नानासाहेब लष्करात राहिल्याने घरातील वातावरणही लष्करी खाक्याचे. वेळेवर उठणे, मुखमार्जन करून शारीरिक व्यायाम करणे, नाश्ता करून मुले शाळेत जात. नानासाहेब ऑफिसला नि सुमनताई घरातील कामाला लागत. नानासाहेबांचे ऑफिस जवळच असल्याने दुपारच्या जेवणाला ते घरीच येत. तसे स्वयंपाकासाठी गंगू मावशी होत्या परंतु त्यांच्या लेकीच्या बाळंतपणासाठी त्या गावाला गेल्या होत्या. सुमनताईंना आताशा काम झेपत नव्हते. सांधेदुखीने पुन्हा डोके वर काढले होते. घरातील साफसफाई करण्यासाठी 'रामु' गडी होता. सुमनताई कधी तरी त्यालाच स्वयंपाक करायला सांगत. नानासाहेबांना जेवण वेळेवर नि योग्य प्रमाणात लागायचे. थोडीही हयगय त्यांना खपत नसे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन सुमनताई त्यांच्या आवडी निवडी बरोबर जपायच्या.
मुलांची दहावीची परीक्षा झाली. मुलांना सुट्टीत मामाच्या गावाला जायचे होते. मामाचा फोनही आला, "पोरांनो औंदा आंबं लै आलेत, सुट्टी लागली की न्याला येतू" परंतु नानासाहेबांनी सरळ नकार दिला. वर्षभर अभ्यासामुळे मुलांच्या व्यायामाचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. सुट्टीत त्यांना काटेकोरपणे पालन करून घ्यायचे होते. नानासाहेबांच्या करड्या शिस्तीपुढे सुमनताईंचे काही चालत नसे. सुमनताईंनी मामाला समजावले, "अरे शंकर, मुलांना आता आमच्याजवळच राहायचे आहे. सुट्टीत त्यांचा व्यायाम करून घ्यायचा आहे. तू नको येऊ बाबा" असे परस्पर थातूरमातूर कारण देऊन त्याला येण्यापासून रोखले. मुले हिरमुसली. पण सर्वेश बोललाच, "हे गं काय आई? वर्षभर अभ्यास आणि आता हे सगळं आम्हाला तर थोडं तरी स्वातंत्र्य हवं नां". पण समंजस स्वभावाचा राजेश म्हणाला, "पप्पा आपल्या भल्यासाठी करत आहेत. पप्पा देखील आपल्या सोबत आहेतच ना" हे समजण्याएवढी ती दोघेही सुजाण होती. आता सुट्टीत नानासाहेबांनी त्यांची कसरत करून घ्यायला एका प्रशिक्षकाची नेमणूक केली. मुलांना सकाळी उठायचा कंटाळा येई. पण प्रशिक्षकांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पहाटे पाचला उठावेच लागे. दुपारी मात्र त्यांना करमणुकीसाठी पुरेसा वेळ मिळे. मग मुले दूरदर्शनवर सिनेमा किंवा नाटक पाहत. कधी लाईव्ह शो पाहत. जेवणाच्या ठरावीक वेळा असत आणि सकस पौष्टिक आहारामुळे लवकरच मुले तब्येतीने छान दिसू लागली. बारावीची परीक्षा झाली नि नानासाहेबांनी कटाक्षाने दोघांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. ते स्वतः त्यांची तालीम घेत. कधी चालू घडामोडीवरील प्रश्न विचारीत. मुलांचे अवांतर वाचन दांडगे होते. त्यामुळे मुले त्यांच्या परीक्षेत खरे उतरत. आता नानासाहेबांना मुलांच्या कौशल्याची खात्री पटू लागली.
थोड्याच दिवसांवर एन्.डी.ए.ची परीक्षा येऊन ठेपली. पण कुठे कशी माशी शिंकली आणि सर्वेश व्यायाम करताना पडला. त्याच्या हाताचे हाड मोडले. आता तीन महिन्यांसाठी त्याचा हात प्लास्टरमध्ये राहणार होता. नानासाहेबांना खूप वाईट वाटले. परंतु दैवापुढे नाईलाज होता. त्यांनी राजेशकडे जातीने लक्ष द्यायला सुरुवात केली. सुमनताईंनाही सर्वेशचा हात मोडल्यामुळे थोडेसे हायसे वाटले. एका मुलाला तरी आपल्या सोबत राहता येईल ही वेडी आशा. दिवस जात होते. निकालाचा दिवस उगवला नि काय आश्चर्य!राजेश सर्व गुणांनी उत्तम पास होऊन कॉलेजमधून प्रथम क्रमांकावर आला होता. वर्तमानपत्रात राजेशचे अभिनंदन वाचून नानासाहेब म्हणाले, "वा रे माझ्या पठ्ठ्या जिंकलास तू" नानासाहेबांची छाती अभिमानाने फुगली. आता राजेशचे ट्रेनिंग नि पोस्टिंग आसाम बॉर्डरवर केले गेले. सुमनताई काकुळतीने म्हणाल्या, "अरे बदलून घेता येणार नाही का ठिकाण? खूप लांब जातोस. शिवाय तिथे जिवाचा धोका ही फार आहे”. तसे उसळून जाऊन नानासाहेब म्हणाले, "तुम्ही अशा गोष्टीत लक्ष न घालाल तर बरं". सुमनताई गप्प झाल्या.
नोकरीवर रूजू होताना त्यांचे अंत:करण जड झाले होते. मुलगा सैन्यात जाणार आणि आपल्यापासून दूर राहणार त्यामुळे त्यांच्या मनाला वेदना होत होत्या. परंतु राजेशने त्यांची समजूत घातली, "आई मी जरी चाललो असलो तरी सर्वेश तुमच्या सोबत आहे. तू काही काळजी करू नकोस". सर्वेशने जवळच्याच इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेतला. राजेश आपणापासून दूर राहणार पण निदान सर्वेश तरी जवळ राहील म्हणून सुमनताई सुखावल्या. आता नानासाहेब निवृत्त झाले. निवृत्तिनंतरचे जीवन आरामात काढायचे ठरवून त्यांनी गावाबाहेर प्रशस्त बंगला खरेदी केला. त्यात ते, सुमनताई, सर्वेश नि नोकर मंडळी राहू लागली. सुमनताई नोकरांवर पण मुलांप्रमाणे प्रेम करत. त्या काम आवरले की थोडा वेळ वामकुक्षी घेत नि देवधर्माचे वाचत बसत. दिवस कसातरी ढकलला जाई. परंतु राजेशच्या आठवणीने रात्र खायला उठे. रात्र रात्र त्यांना झोप लागत नसे. मग कधीतरी त्या सर्वेशला म्हणत, "अरे राजेशला फोन लावून देतोस का? खूप दिवस झाले त्याचे शब्द कानावर पडले नाहीत". सर्वेशही फोन लावून देई आणि सर्वजण राजेशशी मनमुराद गप्पा मारत. मन हलके करायला त्या कधीतरी नानासाहेबांना बोलत, "अहो, आपण राजेशला इतक्या दूर पाठवून चुक तर नाही ना केली? तसे नानासाहेब खेकसायचे, अगं, मोठ्या नशिबाने राजेशला प्रवेश मिळालाय. देशाच्या कार्यासाठी वाहून घ्यायची संधी त्याला मिळालीय नि तू काय कोत्या मनाने विचार करतेस? एका बहादूर मुलाची तू आई आहेस. छाती पुढे काढून अभिमानाने राहायचे सोडून मुळुमुळु काय रडत असते?" अशा शब्दांनी त्या आपले दु:ख आतच गिळत. कधीतरी सर्वेशला सांगून व्हिडिओ कॉल करत. त्याचा आवाज ऐकण्यासाठी त्यांचे काळीज सुपाएवढे होई. राजेश म्हणत असे, "आई तू काही काळजी करू नकोस. मी इथे सुखरूप आहे. धीर खचू देऊ नकोस. तुला सर्वेश तरी सोबत आहे. माझ्या मित्रांच्या आई-वडिलांकडे पहा. ते त्यांची एकुलती एक आहेत". पण प्रेम का असे विभागता येते? दोन मुले म्हणून प्रेम का अर्धे होणार? पण पुरूषी हृदयाला आईची व्यथा काय समजणार! कधीकधी त्या मूकपणे अश्रू ढाळत. सर्वेश त्यांना फुलाप्रमाणे जपत असे. आईला कशाची कमतरता भासू नये याची काळजी घेत असे.
आणि तो दिवस उगवला. चिनी सैन्याने बॉर्डरवर बॉंबस्फोट करायला सुरुवात केली. त्यांना उत्तर देण्यासाठी सैन्याची एक तुकडी सीमारेषेवर दाखल झाली. त्यात राजेशलाही पाठवले गेले. ही बातमी ऐकताच नानासाहेबांची छाती अभिमानाने फुगली. परंतु सुमनताई आतल्या आत खचून गेल्या. रोज रात्री पाच मिनिटे तरी त्या त्याच्याशी बोलत. त्याची खुशाली विचारत. तेवढाच दिलासा. परंतु मुसळधार पावसाने सीमारेषेवर कहर केला होता. दूरध्वनी, दूरदर्शनच्या तारा निखळून पडल्या होत्या. त्यामुळे राजेशशी संपर्क करता येत नव्हता. सुमनताई सैरभैर झाल्या. राजेशसोबत बोलण्यासाठी बेचैन झाल्या होत्या. त्या सर्वेशला म्हणत, "सर्वेश, पहा रे जरा मोबाईल लागतो का ते!" परंतु आडवळणाच्या ठिकाणी संपर्क साधता येत नव्हता. इथे असाहाय्य झालेल्या मातेची वेदना कुणाला कळावी! अचानक सर्वेशला ट्रांझिस्टरची आठवण झाली. सीमेवरील बातम्या किमान ऐकायला मिळतील म्हणून त्याने ट्रांझिस्टर आणून पप्पांच्या हातात दिला. नानासाहेब कानांच्या ज्योती करून बातम्या ऐकू लागले…आणि सर्वात बहादूर असणारे आपल्या लष्करातील…कर्नल नानासाहेबांचे सुपुत्र…नानासाहेबांच्या हातातून ट्रांझिस्टर गळून पडला. पण सर्वेशने तो कानाला लावला. बातमी प्रसारित केली जात होती, "चिरंजीव राजेश तुकाराम पाटील यांच्या अचाट कामगिरीने आज सीमारेषाच नव्हे तर सारा देश ढवळून निघाला आहे. चालून आलेल्या चीनच्या लष्करी तुकडीशी मोठ्या धैर्याने मुकाबला करून चीनच्या लष्कराला घायकुतीला आणले आहे. लवकरच चीनची भारताशी तहाची बोलणी चालू होतील. चीनने आपली शरणागती पत्करून भारताच्या सर्व अटी मान्य करण्याचे कबूल केले आहे". नानासाहेबांच्या कानाला पुढच्या बातम्या ऐकूच आल्या नाहीत. नानासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. देवघरात ग्रंथ वाचत असलेल्या सुमनताई त्यांच्या पाठीशी कधी येऊन उभे राहिल्या ते त्यांना समजलेही नाही.
- सौ.भारती दिलीप सावंत, मुंबई
मो. नं ९६ ५३ ४४ ५८ ३५
0 टिप्पण्या