Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

या फुलांच्या गंधकोशी | सुचित्रा पवार

ya fulanchya gandhkoshi

या फुलांच्या गंधकोशी

    फुलं कुणाला आवडत नाहीत? रंगीबेरंगी रंगांची विविध आकाराची, औषधी गुणधर्माची अन् हव्याहव्याशा गंधांची फुले प्रत्येकालाच आवडतात. देवाला सुद्धा वेगवेगळी फुले आवडतात. अंगणात एखादे जरी फुलांचे झाड असले तर अंगणाला शोभा येते. एक जरी फुलझाडं असेल तर एखादे तरी फुलपाखरू तिथं बागडते आणि आपल्याला आनंद देऊन जाते. याशिवाय काही खास फुलं विशेषतः सुगंधी फुलं आपल्याला खूप आवडतात. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न. काही फुले भौगोलिक परिस्थिती व वातावरणातच व ऋतुत वाढतात, म्हणजे कास पठारावर फुलणारी फुले अन्यत्र दिसणार नाहीत. काश्मीर मध्ये फुलणारी फुलं इकडं कोरड्या, उष्ण वातावरणात वाढणार नाहीत. काही फुलझाडं खास जंगलातच वाढतात, काही फुलझाडं मात्र सर्वच ठिकाणी तग धरतात. काही फुलं पाहिली की त्या फुलांचे विशिष्ट महत्त्व किंवा विशिष्ट प्रसंग, विशिष्ट व्यक्तीच्या आठवणीशी निगडित असणार्‍या गोष्टी आठवतात. मग ते विशिष्ट फूल पाहिले की त्याच्या पाठीमागचे संदर्भही आपल्याला आठवत राहतात. मोगरा, जाई, अबोलीचा गजरा मुलींना, स्त्रियांना मोहात पाडणारच पण पुरुषांना पण पत्नीसाठी तो मोहात पाडतोच. काही फुलं असतातच अशी की ती आपल्या विस्मृतीत गेलेल्या आठवणींना उजाळा देतात आणि क्षणभर का होईना आपलं मन थेट भूतकाळात त्या ठिकाणाशी, प्रसंगाशी एकरूप होते.

    लहानपणी तर फुलांची प्रचंड आवड असते आणि आवडीची ही फुलं मिळवण्यासाठी मग वाटेल ते दिव्य करण्याची तयारी असते. झेंडूची फुले पाहिली की मला आमचे लहानपणीचे कौलारू घर व त्यापुढील अंगण आठवते. आमच्या कौलारू घरापुढं अंगणात खूप वेगवेगळ्या प्रकारची हंगामी फुलझाडे असायची. त्याकाळी घरोघरी पाण्याचे नळ नव्हते त्यामुळं पावसाच्या पाण्यावरच आमची ही अंगणातली बाग फुलायची आणि पावसाळा संपला की सुकून जायची; पण इतर कुणाच्या अंगणात अशी फुले नसायची त्यामुळं आमच्या अंगणात फुलं फुलली की लोकं कुतूहलाने येता जाता पहायचे. आमचे अंगण येणा-जाण्याऱ्याचे लक्ष वेधून घ्यायचे, पण फुलं तोडण्याचा मोह सुद्धा उत्पन्न करायचे. पिवळा, केशरी मोठा झुबकेदार देशी उंच उंच झेंडू असायचा.

    दिवाळी दसऱ्याला टपोऱ्या मोठ्या मोठ्या फुलांच्या माळांची तोरणे चौकटीला लावायचो. अंगणातल्या शेणाच्या गवळणीच्या डोक्यावरील पाटीत झेंडूची फुलं ठेवायचो. प्रत्येक गवळणीलापण सिंगल पाकळीचे पिवळे किंवा केशरी एक एक फुल टोचायचो. एका दसऱ्याला अंगणातली झेंडूची फुले विकून चार -पाच रुपये आले त्यातून आम्ही तेल आणून दसऱ्याचा सण साजरा केला. झेंडू पाहिला की माझ्या या स्मृती जाग्या होतात. आज सिंगल आणि झुबकेदार पाकळ्यांचा पिवळा केशरी दोन्ही देशी झेंडू नामशेष झालेत.

    असेच एक लालभडक सुर्यफुलाच्या जातकुळीतील फूल गोलटोप आमच्या अंगणाची शोभा वाढवायचे. सिंगल-डबल पाकळ्यांची मखमल, एकाच झाडावर गुलाबी, पिवळी, रेषांचा बदामी पिवळसर अशा छटा असणार्‍या फुलांचा गुलमुस, कर्दळी, काटे कोरांटी याशिवाय पावसाच्या हंगामात फुलणाऱ्या असंख्य गवत फुलांमुळे आणि नानारंगी छोट्या मोठ्या फुलपाखरांमुळे आमचे अंगण रंगीबेरंगी व्हायचे. फुलपाखरे, मधमाशा, भुंगे, कावळे, चिमण्या, साळुंख्या, पोपट आणि इकडून तिकडून विसाव्याला येणारे अनोळखी पक्षी आमच्या अंगणातून हलायचेच नाहीत. अंगणाच्या कुंपणासाठी दाट काटेरी फांजरी टाकल्या असल्याने त्यात उगवणारी झाडे तिथंच बिया पडून दरवर्षी तिथेच वाढायची. गोलटोप तर लावावा लागायचा नाही तरीही दरवर्षी त्यांच्या संख्येत वाढ होऊन दाट गंज्यान होऊन जायचे. झेंडूचही तसंच ! दोन चार फुले चुरून टाकली की ढीगभर झाडं उगवायची आणि दाटीवाटीने उभी रहायची. तर असं हे अंगण आमचं अतिशय आवडतं आणि लाडकं ठिकाण होतं. उठलं की पहिलं अंगणात जाऊन बघायचं की कुठल्या रोपाला कुठं कळी आलीय, कुठं फूल आलंय, नवीन काही घडलंय का अंगणात? मनाच्या एका कोपऱ्यात हे अंगण तसेच घट्ट रूतून बसलेय कधीच पुसले न जाण्यासाठी. अंगणातल्या काट्यांच्या कुंपणात दरवर्षी पिवळी कोरांटी उगवायची. कुंपणातून वर येऊन फुलं लागली की तिकडं लक्ष जायचं. मग काय शाळेला जायच्या अगोदर ओटाभर फुले तोडायची, आमच्या माईलाही फुलांचे भलतेच वेड! नावातच पुष्प असल्याने पुष्पवेड भयंकर. कॉलेजला जाताना कोरांटीचा हातभर लांबडा गजरा वेणीत माळून जायची. तिचा गजरा करून राहिलेल्या फुलांचा एव्हढासा गजरा करून बरेचदा राहिलेला दोरा दगडाने तोडताना सुईचे नाकच मोडायचे आणि मग कुणी बघू नये म्हणून गुपचूप तशीच ती सुई सुईदोऱ्याच्या डब्यात ठेवून द्यायची. मग तो एवढासा गजरा पुढच्या केसांवर बांधायचा; मुंडावळ्या प्रमाणे आणि डोळ्यांपुढं घेऊन मानेला झटके देत पुढे मागे त्याला झुलवत राहायचे. कधी कधी आपल्यातली फुलं कमी पडली की दुसऱ्याच्या दारातली फुलं त्यांचा डोळा चुकवून तोडायची आणि चाहूल लागली की धूम ठोकायची! अशी ही फुलचोरी. कोरंटीची फुलंही आता कुठं दिसत नाहीत पण चुकून दिसले तर हा सर्व इतिहास डोळ्यांपुढं येतो.

    मखमलची फुलं पाहिली की माझ्या भाचीचे अक्षुचे बारसे डोळ्यांपुढं येते. तेव्हा मी चौथीत होते. अक्षयच्या बारशाला तिची आत्या आलेली. पाळणा सजवायला फुलं लागणार होती. आताच्या सारखे तेव्हा कोणतीच गोष्ट सहज बाजारात उपलब्ध होत नव्हती किंवा सोहळेही दणकेबाज नव्हते होत. डिसेंबर महिना असल्याने अंगणातली फुलझाडे सुकलेली त्यामुळं थोडीच फुलं मिळाली म्हणून मग आम्ही फुलांसाठी प्रत्येकाची अंगणे पालथी घालून जितकी मिळतील तितकी फुलं गोळा केली सगळी मखमलच मिळाली झेंडूची फुले कुठेच नाही मिळाली. मग सार्वजनिक नळावरून पाणी भरायला सुरुवात केली. सार्वजनिक नळाचे पाणी चढ-उतारानुसार लवकर-उशिरा जायचे. आमच्या येथील नळाचे पाणी चढ असल्याने प्रथम जायचे. मग त्याखालील थोड्या उतारावरचे असे टप्प्याटप्प्याने पाणी जायचे. आम्हाला घरात खूप पाणी भरायचे होते त्यामुळं आम्ही असे जिथं जिथं पाणी सापडेल तिथून आणून ओतत ओतत दिवस मावळून अंधार पडला. कळशीतले पाणी हेन्डकळून सांडून फ्रॉक भिजला थंडीने कुडकूडून गेले. घरात पुरण पोळीचा स्वयंपाक चालू होता. पाणी भरून झाल्यानंतर मग शेजारच्या बायकांना बोलवून साधासाच बारशाचा कार्यक्रम पार पडला. मखलमलची फुलं पाहिली की मला हे सगळं डोळ्यांपुढं उभे राहते.

    कारळाची फुले आता दुर्मिळ झालीत कारण शेतकरी आता असलं व्याप करू इच्छित नाहीत; पण माझ्या लहानपणी आमच्या शेजारी असणाऱ्या शेतातून पिकांच्या कडेला कारळ मोगत. दसऱ्यात ही फुले फुलायची आणि याच फुलांच्या माळा देवाला वाहायची प्रथा होती. दररोज आम्ही शेतातून नऊ फुले तोडून आणायचो. हिरव्यागार ताटव्यावर फुललेली ती इवली इवली पिवळी धम्मक फुलं पाहून मन मोहून जायचे. कारळाची फुले शेताची शोभा वाढवत असत. आता घराशेजारच्या शेतामध्ये इमारतींची झाडे वाढली अन हिरवेगार शेत लुप्त झाले. चुकून कुठं कारळाची फुलं दिसली की मला माझं बाल्य न ते पिवळेधम्मक ताटवे डोळ्यापुढे सजीव होतात जणू.

    'कुर्डू ' खरे तर गवताचा प्रकार. पण कोवळ्या पानांची भाजी खूप चविष्ट लागते. याचे औषधी गुणधर्म ही आहेत. खालचा भाग पांढरा शुभ्र आणि शेंड्याकडेचा भाग गुलाबी. कुर्डू शेतात पसरला की हे पांढरेशुभ्र तुरे लक्ष वेधून घेतात. याला अजिबात वास नसतो, तुरे सुकले की त्यातून राजगिऱ्या सारख्या बारीक काळ्या बिया खाली पडतात व पावसात रूजतात. कुर्डू फक्त माळरानावरच जास्त फुलते; आणि माळ रानात भुईमुगाचे पीकही जोरात येते. दिवाळीची सुट्टी लागली की आम्ही शेंगा तोडायला जायचो तेव्हा भुईमुगाच्या शेतात कुर्डुचे तुरे वाऱ्यावर सळसळताना किती मस्त वाटायचे. शेंगाला जाताना फडक्यात बांधून नेलेली भाजी भाकरी दुपारी खाताना अप्रतिम लागायची! सगळ्या मैत्रिणी मिळून सुट्टी संपेपर्यंत दररोज शेंगाला जायचो, खूप मजा यायची सुट्टी संपूच नये वाटायची. कुर्डू बघितला की आम्ही पालथी घातलेली सर्व शेते जशीच्या तशी डोळ्यासमोर तशीच उभी राहतात.

    अशीच अजून काही फुले बघितली की त्याशी निगडित सर्व सुखदुःखाचे प्रसंग, वेळ सर्वकाही स्मृतिपटलावर जिवंत होते आणि मन भूतकाळात पुन्हा पुन्हा जाते आणि त्या सुखद दिवसांना कडकडून भेटत राहते.

- सुचित्रा पवार, तासगाव
  ता.तासगाव, जि.सांगली 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या