Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे - रतन टाटा | वैभव चौगुले

टाटा समूह, ratan tata,

रतन टाटा

“मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे…” हे जे म्हणतात त्यांचीच कहाणी मी थोडक्यात आपणासमोर मांडत आहे. संघर्ष काय असतो? संयम काय असतो? ध्येय काय असते? हे सर्व प्रश्न आपल्यासमोर केव्हा ना केव्हा उभे राहतात, किंवा परिस्थिती केव्हातरी या प्रश्नापर्यंत आपल्याला घेऊन जाते. लहान असताना आईवडील, गुरूजन आपल्यावर संस्कार करत असतात. पण आईवडीलांची सोबत काही मुलांना मिळत नाही. अशी मुले मनानी खचली जातात. पण काही मुले आपल्या जीवनाचे ध्येय निवडून कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याची तयारी दाखवून यशस्वी होतातच! असचं एक यशस्वी उदाहरण मी आपल्यासमोर मांडत आहे.

    गर्दीत वाट दिसत नाही. तर त्या गर्दीत घुसून हवी तशी वाट निर्माण करावी लागते. योग्य दिशा निवडून त्यावर आयुष्याच्या रेघा ओढणे इतके सोपे आहे का? जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर कोणते निर्णय घ्यायचे हे निर्णय घेणे कठीण असतात, पण ते घ्यावेच लागतात! आणि असे निर्णय घेऊन आपले जीवन यशस्वी करणाऱ्या महान व्यक्तीची मी ओळख आपणास या लेखातून करून देत आहे…

    समाजात आपण वावरतो. हा समाज आहे म्हणून आपण आहोत. जीवन जगत असताना समाजाचे भान ठेवून समाजाचे आपण देणे लागतो हे लक्षात घेऊन मिळालेल्या नफ्यातून साठ टक्के रक्कम समाजासाठी देणार्‍या एका दानशूर, देशभक्त व्यक्तीची ओळख मी आपणास करून देताना मला आनंद होत आहे... 

    २८ डिसेंबर १९३७ रोजी सुरत येथे एक मुलगा पारशी कुटुंबात जन्मास येतो. पण आई वडील मुंबईत राहत असल्यामुळे या मुलाचे बालपण मुंबईतच सरत असते. हा मुलगा अवघा सहा वर्षाचा असताना या मुलाचे आईवडील विभक्त होतात. यानंतर या मुलाची जबाबदारी त्याच्या आजीकडे येते. या मुलाचे चँम्पियन स्कूल मुंबई येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण होते. या मुलाचं आर्किटेक्ट व्हायचं स्वप्न, म्हणून या मुलाचे अँडमिशन त्याची आजी अमेरिकन कॉर्नल विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवून देते. हा मुलगा स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करावयाचे ठरवतो.

    एखादा निर्णय घेतला मग कोणत्याही वयात असू दे, जो निर्णय मनापासून आपण घेतो तो पूर्ण होईपर्यंत किंवा ध्येय साध्य होईपर्यंत ती उमीद कदापि थांबू देत नाही, आणि हीच खरी कारणे यश संपादन करण्याची आहेत. अमेरिकेतील शिक्षण कालावधीमध्ये या मुलाने हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व लहान-मोठी कामे न लाजता केली व तो आपले शिक्षण पूर्ण करत गेला.

    या तरूणाने १९५९ मध्ये कॉर्नल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केले आणि १९६२ मध्ये या तरूणाने आपल्या करियरची सुरूवात टाटा स्टील विभागातून केली. त्यावेळी या तरूणाने ब्ल्यू कॉलरच्या कर्मचार्‍यासह भट्टीमध्ये सुद्धा काम केले. हे एक कठीण काम होते. पण या तरूणाने दिलेल्या जबाबदार्‍या काळजीपूर्वक पूर्ण करत टाटा समूहाच्या परंपरेनुसार १९७० पर्यंत टाटा समूहाच्या बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केले. या तरूणाची कामाची पद्धत पाहून या तरूणाला समूहाच्या मँनेजमेन्टमध्ये प्रमोट करण्यात आले..

    १९७१ साली या तरूणाची निवड राष्ट्रीय रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स कंपनी (नेल्को) चे प्रभारी संचालक म्हणून निवड करण्यात आली. कंपनीचे कामकाज योग्य पद्धतीने हाताळत कंपनीच्या नफ्यामध्ये दोन टक्याहून वीस टक्यापर्यंत कंपनीचा नफा वाढवला. याच काळी देशात आणीबाणी व आर्थिक मंदीतून ही कंपनी बाहेर पडली नाही. याच काळात समूहास ही कंपनी बंद करावी लागली.

    हे करत असताना या तरूणाने १९७५ साली हॉवर्ड विद्यापीठातून मँनेजमेन्टची पदवी मिळवली याच कालावधीमध्ये टाटा समूहाचे तात्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटाशी या तरूणाची मुलाकात झाली.

    या तरूणाची मेहनत पाहून १९७७ मध्ये त्याला टाटा कंपनीच्या एम्प्रेस मिलची जबाबदारी देण्यात आली. जी मिल अगोदरच दिवाळखोरीत निघाली होती. या तरूणाने या मिलबाबत एक आराखडा कंपनीच्या मँनेजमेन्टसमोर मांडला. पण अन्य अधिकारी वर्गाला तो मंजूर नव्हता. नंतर ही कंपनी बंद करण्यात आली. या तरूणाचे हे दुसरे अपयश होते. परंतु या सर्व गोष्टीमुळे या तरूणाला बरेच काही शिकावयास, अनुभवयास मिळत गेले.

    यश काय असते. त्यामागे किती मेहनत घ्यावी, इतरांशी कसे वागावे. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी किती संघर्ष करावा, मनावर, बुद्धीवर किती संयम ठेवावा हे या तरूणाने चांगलेच आत्मसात केले होते.

    सन १९९१ मध्ये या तरूणाला टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बनवले गेले. दहा वर्षाचा कालावधी गेल्यानंतर याच तरूणाला १९९१ मध्ये जे. आर. डी टाटांनी टाटा समूहाचे नवे चेअरमन म्हणून नियुक्त केले. कामगारा सोबत राबणारा एक तरूण टाटा समूहाचा चेअरमन होतो.. हे त्या तरूणाच्या मेहनतीचं फळच म्हणावे लागेल.

    मी आता या तरूणाचे नाव आपल्याला आनंदाने सांगू इच्छितो.. यांचे नाव “मा.श्री.रतनजी टाटा” असे आहे. रतन टाटा जेव्हापासून टाटा समूहाचे चेअरमन झाले तेव्हापासून कंपनी प्रगतीच्या दिशेकडे वाटचाल करू लागली.

    मी आता टाटा कंपनीविषयी आपणास थोडी माहिती सांगणार आहे. टाटा समूह पहिल्यापासूनच व्यावसायिक व प्रवासी वाहन बनवत होते. पण भारतातली मध्यमवर्गीय लोकांची समस्या लक्षात घेत ३० डिसेंबर १९९८ मध्ये इंडिका कार बाजारात आणली. रतन टाटानी इंडिकाच्या प्रोडक्शनवर खूप मेहनत घेतली होती. पण ऑटोमोबाईल अँनेलेसिसने गाडीमध्ये बरेच दोष काढले. त्यामुळे, टाटा इंडिकाची बाजारात विक्री कमी होऊ लागली. आणि वर्षभरात ही इंडिकाकार फेल गेली व टाटा मोटर्सला अपयश सहन करून नुकसानही सहन करावे लागले.

    या सर्वच कारणामुळे 'रतन टाटा' यांनी ही कार कंपनी विकण्याचा प्रस्ताव फोर्ड कंपनीसमोर ठेवला., पण त्यावेळचे फोर्ड कंपनीचे, चेअरमन बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांना सरळ उत्तर दिले नाहीतर उलट त्यांचा अपमान करत “जर तुला कार बनवता येत नव्हती तर तुला या व्यवसायामध्ये पडायला कोणी सांगितले होते.” असे खडे बोल त्यांना ऐकवले. फोर्डची पहिली मिटींग मुंबईमध्ये झाली त्यानंतरची मिटींग अमेरिका येथे झाली. कंपनीच्या मँनेजमेन्टमधील अधिकार्‍यानी तुमची ही कंपनी विकत घेऊन आम्ही तुमच्यावर उपकारच करत आहोत. पण रतन टाटांना हे बोलणे खटकले. त्यांचा अपमान तिथे झाल्यावर त्यांनी सौदा रद्द केला व ते तेथून निघून आले. रतन टाटा यांनी हा सर्व प्रकार संयमाने शांततेने घेतला व आपल्या सहकार्यासोबत परत येऊन पुन्हा इंडिका कारवर काम करून, चुका बाजूस काढून आपली सर्व संपत्ती टाटा मोटर्समध्ये गुंतवली आणि नव्याने टाटा इंडिका V2 बाजारात आणली. टाटा इंडिका V2 बाजारात आपले नाव करत यशस्वी होत गेली व टाटा मोटर्सने पुन्हा आपले नाव प्रगती पथावर आणले. रतन टाटा यांच्यामुळे टाटा समूह प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना दुसर्‍या बाजूला फोर्ड कंपनीच्या जगवार आणि लँन्ड रोव्हर बंद पडण्याच्या वाटेवर येऊन थांबल्या होत्या.

    या परिस्थितीमध्ये रतन टाटा यांनी फोर्ड कंपनीच्या जगवार व लँड रोव्हरला विकत घेण्याचा निर्णय घेतला. हा सौदा झाल्यानंतर बिलफोर्ड यांनी स्वत: रतन टाटा यांना जगवार व लँड रोव्हर खरेदी करून आपण आमच्यावर उपकार करत आहात पण रतन टाटा यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. किंवा बील फोर्ड यांना त्यांचा अपमान होईल असं काहीही बोलले नाही. त्यांना यावेळी खूप बोलता आले असते, बिल फोर्डने केलेल्या अपमानाचा बदला घेता आला असता, पण त्यांनी असे केले नाही, तर आपण आपल्या कामांमध्ये कसे यशस्वी होऊ याचाच त्यावेळी विचार केला. सर्वसामान्य माणसांचा विकास लक्षात घेऊन भारतीयांचे जीवनमान वाढवणे याची जाणीव रतन टाटा यांना पूर्वीपासूनच होती सर्वसामान्य माणसांना विकत घेता येईल अशी कार बनवण्याचे स्वप्न रतन टाटा यांनी पाहिले होते. सन २००८-०९ मध्ये रतन टाटा यांनी सर्वांना विकत घेता येईल अशी टाटा नॅनो ही कार बाजारात आणली. नवीन टाटा नॅनो बाजारात आल्यावर खूप मोठ्या प्रमाणात कारची खरेदी झाली. पण या कारचे स्वस्त मिळणाऱ्या गाडीत रूपांतर झाल्यामुळे टाटा नॅनोचा खप कमी झाला, त्यानंतर टाटा समूहाने इंटरनेटची प्रसिद्धी ओळखून, ओला कॅब, पेटीएम अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि टाटा समूहाचे नावलौकिक करत एका उंच स्थानावर नेऊन ठेवले. देशात दिडशे पेक्षा जास्त कंपन्या, आठ लाखाहून अधिक कामगार टाटा समूहामध्ये काम करत आहेत. दिनांक २८ डिसेंबर २०१२ रोजी त्यांच्या ७५ व्या जन्मदिना निमित्त त्यांनी टाटा समूहाच्या चेअरमन पदावर राजीनामा दिला. रतन टाटा यांची यशस्वी झालेली वाटचाल मी आपणासमोर ठेवली.

    रतन टाटा यांच्या वैयक्तिक जीवना बद्दल काही गोष्टी आपल्यासमोर मांडणार आहे. रतन टाटा यांनी लग्न केलेले नाही. सर्वसाधारण सरळ,साधं जीवन जगायला त्यांना आवडते, मुंबईमध्ये एका साध्या घरात ते राहत आहेत. त्यांना पुस्तके वाचण्याचा छंद आहे. तसेच ते प्राण्यांमध्येही चांगले रमतात. सामाजिक भान ठेवत, जपत टाटा समूह आपल्या नफ्यातील ६६% नफादान करते, रतन टाटा यांना बऱ्याच पुरस्काराने गौरवण्यात आले ज्यामुळे २००० साली पद्मभूषणाने व २००८ मध्ये भारतातील दुसरा मोठा पुरस्कार पद्मविभूषण हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

    रतन टाटा यांचे सामाजिक कार्य, कोरोनामध्ये पाचशे करोड रुपये स्वत: मार्फत व टाटा समूहाकडून पंधराशे करोड रक्कम तसेच हजारो व्हेंटिलेटरचे महत्त्वपूर्ण मदत देशाला केली, तसेच पीपी किट मास्क आणि ग्लोज आणि टेस्टिंग किट या समूह सामग्रीचीही महत्त्वपूर्ण मदत केली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये ऑक्सिजनची सुविधाही उपलब्ध करून दिली. वेगवेगळ्या राज्यांमध्ये ऑक्सिजन पुरवण्यासाठी टँकरची ही सोय केली. रतन टाटा हे तरुण पिढीचे नेहमीच आदर्श राहिले आहेत. तरुण उद्योजकांना आर्थिक मदत करून त्यांनी उभं केलं आहे. तरुण जर स्वत:च्या पायावर उभं राहिले, तर आपल्या देशाचा पाया भक्कम होऊ शकतो, असा विचार रतन टाटा नेहमी करत असतात. कारण देशाचे भविष्य तरुणांच्या हातात असते यावर ते लक्ष केंद्रीत करतात. ज्यावेळी मुंबईमध्ये २६/११ दहशतवादी हल्ला ताज हॉटेल व तसेच मुंबईमध्ये इतर ठिकाणी झाला होता. ताज हॉटेलमध्ये या हल्ल्यात तेथील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. काही कर्मचारी जखमी झाले होते. यावेळी रतन टाटा यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन परिस्थिती जाणून घेतली व लाखो रूपयांची मदत केली. पैशाची तर मदत केलीच पण मयत झालेल्या प्रत्येक घरातील एका व्यक्तीला ताज हॉटेलमध्ये कामास घेतले. नुसते हॉटेलमधील कामगारांनाच नाही तर पोलिसांना ग्राहकांना ताज हॉटेलच्या आजूबाजूस असणार्‍या हातगाड्यावाल्यांनाही आर्थिक मदत केली. याचवेळी पाकिस्तानकडून टाटा समूहाची ऑर्डर आली होती. ती तात्काळ रद्द केली तसेच काही पाकिस्तानचे कॉन्ट्रॅक्ट टेंडर ही रद्द केले. यावरून रतन टाटा यांची देश सेवा आपणास समजून येते. देशाला प्रगत बनवण्यासाठी रतन टाटांची मोठा हातभार लावलेला आहे. लहान लहान गोष्टींच देशाला महान बनवू शकतात असे विचार व्यक्त करून आमलात आणणारे महान देशभक्त रतन टाटा यांना माझा सलाम…

लेखक: वैभव चौगुले, सांगली.
मो.नं. ९९२३१०२६६४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या