मोहनदास करमचंद गांधी
उर्फ बापूजी !
प्रिय बापू ,
पत्र लिहिण्यास कारण की,
बापू, काय हसतोस तू राव. एकदम झकास स्माईल हाय बघ तुझी. बापू, आज तुला लय आनंद झाला असेल ना? हो ना..? आपल्याला बी लय आनंद झाला बघ.
बापू, गंमत बघ ना तुला गोळ्या घालून ठार केले राव. पण तरीही तू संपला नाहीस. बापू तू आजही जिवंत हायस बघ तुझ्या विचारातून...
जेव्हा तुझ्या बाबतीत हे असे काही चुकीचे बोलतात. तेव्हा तुझ्या आठवणींना बरोबर उजाळा मिळतोय बघ. बापू जेव्हा हे असं काही बोलतील तेव्हा कमीत कमी तुझं नाव तरी घेतलं जाईल न्हवं. आणि कमीत कमी एक पान तरी वाचलं जाईल बघ. म्हणून आनंद हाय.
च्यामारी बापू बघ ना, तुला गोळ्या घातल्या तेव्हा तुझ्या मुखातून 'हे राम' होता आणि तुझ्या आश्रमात गाय पण होती. तू तर शाकाहारी पण होतास. अण्णांनी केलेला प्रयोग तूच शिकवलेला. पण आत्ताच्या पिढीला हे कुठे माहीत आहे.
बापू, खरं तर तू हे जग सोडल्या नंतर जगभर तुझे पुतळे उभे केले गेले. आपल्या देशात पण बरका. विशेष म्हणजे, प्रत्येक कार्यालयात भिंतीवर तुझा फोटो अडकवलेला असतो.
आपल्या देशात अनेक महापुरूष होऊन गेले. प्रत्येकाचे अनुयायी, समाज, जात, धर्म त्यांच्या - त्यांच्या पाठीशी उभे असतात बघ. पण तुझ्या मागे फक्त भिंतच.
२ ऑक्टोबराला स्वच्छ केला जातो बघ... बापू तुलाच. बापू स्वच्छता करताना जात आडवी येता कामा नये, हे स्वत:च्या बायकोला ठणकावून सांगणारा तू. बापू, तुला माहित आहे का? की आज ही तुझी यथेच्छ बदनामी केली जातेय. तुझ्यावर गोळ्या झाडणाऱ्यांचे वारस तुला चक्क दुसऱ्याच धर्माचे करून टाकतात राव. बापू कचरा खूप झालाय रं असल्या ओकणाऱ्या माणसांचा. समाजात दुर्गंधी खूप येते. साफ करायला पाहिजे बघ.
बापू कालपर्यंत ही लोकं तुला वैयक्तिक बोलत होती, तोपर्यंत ठीक होतं बघ. पण आज तुझ्या आईच्या चारित्र्यावरचं शिंतोडे उडवले...
माफ कर बापू पण एक चुकलं तुझं राव. इत्तर महापुरूषांच्या सारखं तुला पण तुझा अनुयायी, समाज निर्माण करायला पाहिजे होता. म्हणजे तुझ्या विषयी असे बोलल्यानंतर उठाव तरी झाला असता. निषेध तरी केला असता. अगदी तुझ्या पद्धतीत सत्याग्रह..!
बापू... तू तर आपल्या भारत देशाचा राष्ट्रपिता! च्यामारी बापू तू एवढे महान कार्य केलेस राव. बापू तुला जन्म देणारी माता किती पुण्यवान असेल. जिने या देशाला येवढं सामर्थ्यशाली, शुर,वीर पुत्र दिला. तू या मातीत जन्माला आला, हेच या मातीचे भाग्य समजतो.
बापू आज ज्या पद्धतीने हे तुझ्याबद्दल आणि तुझ्या आईच्या बद्दल बोलले, तसेच ते राजा शिवछत्रपती आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या बद्दलही असेच बोलले होते. बापू यांच्या सांगण्याने काही फरक पडत नाही. जसा तू आणि तुला जन्म देणारी आई, तसेच राजा शिवछत्रपती आणि आईसाहेब जिजाऊ. हजारोवेळा तुमच्या चरणी नतमस्तक होईल इथली पिढी...
जे कोणी तुझी अशी बदनामी करतील ती त्यांच्या त्यांच्या कर्माने मरून जातील.
बापू, तुझं नाव घेतल्याशिवाय यांना पर्याय नाही. तुझं नाव आहे म्हणून ते पुन्हा पुन्हा तुला बदनाम करत राहतील.
बापू, तू कालही जिवंत होतास, आजही आहेस आणि उद्याही ही जिवंत राहशील. फक्त तुझाच पर्याय आहे, बापू या भारतभूमीला!
- अक्षय जहागीरदार 📱 ७३५०००२१४५
🔖 Tags & Keywords
📌 मराठी Tags
बापूंना पत्र, महात्मा गांधी, अक्षय जहागीरदार, प्रेरणादायी लेख, संघर्ष, सत्याग्रह, राष्ट्रपिता गांधीजी, भावनिक पत्र, जीवनसंघर्ष, सकारात्मक विचार
📌 English Tags
Bapu Letter, Mahatma Gandhi, Akshay Jahagirdar, Emotional Letter, Inspirational Blog, Struggle, Satyagraha, Father of Nation, Positive Thoughts, Motivational Writing

0 टिप्पण्या