Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

वर्षभराचा सारीपाट | सुरेश नावडकर

वर्षभराचे नियोजन, varshbharacha saripat

वर्षभराचा सारीपाट

हा हा म्हणता नवीन वर्षातील पहिला महिना संपला.. जानेवारीचं पानं उलटून उद्या त्याच्या खालचं फेब्रुवारीचं पान दिसू लागेल... दिवाळी झाली की, नवीन वर्षाची कॅलेंडर्स बाजारात विक्रीला येतात... दूरचित्रवाणीवर 'भिंतीवरी कालनिर्णय असावे' ची जाहिरात सुरू होते. शनिवार चौकात एका चष्मेवाल्या बाबांना मी गेली तीस चाळीस वर्षे कॅलेंडर व पंचांग विकताना पहातोय.. डोक्यावर पांढऱ्या काळ्या केसांचा संमिश्र भांग, बहिर्गोल भिंगांचा चष्मा, निळ्या रंगाचा चौकटीचा शर्ट, काळी पॅन्ट व पायात चपला. या बाबांना मी सर्व ऋतूत दिवसा व संध्याकाळी पाहिलेलं आहे. जणू काही हा कॅलेंडर नव्हे तर वर्षाचे ३६५ दिवस, विकणारा मला चित्रगुप्तच वाटत आला आहे.

    नाहीतरी आपण काय करतो ? वर्षाचे दिवस, आठवडे, महिने समोर दिसण्यासाठीच कॅलेंडर खरेदी करतो.. ते खरेदी केलं की, सरकारी नोकरी करणारी माणसं, आपल्याला किती सुट्ट्या मिळतात यावर नजर टाकतात. शनिवार रविवार जोडून सुट्टी आली असेल तर बाहेर गावी जाण्याच्या, योजना आखल्या जातात. घरातील आजी महाशिवरात्र, आषाढी एकादशी व चतुर्थी कधी आहे, ते बघते. गृहिणी सणावारांच्या तारखा बघते. शाळेत जाणारी मंडळी दिवाळीची सुट्टी कधी सुरू होईल याचा अंदाज घेतात.

    एकदा ते कॅलेंडर भिंतीवर लटकलं की, त्यावर महिन्यातील महत्त्वाच्या नोंदी होऊ लागतात. जसं दुधाचे, पेपरवाल्याचे खाडे. गॅस सिलेंडर कधी लावला, त्याची नोंद. लाईटबिल भरल्याची नोंद. घरातील वाढदिवसांच्या तारखांना केलेल्या खुणा.वर्षभरात ह्या कॅलेंडरची बाराही पानं नोंदीनं भरून जातात. जानेवारीत भविष्यातील तारखा दाखवणारं कॅलेंडर डिसेंबर अखेरीस, वर्तमान होऊन गेलेल्या भूतकाळाचं एकमेव साक्षीदार म्हणून राहतं. त्यात सुख-दु:खाचे, आनंदाचे, सणांचे, यशाचे, पराजयाचे अविस्मरणीय दिवस साठलेले असतात.

    खरं तर तो कुटुंबाचा वर्षांभराचा सारीपाटच असतो. प्रत्येकाला त्याच्या खेळीप्रमाणं दान पडत असतं. उद्या काय घडणार आहे हे माहीत नसताना, दिवस उजाडतो... मावळतो... प्रत्येक दिवस काही ना काही जीवनात भर तरी टाकतो किंवा एखादी गोष्ट हिरावून घेतो. सगळं कसं मृगजळासारखं असतं. आपण योजलेलं, घडतच असं नाही... कधी निराशाही पदरी पडते...

    पूर्वी कॅलेंडर ही घरामध्ये शोभिवंत वस्तू म्हणून लावली जात असत. त्यात चित्र मोठे व बारा महिन्यांच्या तारखा लहान असत. पोरवाल, बिटको अशा कंपन्यांची कॅलेंडर आवर्जून लावली जायची. उन्हाळ्यात ऊसाच्या रसाची गुर्‍हाळं चौकाचौकात चार महिन्यांसाठी उभी रहायची. ते गुऱ्हाळवाले सजावट म्हणून नट नट्यांच्या कॅलेंडरांनी भिंती भरवून टाकत. रसाचा आस्वाद घेणारे रसिक, ते चेहरे बघत रेंगाळत असत..

    डिसेंबर-जानेवारी महिन्यात पूर्वी दुकानदार ग्राहकाला खरेदी केल्यावर, दुकानांची जाहिरात म्हणून कॅलेंडर द्यायचे.‌ नंतर बँका देऊ लागल्या.‌ काही वेळा घरात आठ दहा कॅलेंडर साठू लागली. आता सगळं बदललंय. आता कॅलेंडर विकत घ्यावं लागतं. त्यातसुद्धा विविधता खूप आहे. वर्तमानपत्रवाले देखील स्वत:चं कॅलेंडर पेपरसोबत देतात. 'कालनिर्णय'च्या पानामागे विविध विषयांवरील लेख, माहिती असते. बऱ्याचदा ती वाचलीसुद्धा जात नाही. काही कॅलेंडरमागे रेसिपी दिलेल्या असतात. आता मोबाईलच्या युट्युबवर रेसिपींचा खजिना उपलब्ध असताना, वाचायला 'वेळ' कुणाला आहे?

    आता कॅलेंडरवरील नोंदी मोबाईलवर होतात. महत्त्वाच्या नोंदीचे स्क्रिन शॉट घेतले जातात. वाढदिवसांची आठवण करून देण्यासाठी ॲप्समध्ये नोंद केली जाते. त्यामुळे आता कॅलेंडर हे घरात असावे, म्हणून लावले जाते. ते लावल्याने दिवाणखान्याचा 'फिल' येतो. बाकी आपल्या हातात चोवीस तास, बावन्न आठवडे, तीनशे पासष्ट दिवस, बारा महिने चालतंबोलतं कॅलेंडर आहेच की!!!

- सुरेश नावडकर
मो.नं.९७३००३४२८४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या