प्रिय,
यशवंतराव चव्हाण साहेब...
साहेब तुमचं बोट धरून जो राजकारणात आला आणि पुढे तुमचा मानसपुत्र म्हणून या देशाच्या राजकीय पटलावर त्यांना आपलं अस्तित्व कोरलं तो आज वयाच्या ८४ व्या वर्षी स्वतःचा पक्ष अर्थात त्याचा परिवार वाचवण्यासाठी धडपड करतोय. काळाच्या पुढची पाऊले ओळखण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे त्याच्या वाट्याला आता काळच आलेला आहे.
उभ्या पावसामध्ये "मी म्हातारा झालो का..?" असा प्रश्न आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचारून त्यांच्या धमन्यातलं रक्त सळसळाय लावणाऱ्या त्या योध्याला आता युद्ध करावे लागणार आहे आपल्याच माणसांशी. स्वत:च्या रक्तातील जिवाभावाची माणसे आज त्याला सोडून दूर गेली आहेत. मूठभर मावळ्यांच्या सोबतीने आता तो पुन्हा बाहेर पडणार आहे याच आशेवर...
लोक माझे सांगती...,
कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर...,
त्याला सर्वस्व मानणाऱ्या त्याच्या तळागाळातील लोकांच्या विश्वासावर...
पण साहेब तुम्हीच म्हणता ना की, "राज्याचे राजपद असल्यावर त्याचा कुत्रा जरी आजारी पडला तरी लोक बघायला येतात पण जर राजाकडे राजपद नसेल आणि राजा जरी आजारी पडला तरी कुत्रं सुद्धा फिरत नाही..!
साहेब ज्यांच्या विश्वासावर तो बाहेर पडतोय,ज्यांच्या निष्ठेवर त्याने विश्वास ठेवला आहे, ज्यांना लोक माझे सांगती... असे तो म्हणतोय ती आता त्याच्या सोबत राहतील का..?
साहेब गेली अनेक दशके ज्याच्या भवती राजकारण फिरते,ज्याच्यावर टीका केल्याशिवाय विरोधकांनाही प्रसिध्दी भेटत नाही,त्याला विचारात घेतल्याशिवाय राजकारणच करता येत नाही. अशा योद्याला आता सत्ताधारी मातीत लोळवण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन ,अगदी सर्व सरकारी यंत्रणांना घेऊन आखाड्यात उतरले आहेत.
पण साहेब लोक आणि त्याचे राजकीय विरोधकच म्हणतात की तो तेल लावल्याला पैलवान आहे. मग तो आता चितपट होईल का?
हो साहेब आजही त्याने पत्रकारांच्या समोर शड्डू ठोकला.
पत्रकार बांधवांनी विचारले की आता भविष्यात आश्वासक चेहरा कोण? त्यावेळी त्याने हात वर करून सांगितले की शरद पवार..
जणू विजयश्री झाल्यावर पैलवान जसा शड्डू ठोकतो तसाच.
ज्याचं खाणे,पिने, श्वास,ध्यास न्हवे तर सारे जीवनच राजकारण आहे तोच आता कोणते राजकारण खेळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्याला कुणी चाणक्य म्हंटले तर कुणी षडयंत्री म्हंटले. कधी दगाबाज... धोकाबाज तर कधी खोटारडा म्हंटले. साहेब त्याने जे पेरले तेच उगवले. साहेब आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे.
साहेब तुमच्या विचारांचा मानस पुत्र म्हणून ज्याची ओळख आहे तो आता शत्रूच्या चक्रव्यूहात अडकलाय. साहेब एक गोष्ट महाभारतातील ऐकली होती की अभिमन्यूला अर्जुनाने चक्रव्यूहात जाण्याचा मार्ग अर्थात चक्रव्यूह भिडण्याचा मार्ग सांगितला होता. परंतु त्यातून बाहेर पडण्याचा अर्जुन सांगू शकला नव्हता. साहेब तुम्ही तुमच्या मानसपुत्राला हे सांगितले आहे ना..? की चक्रव्यूहातून कसे यशस्वी बाहेर पडायचं?
साहेब तो येतोय गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या जवळ तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी. ज्या कृष्णा- कोयनेच्या काठावर उभं राहून तुम्ही आधुनिक महाराष्ट्राचा सुसंस्कृत इतिहास निर्माण केला. त्याच प्रीतिसंगमावर येवून आज तो झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त करून तुमच्या विचारतील महाराष्ट्र साकार करण्यासाठी.
साहेब,
एक गुरू म्हणून त्याला एवढा आशीर्वाद द्या
त्याच्या धमण्यातल्या रुधिरास खल भेदण्याची आस द्या.
सामर्थ्य त्याच्या शब्दास आणि अर्थ त्याच्या राजकारणास द्या.
तुमच्याच विचारांचा पाईक...
- अक्षय जहागीरदार 📱 ७३५०००२१४५
🔖 Tags & Keywords
मराठी: यशवंतराव चव्हाण, अक्षय जहागीरदार, पत्रलेखन, यशवंतराव चव्हाण पत्र, मराठी साहित्य, प्रेरणादायी पत्र, राजकीय संघर्ष, शरद पवार, मराठी लेख
English: Yashwantrao Chavan, Akshay Jahagirdar letter, Marathi literature, Inspirational letter, Political struggle, Sharad Pawar, Motivational writing, Marathi blog

0 टिप्पण्या