व्हय गुरुजी लॉकडाऊन लागणार काय ?
दुपारची वेळ. जेवणाची सुट्टी झालेली. मुलांचे जेवण आटोपलेले. काही बोअरजवळ पाणी पीत उभी. काही इकडे तिकडे पळत होती. इतक्यात एक आजी गेट मधून आत आली. चेहरा घामेजलेला. कपाळावरचं कुंकू ओघळलेलं. एका हातात खुरपं, एका हातात फडक्यात बांधलेली कणसं. शेतातून तशीच आलेली. नातू दुसरीत शिकत होता. पोरांनी गलका केला. "इज्या तुझी आजी आलीऽऽ". तसा विजय खेळायचं सोडून आजीकडे पळत गेला. आजी त्याला घेऊनच माझ्या वर्गात आली. तो माझ्याच वर्गात होता. कधी शाळेत घालवायला, कधी उशीर झाला तर डबा घेऊन यायची. एकुलता एक मुलगा पण वेसनापायी बिनकामी. सून कायमचीच माहेरी निघून गेलेली. नातवाला आणि लेकाला भाकरीचा आधार म्हणजे आजी. आज दुपारीच कशी काय आली असेल मी मनात विचार करत होतो. तेवढ्यात आजीच म्हणाली
"गुरुजी ते शाळेत कसलं खेळणं का काय हाय? चार दिवस झालं नातू बूट घे म्हणून मागं लागलाय."
"हो, हो मुलांच्या स्पर्धा आहेत आजी." मी म्हणालो.
"तुमचं बरोबर हाय गुरुजी पण तुम्हाला का ठावं नाय. कसं कसं संभाळतूय घर. चार दिवस झाले रोज पोरगं घरात आल्यावर मला बूट घे म्हणून मागं लागलंय. कशानं घ्यावा तुम्हीच समजूत घाला जरा. दोन वर्षे झाली करुनानं पार घायला आणलंय. त्यात ह्यो पाऊस. चार बांध हिंडावं तवा घरात भाकरीची गाठ पडतीया. मला का हौस नाय व्हय गुरुजी." एका दमात बोलून तिनं घाम पुसला.
मी म्हणालो, "तुम्ही घरी जावा मी सांगेन समजून..."
ती निघाली. काहीतरी आठवल्या सारखं दरवाजापासून मागे फिरली. तिच्या डोळ्यांत पाणी तराळलं होतं.
"ते टिव्हीवर दाखवत्याती, पेपरात येतंय म्हणत्याती. व्हय गुरुजी लॉकडाऊन लागणार काय?”
तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. मी निरूत्तर झालो. मनात गलबललो. माझा कावराबावरा चेहरा बघून तीच पुढं म्हणाली
"गुरुजी आणि लागलंच लॉकडाऊन तर पोराला घरात संभाळीत बसू का कामाला जाऊ? आणि घरात बसून पोटाला काय घालू इस्तू."
काळजाला चर्रकन चटका बसल्यागत झालं...
-गुलाब विष्णू मोहिते, कोकरुड,
ता.शिराळा, जि.सांगली.
0 टिप्पण्या