कोरी पाटी...
लहानपणाचा जिव्हाळ्याचा विषय ‘पाटी’! शाळेत आपले मोठे भावंड जात असले तर त्याचे बघून लहान भावंड पाटीचा आग्रह धरते .मोठ्याची मोठ्याला हवी असते मग छोट्याला कुठलीतरी जुनी पाटी किंवा एखादा खापराचा तुकडा न पेन्सिलचा तुकडा देऊन शांत केले जाते. पाटी मिळताच ते लहानगे हरवून जाते पाटी पेन्सिलीत! हात वळत नसतात अक्षरे लिहिण्यासाठी पण ते रेषा, वाकडी तिकडी वर्तुळं, काढत बसते, ब्रह्मानंदी टाळी लागते त्याची त्या पाटी सोबत! मनातली चित्रं, माहित असलेल्या गोष्टी ते या रेषांच्या माध्यमातून काढते... एव्हडूसा गोल कधी चेंडू असतो तर कधी चंद्र! अश्याच रेषा अन् जमेल तसे उभ्या आडव्या रेषा मारून मासा, मांजर, फूल, चांदणी, ढग, अर्धचंद्र असे काही बाही आकार आनंदाने दाखवत असते. आपल्याला माहित असते की ते आकार त्या विशिष्ट गोष्टींचे नाहीत तरीही आपण शाबासकी देतो अन् मग ते पिलू आनंदित होते. आणि पाटीसोबत ते खेळत राहते कंटाळा येईपर्यंत .
तर अशी ही पाटी मग शाळेत दाखल झाल्यावर आपल्याला मिळते. बऱ्याच शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रथम 'श्री गणेशा' लिहून त्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात केली पण मला काही आठवत नाही असे काही बाईंनी लिहिलेले. ज्यावेळी अक्षरं शिकवायला सुरुवात केली त्यावेळी अर्ध्या वाट्या गिरवायला दिलेल्या अन् मग स्वत:च अर्धी वाटी काढायला शिकल्यावर दोन अर्ध्या वाट्या एकत्र जोडून 'अ' तयार झाले. मग हळूहळू पुढील अक्षरं. मग दिवसभर तीच ती अक्षरे लिहायची, पुसायची पक्की येईपर्यंत. पाटीवर अक्षरांना वळण चांगले लागते, सुंदर वळणदार अक्षर येण्यासाठी या पाटीची भूमिका महत्त्वाची. खरे तर पूर्वी तिसरी चौथीशिवाय वही नव्हतीच अन् त्याही आतासारख्या डझनाने नाही तर मोजक्या एक किंवा दोन! (बऱ्याचदा मोठ्या बहीण भावांची अर्धी राहिलेली वही असे पण तरी त्यात आनंद मोठा होता.) वह्याची संख्या कमी म्हणून आमची शैक्षणिक प्रगती किंवा माणूस बनण्याची प्रगती कुठे खुंटली असं अजिबात झालं नाही मात्र सध्या इतकं सगळं शैक्षणिक साहित्य मिळूनही विद्यार्थ्यांची शैक्षणिक, आत्मिक, नैतिक प्रगती खुंटतच आहे, असो. पुढच्या पुढच्या इयत्तेत पाटीवर प्रश्नउत्तरे, रांगोळ्या, चित्रे, गणित असे सगळे विषय असत. बऱ्याचवेळी कंटाळा आला की पाटीवर रांगोळी किंवा चित्र काढून मन रमवण्याचं माध्यमही पाटीच. पाटी पुनः पुनः पुसून ती कोरी करता येते अन् हवे तितके लिहिता येते ही तिची खासियत वहीच्या बाबतीत मात्र नसते. बऱ्याचवेळा त्या पाटीवर इतका गीजबीटकाला व्हायचा की कुठलेच काही ओळखायचे नाही. बऱ्याचवेळा पाटीवरचा घरचा अभ्यास आपोआप पुसला जाई आणि छड्या मिळत तर कधी गृहपाठ न करताच "गुरुजी केला होता अभ्यास पण पुसला," म्हणून अभ्यास चुकवता येई पण बऱ्याच वेळा ही मात्रा उपयोगी पडायची नाही. गुरुजी जवळ येऊन पाटी बघत अन् चोरी पकडून मार देत! तर अश्या या पाटीची शाळेत सातवीपर्यंत सोबत होती. पुढे हायस्कुलला तिची सोबत सुटली तरी घरी गणित सोडवण्यासाठी, स्पेलिंग पाठ करण्यासाठी, प्रश्नउत्तरे पाठ करण्यासाठी मी जवळ जवळ बारावी पर्यंत वापरली. आज शाळेतून पाटीचे महत्त्व कमी झालंय पण एके काळी तिनं आमच्या आयुष्याला वळण दिले .मग माझ्या मनात एकदम विचार आला की 'इतके दिवस या पाटीचा उपयोग आपण आपल्याला हवे ते लिहिण्यासाठी केला पण पाटीलाही वाटत असेल की कधीतरी आपल्याला काय वाटते ते लिहावे !'
खरे ना ?? हा विचार चमकताच पुन्हा एक विचार मनात चमकून गेला 'आपल्या मनाची, जीवनाची पाटी लहानपणी अशीच कोरी असते आपल्याला तरी कुठं कळतं की त्यावर काय लिहायचे? शाळेत गुरुजन लिहितात, शिकवतात तेच आपण गिरवतो, लिहितो, मनात येईल ते नाही लिहीत गिरवत. या गुरुजनासारखेच आपल्या जीवनाच्या कोऱ्या पाटीवर इतरच लिहीत रहातात काही बाही अन् आपण तसेच गिरवत राहतो आयुष्यभर! कधी नातेवाईक, कधी शेजारी पाजारी, मित्र, तर कधी त्रयस्थ आपल्या जीवनाच्या पाटीवर गिजबीज रेखाटतात अन् ती तशीच गीजबिट घेऊन आयुष्यभर आपण चालत राहतो. स्वतःला काय लिहायचं होतं? याचा विचारच मनाला कधी शिवत नाही, येत नाही, पण आयुष्याच्या उत्तरार्धात बऱ्याचदा आपल्या लक्षात येते, 'अरे! आपल्या पाटीवर हे लिहायला हवे होते किंवा हे लिहिले असते तर?' पण वेळ निघून गेलेली असते, पाटी जुनी झालेली असते आणि ती कधीही फुटणार असते! एक हुरहूरतेपण, पोकळपण डाचत राहते...
“माणसाच्या मनाची पाटी जितकी कोरी कोरी करत जाईल तितकं त्याच्यावर नव्याने खूप काही नवीन लिहिता येते”. ज्याला हे जमते तो माणूस म्हणून उत्तम आणि आदर्श जीवन जगतो. दररोजच आपल्याला आपल्या मनाची पाटी कोरी करून कालचे वाईट प्रसंग, भांडण, नको ते विचार पुसून चांगले तेव्हढेच पुढं नेता यायला पाहिजे; पण आपले तसे होत नाही आपण कालची भांडणे, धुसफूस, द्वेष, राग, मनाविरूद्ध घडलेल्या गोष्टी तश्याच त्या पाटीवर ठेवतो न दुसर्या दिवसाची सुरुवात करतो मग सगळंच गिचमिड होऊन मन कलुषित होते आणि त्याचे प्रतिबिंब आपल्या नात्यांवर, व्यक्तित्वावर आणि परिणामी जीवनावरही पडते. बऱ्याच वेळा आपल्या पाटीवर दुसरेच कुणीतरी काहीतरी लिहीत जाते आणि मग ते आपले नसले तरी आपल्या आयुष्याला चिकटते.
आपल्याला काय हवे ते सद्सद्विवेक बुद्धी शाबूत ठेवून आपण प्रत्येकजणच आपल्या मनाच्या कोऱ्या पाटीवर लिहीत गेलो तर घर, समाज आणि धरती स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही पण सुरुवातीलाच आपल्या कोऱ्या पाटीवर कुणीतरी याचा 'श्री गणेशा ' करायला हवा हे मात्र अगदी खरे!!
लेखिका: सुचित्रा पवार,
तासगाव, सांगली
0 टिप्पण्या