कथासंग्रह : गावठी गिच्चा | सचिन वसंत पाटील
ग्रामीण मराठी साहित्यात सचिन वसंत पाटील हे संवेदनशील कथाकार म्हणून सुपरिचित आहेत. ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, सामान्य माणसांचे प्रश्न मांडणारे कथालेखक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यात आता साहित्य विश्वात दाखल झालेल्या त्यांच्या नव्याकोऱ्या "गावठी गिच्चा" या कथासंग्रहातील कथा, ग्राम जीवनातील 'गावकी' जपणाऱ्या आहेत. हरवलेलं गाव व गावातील विविधांगी अस्सल व्यक्तीचित्रे, त्यांच्या संमिश्र भावभावना, नातेसंबंध, दु:ख, राग, हास्य, रूसवा यांची सरमिसळ यात आहे. त्यांच्या यापूर्वी प्रकाशित झालेल्या "सांगावा" व "अवकाळी विळखा" या कथासंग्रहांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. त्यांच्या कथा समीक्षकप्रीय, वाचकप्रीय झाल्या आहेत. तसेच त्यांची ‘कष्टाची भाकरी’ ही कथा सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे बी.ए.भाग एक पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष बाब अशी की त्यांच्या कथासंग्रहावर अनेक मान्यवरांनी व समीक्षकांनी भरभरून परीक्षणे, रसग्रहणे, अभिप्राय लिहिले व त्याची दोन संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच अलिकडे प्रा. साईनाथ पाचारणे यांनीही 'ग्रामीण मिथकाचे अर्धसत्य मांडणाऱ्या कथा: सचिन वसंत पाटील यांच्या कथांची एकत्रित समीक्षा' हा अभ्यासपूर्ण छोटेखानी समीक्षाग्रंथ लिहीला आहे. तीन समीक्षाग्रंथ प्रकाशित होणे हा सन्मान फारच कमी साहित्यिकांच्या वाट्याला येतो.
प्रस्तुत ‘गावठी गिच्चा’ या कथासंग्रहामध्ये उमाळा, दंगल, कोयता, डोरलं या अतिशय गंभीर आणि विचार करायला लावणार्या कथा आहेत. सायेब, करणी, चकवा, तंटामुक्ती या प्रबोधन करणार्या साध्यासरळ कथा आहेत तर गावचं स्टँड, उपास, टोमॅटो केचप आणि गावठी गिच्चा या नर्मविनोदी कथा आहेत. अशा एकूण बारा विविधांगी सरमिसळ असणाऱ्या गावकथा या संग्रहात आहेत. सर्वच कथांमधून गावातले विविध किस्से, माणसांचे हरतऱ्हेचे स्वभाव, गावरान माणसांची व्यक्तीचित्रे उलगडत जातात. या कथा वाचताना व्यंकटेश माडगूळकरांच्या 'गावाकडच्या गोष्टी', 'माणदेशी माणसं', शंकर पाटील यांच्या ‘खेळ-खंडोबा’, ‘धिंड,’ ‘खुळ्याची चावडी’ तर मिरासदार यांच्या 'गप्पागोष्टी', 'हुबेहूब' इत्यादी कथासंग्रहांची आठवण होते.
ग्रामजीवनातील ‘गावकी’ जपणारं अस्सल चित्रण म्हणजे 'गावठी गिच्चा' हा कथासंग्रह होय. कथा लेखन ग्रामीण जाणिवेतून, सहज सोप्या शब्दांत आलेलं असल्याने ते अनुभवता येतं. काळजापर्यंत पोहोचतं. गावाबाहेरची वस्ती, विहीर, मळा, बैलगाड्या, कौलारू घरे, वाडे, जनावरांची छप्परे, गावचं एस.टी स्टँड, दूध डेअरी, चिखलाने माखलेले रस्ते, मराठी शाळा, मारूतीचं देऊळ, ग्रामपंचायत, पाराचा कट्टा, सार्वजनिक बोरिंग... या गावातल्या नेहमीच्या ठिकाणांवर ही कथा फिरवून आणते. त्यामुळे कथा वाचताना 'गावकी' च्या विश्वातून फिरत असल्यासारखे वाटते.
साध्या सोप्या ग्रामीण भाषाशैलीमुळे या कथा आपल्या मनाचा तळ सहज गाठतात, ही सचिन पाटील यांच्या लेखनाची खासियत आहे. ही कथा गावातील अनेक नातीगोती आणि त्यांचे कवच उलगडून दाखविण्यासाठी जन्माला आली आहे. गावातील बहीण-भाऊ, नवरा-बायको, ऊस तोडणीसाठी आलेले कामगार त्यांच्याकडे पाहण्याचा समाजातील अपप्रवृत्तींचा दृष्टिकोन तसेच वयस्क विचित्र म्हातारी-कोतारी, लग्नाला आलेले तरुण-तरुणी, स्टँडवरच्या गर्दीची मानसिकता, मराठी शाळेतील जिवलग मित्र, पंचायतीचे खुर्चीसाठी हपापलेले मेंबर आणि घट्ट मैत्री असलेली आडदांड चांडाळ चौकडी अशी विविधरंगी प्रेमळ आणि विचित्र स्वभाव गुणांची माणसे आपल्याला या कथांमधून भेटतात.
पहिलीच कथा 'उमाळा' म्हणजे भाऊ-बहीण यांच्या प्रेमातील मायेचा पाझर. रामभाऊ मळेकरी. शेतकरी गडी. कामाच्या रबाडग्यात आपल्या बहिणीला भेटायला बऱ्याच दिवसांपासून गेलेले नाहीत. अचानक पुष्षाआक्का आपल्या भावाला भेटायला आली आहे. ती दिसायला विद्रुप पण आतून फणसगरासारखी मृदुगोड आहे. रामभाऊंवर आक्काचा वचक आहे. आक्काचा फटकळ स्वभाव, फाटका संसार, पण कथाभर आक्काचे व्यक्तीचित्र पुरून उरेल अशी पुष्पाआक्का सचिन पाटील यांनी कथेत उभी केली आहे. स्वभावाला जुळेल अशी गोळीबंद संवादफेक कथेची उंची वाढवते. आक्का जशी अचानक येते तशीच ती निघूनही जाते. दगडालाही उमाळा फुटेल अशी ही हृदयस्पर्शी 'उमाळा' कथा आहे.
सुली या सुंदर युवतीचे व्यक्तिचित्र तिच्या भित्र्या स्वभावासह 'कोयता' या कथेत आले आहे... सोळा सतरा वर्षाची सुली. फडकऱ्याच्या घरात शोभत नव्हतं असलं सौंदर्य. उकिरड्यावर वावरी उगवलेल्या आंब्याच्या सोनेरी रोपागत. तरतरीत तजेलदार अंग. सोन्याहून पिवळं... असं तिच्या सौंदर्याचे वर्णन कथाकार करतात. सौंदर्य हे शाप वाटावं इतकी भयावह परिस्थिती. शेवटी शील जपण्यासाठी ती कोणत्या मार्गाचा अवलंब करते हे आपण प्रत्यक्ष कथासंग्रहात वाचावेच. तर सवी ही 'डोरलं' या कथेची तरुण-सुंदर विधवा नायिका. तिच्या मनाची घालमेल व समाजाकडून होणारी कुचंबणा या कथेत येते. समाजातील अपप्रवृत्तींचा निराधार महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन इथे स्पष्ट झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजने अंतर्गत ‘तंटामुक्तीची संकल्पना’ राबविण्यात आली. परंतु घडले वेगळेच तंटामुक्तीचे अध्यक्ष होण्यासाठी गावात तंटे होऊ लागले, तर काही ठिकाणी मिळालेले बक्षीस घेण्यावरून तंटे झाले. असं हे गावातलं गरम आणि इदरकल्याणी राजकारण, सरपंच, पाटील, डेप्युटी सरपंच, अण्णासाहेब वायदंडे अध्यक्ष निवडीसाठी पंचायतीच्या हॉलमधे जमले होते. ज्ञानू पैलवान, बादशाह खाटिक, शामराव मास्तर, रामजा आडमुठे, किसना न्हावी, सुंदराबाई नखरे हे पंचायतीचे मेंबर या तंटामुक्तीच्या सभेसाठी जमले होते. ज्ञानू पैलवान म्हणत होता, 'मला तंटामुक्तीचे अध्यक्ष करा.' त्यातून ग्रामसभेत तंटा उभा राहिला. मारामारी झाली. अशी ही गमतीशीर कथा सकारात्मक शेवटासह वाचायलाच हवी.
'गावठी गिच्चा' या कथेत शिवा मोहितेला भलता राग. त्याच्या बायकोचाही रागीट स्वभाव. पण शिवा आपल्या दोस्त मंडळींच्या मदतीने आपल्या बायकोला पाय धुवायला तांब्याभर पाणी देत नाही म्हणून कशी अद्दल घडवतो. तिची फिरकी घेतो आणि तिला कशी चिखला राडीतून गावभर फिरवून आणतो, अशी ही कथा नर्मविनोदी गावरान ढंगाची आहे. कथाकार आपल्या शब्द कौशल्याने व चित्रमय वर्णनातून वाचक मनाचा वेध घेत बांधून ठेवतो. यस्टीतून उतरलेला शिवा, राडीतून चालणारी, वैतागलेली लक्ष्मी चित्रवत प्रसंगातून डोळ्यांसमोर उभी राहते. जिवंत वाटते. आपणही तिच्याबरोबर गावातून फिरू लागतो.
यातील प्रत्येक कथेचा कालखंड आणि वातावरण वेगवेगळे आहे. त्यामुळे कथा वाचताना वेगळा कालखंड लक्षात घेऊन वाचावी लागते. त्यामुळे काही ठिकाणी विस्कळीतपणाही वाटतो. उदा. त्यांच्या उमाळा, दंगल, कोयता, डोरलं, टोमॅटो केचप इत्यादी कथांमधून मोबाईलचा उल्लेख व वापर आहे. पण गावठी गिच्चा, चकवा या कथांमध्ये मोबाईल नाही तो असता तर त्यांची पायपीट झाली नसती असे वाटते.
गाव, त्यातील हरहुन्नरी सुष्ट, दुष्ट स्वभावाची माणसे त्यात काही प्रेमळ माणसे तशीच इरसाल, मगरूर सुद्धा, त्यांचे स्वभाव, परंपरा, संस्कृती, गोडवा, जिव्हाळा, दुष्मनी, मैत्री, सुखदुःखात धावून जाण्याची प्रवृत्ती याचे सुंदर वर्णन सचिन पाटील यांनी सर्वच कथांतून केले आहे. आज गावे बदलत आहेत. जागतिकीकरण, आधुनिकरणामुळे जग खेडे बनले. ग्रामजीवन, शेतीव्यवस्था मोडीत निघत आहे. टी.व्ही., इंटरनेट, फेसबुक, व्हाटस्अप यासारख्या साधनांनी कहर केलेला आहे. पूर्वीचा गाव, वेस, रस्ते, देवळे, चावडी यांत आता जमीन अस्मानाचा बदल होऊन, माळवदाची घरे जावून आता खेड्यांतही वास्तूंचे सिमेंटीकरण झाले आहे. अनेक परंपरा बंद पडल्या तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परंपरागत असे जुने आणि नवे गाव सचिन पाटील यांच्या कथांमध्ये येते.
माणसा-माणसातला संवाद, आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा दुरावत चाललेला आहे. अशातही गावांनी गावपण आजपर्यंत टिकवून ठेवलेले आहे. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी म्हटल्याप्रमाणे,“भारत देशाचे खरे स्वरूप पाहायचे असेल, तर ते गावातच मिळेल! आपला देश हा ग्रामांनी नटलेला आहे.” गावातली माणसं गावंढळ, कमी शिकलेली असू द्या, पण जाती-पाती, गरीब-श्रीमंत अशा भेदभावाचा विषाणू गावात कधीही शिरत नाही. त्यांच्या मनात वाहणारा माणुसकीचा, आपुलकीचा झरा अखंड वाहत आहे, हे कथा वाचताना जाणवते. कसदार कथा निर्मितीबद्दल ग्रामीण कथालेखक सचिन पाटील यांचे अभिनंदन आणि भावी साहित्यिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !
0 टिप्पण्या