सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि समुद्र सपाटीपासून सुमारे ८२० मीटर उंचीवर असणारा आणि ज्याचे नाव ऐकताच गौरवाने ऊर भरून येतो तो किल्ला म्हणजे किल्ले ‘रायगड’.
या गडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ असे होते. ५०० वर्षापूर्वी तो फक्त डोंगर होता, त्यास गडाचे स्वरूप नव्हते. त्यावेळी त्यास ‘रासीवटा’ व ‘तनस’ असेही म्हणत. या गडाची असणारी प्रचंड उंची, सभोवतालचा परिसर, दऱ्या-खोऱ्या आणि यास लाभलेले नैसर्गिक सौंदर्य यावरून यास पूर्वी ‘नंदादीप’ असेही म्हणत. या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन पर्याय आहेत. पाचाड गावातून पाचाड खिंडीत येऊन तिथून रोप-वे नी गडावर जाता येते आणि दुसरा तिथून थोडे पायउतार होऊन साधारणपणे १४३५ पायऱ्या चढून गडाचा माथा गाठता येतो. तेथून जवळच वाघबीळ किंवा नाचण टेपाची गुहा आहे ती सध्या ट्रेकर्ससाठी ‘गन्स ऑफ पाचाड’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या गुहेला असणाऱ्या दोन प्रचंड खिंडारातून पलीकडील पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड पासून खिंडीकडे येणारे घाटरस्ता याचे सुंदर विलोभनीय दृश्य मनाला मोहिनी घातल्या शिवाय राहत नाही.
निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला जात असे. इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला होता तेव्हा त्यांनी या किल्ल्याचे प्रचंड नुकसान केल्याचे दिसून येते. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर राहण्यास आला. महाराजांनी ‘६ एप्रिल १६५६’ ला या गडास वेडा घातला आणि ‘मे १६५६’ ला रायरी शिवाजी महाराजांच्या ताब्यात आली. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरला जात असताना त्याच्या कडील लुटलेल्या खजिन्याचा उपयोग महाराजांनी किल्ल्याच्या बांधकामासाठी केला.
रायगडाचा प्रचंड विस्तार, त्याचे स्थान, सागरी दळण वळणाच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण तसेच शत्रूला अवघड वाटणाऱ्या ठिकाणापैकी एक होते. अशा अनेक महत्त्वाच्या कारणांमुळे शिवाजी महाराजांनी राज्याची राजधानी म्हणून या किल्ल्याची निवड केली.
महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला पवित्र आणि मंगल प्रसंग म्हणजे ‘शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक’. या गडाने, ‘याची देही याची डोळा’ अनुभवला आहे. “दीड गाव उंच देवगिरीच्या हुनी द्शगुणी उंच जागा. पर्जन्य काळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून तख्तास जागा हाच गड करावा!” महाराजांचे त्यावेळचे शब्द बखरीत मिळतात असे सांगितले आहे.
गडाच्या पलीकडे ‘हिरकणी बुरूज’ उत्तरेकडे ‘टकमक टोक’, ‘श्री सिरकाई मंदिर’ आणि मध्यभागी असणारा ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा पुतळा’ हे येथील प्रमुख आकर्षण. गंगा सागराच्या दक्षिणेला उंच दोन मनोरे दिसतात त्यांचा उल्लेख जगदीशद्वाराच्या शिलालेखात आढळून येतो यांनाच ‘स्तंभ’ असे म्हणतात. हे पंचमजली होते. याचे बांधकाम द्वादशकोनी तसेच आकर्षक नक्षीकाम असणारे आहे. तिथेच असणार्या राणी वशाच्या समोर डावीकडे दास दासींसाठी असणार्या मकानांचे अवशेष दिसतात. त्या अवशेषांच्या मागे एक समांतर भिंत दिसते त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तिथून प्रत्यक्ष बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. तिथे एक प्रशस्त चौथरा लागतो, तेच महाराजांचे ‘राजभवन’ होय. चौथऱ्याची लांबी ८६ फूट तर रुंदी ३३ फूट आहे. राजवाड्याच्या पूर्वेस असणाऱ्या जागेत एक तळघर आहे तिला ‘खलबत खाना’ असे म्हणतात याच ठिकाणी महाराजांची अनेक महत्त्वाच्या विषयावर गुप्त बोलणी होत असत.
महाराजांचा राज्याभिषेक ‘राजसभा’ या ठिकाणी झाला होता. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रूंद आहे. तसेच वर उल्लेख केलेल्या भव्य चौथऱ्यावर पूर्वाभिमुख सिंहासनाची जागा आहे. शिव राज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग अनुभवण्याचे भाग्य रायगडास लाभले.
राज्याभिषेकापूर्वी १९ मे १६७४ रोजी महाराजांनी प्रतापगडावरील भवानी देवीचे दर्शन घेतले. त्या प्रसंगी त्यांनी तीन मन सोन्याचे छत्र देवीला अर्पण केले असे सांगितले जाते. आणि रसिगडावरील राजसभेत ६ जून १६७४ या शुभदिनी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा प्रसन्न, वैभवशाली, मंगलमय वातावरणात पार पडला. नंतर २४ सप्टेंबर १६७४ (ललिता पंचमी) या दिवशी महाराजांचा तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते पार पडला. जास्तीत जास्त लोकांचे समाधान हा या पाठीमागील उद्देश होता असे म्हटले जाते. तिथूनच थोड्या अंतरावर ‘होळीचा माळ’ म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. तिथे शिवरायांचा भव्य पुतळा बसवलेला आहे. त्या समोरच दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच महाराजांच्या काळातील भव्य बाजारपेठ होय. या दोन रांगामध्ये प्रत्येकी २२ दुकाने असावीत. तसेच या रांगामध्ये ४० फूट रुंदीचा रस्ता आहे. यावरून त्यावेळच्या वैभवाचा अंदाज येतो. बाजारपेठेच्या खालील बाजूस ‘जगदीश्वर मंदिर’ दिसते. येथील आणखी पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे पाचाडचा जिजाऊंचा वाडा, खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, मदार मोचा, चोरदिंडी, हत्तीतलाव, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, नगारखाना आणि वंदनीय महाराजांची समाधी.
“खरंच या पवित्र ठिकाणाची धूळ माथी लेवून नतमस्तक होण्यासारखे भाग्य दुसरे कोणते नाही!” असे मी म्हणेन.
(वरील माहिती मी दिलेली भेट आणि संग्रहित केलेल्या माहितीच्या आधारे लिहिली आहे.)
लेखिका: सीमा ह.पाटील, (मनप्रीत)
कोल्हापूर
0 टिप्पण्या