्या मनातील भाव भावनांचा रंग स्वच्छ, सुंदर व पवित्र असला तर मग कोणताही रंग आपल्याला शुभकारकच दिसेल. चला तर मग आजपासून काळा रंगाला नावे ठेवणे सोडून देऊया, कारण काळा रंग माझ्यासाठी एव्हरग्रीन रंग आहे असं म्हणायला हरकत नाही.
- संगिता महिरे-साळवे, नाशिक
0 टिप्पण्या