कसं लिहू तुझ्यावर, काय लिहू तुझ्यावर, कसं सजवू तुला सुंदर शब्दांच्या बेडीत. माझं जगणं ओझं होतं माझ्यासाठी ते घेऊन जगत असताना, किती भोगलं, किती सोसलं किती दुःख पचवलं. तुला माहितीच ना! अश्रुंचे किती बांध डोळ्यांत साठवले, गोठवले, बर्फाचे डोंगर बनतात तसे बनवले. पण आयुष्या, भय इथले संपतच नाही रे!
जीवनातील प्रत्येक क्षण मी अनुभवले त्यांना दुःखात का होईना आकार देत हे जीवन सावरलं, सुंदर बनवलं. सुखाची झालर त्यावर पांघरून दोन चार पावलं चालायचा प्रयत्न केला. पडलो रडलो अडखळलो! पण हार नाही मानली कधी प्रत्येक दु:खाच्या क्षणांना जिंकण्याचा प्रयत्न केला अन् जिंकलो ही.
आयुष्या! तुझं बरं आहे रे किती जणांचा आधार आहेस तू. प्रत्येकाला घेऊन तू चालतो आहेस, न थकता न डगमगता. मला अभिमान वाटतो तुझा! मी तुझ्यावर तर फुलांची बरसातच करायला हवी नाही का? कारण तुझं मला मिळणं माझ्यासाठी खासंच.
अरे! कितीतरी योनि फिरून आल्यावर माणसाचा जन्म मिळतो म्हणतात, तो मला मिळाला हे माझं भाग्यच! म्हणून वाटतं ओवाळून टाकावा तुझ्यावर प्रत्येक सुखाचा क्षण जो मी अनुभवला, आयुष्या! तुझ्या सोबतीने तुझ्या संगतीने…!
पंख पसरून उडणाऱ्या त्या पक्षा सारखं मलाही सैरभैर उडायचं आहे इकडून तिकडे. वेलीवरच्या कळीतून डोकावणाऱ्या फुलासारखं मलाही फुलायचं आहे. ढगांच्या काळ्याकुट्ट बाहुपाशातून निसटून नदीच्या प्रवाहात मिसळून वाहत जाणाऱ्या जलासारखं मलाही वाहत जायचं आहे आयुष्या! इथल्या मातीतल्या कणाकणात मला मिसळायचं आहे, एकरूप व्हायचं आहे. इथे सुटणाऱ्या वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकेत मला टिकायचं आहे आयुष्या फक्त तुझ्या सोबतीने.
मी हरेन, मी झुरेन, मी अडखळेन, मी पडेन, मी उठून पुन्हा धावू लागेन. आयुष्या तुझी घट्ट मिठी कधीच सैल सोडू नकोस, मला विखरू देऊ नकोस, मी तुझ्या बरोबर चालत असताना मला डगमगू देऊ नकोस! आयुष्य म्हणजे रोमांचकारी सहल, आयुष्य म्हणजे रंगीबेरंगी दलदल, आयुष्य म्हणजे जगण्याची तिढा आणि आयुष्य म्हणजे भोगावी लागणारी पीडा!
आयुष्य काहींना भाग्यवंत असतं तर काहींना नाही. काहींची ध्येयपूर्ती करणारं, कांहीच्या व्यथा वाढवणारं काहींच्या जीवनात वादळ उठवणारं. सकाळी सकाळी पडणाऱ्या दवबिंदूच्या थेंबांनाही सूर्य किरणाच्या प्रकाशात नाहून जावंसं वाटतं तसंच काही मलाही वाटतं.
0 टिप्पण्या