नीरव सांज ढळताना...
नीरव सांज
ढळताना
आभाळ
सांडलं खाली
आणि
भळभळून आली
जखम एक
ओली...
दिवस ओलांडून आलेला संध्येचा शीतल प्रहर... दिवसभराच्या उन्हाने काळवंडून गेलेल्या राईवर सायंकाळचा गारवा झरू लागताच वातावरण आपोआपच निवत चाललेलं आणि सर्वत्र सांडलेला मंद मंद गारवा अंगावर घेताना आठवणींचं वादळ मनाचा गाभारा भेदून थेट मेंदूला भिडलेलं... हातचं काम अद्याप संपलेलं नाही पण मन एका वेगळ्याच विश्वात रमू लागलेलं... कुठं असेल ती आता, अशा ढळत्या सांजसमयी? खरं तर ती आता कुठच नाही! हे माहीत असूनही जगाच्या या पसाऱ्यात तिला शोधणारं मन कसं आवरावं कोणी...? या अफाट विश्वात तिचे अंश शोधूनही सापडेल का खरोखरच? तरीही ती सोबत असल्याचा भास जगण्याचं भांडवल होऊन जातेच कुणासाठी तरी...! दिवस येतात आणि जातात पण आठवणी कधीच सरत नाही, सरू शकतही नाही!
सांज भराला आली म्हणजे गायी गावाकडे परतू लागतात. पाणंद रस्त्यावरून गेलेला कळप आणि कळपातील गुरांच्या खुरांनी उडालेली धूळ साऱ्या गावभर सांडून जाते. धूळीच्या रांगा आकाशाला जाऊन भिडतात. एव्हाना पाखरं दिवसभराचा शीण घालवण्यासाठी झाडांवर परतलेली असतात. एका थोरल्या झाडावर झालेला बगळ्यांचा गलका वातावरण भारून टाकतो. बगळ्यांची कलकल कानात शिरून थेट मेंदूला भिडते आणि मग तो कोलाहल नकोसा होऊन जातो. देवळाच्या पारावर कुणीतरी दिवा उजळून जातो. पूर्वी सायंकाळी देवळात दिवा नेण्याची प्रथाच होती. लहानपणी हे काम मी अनेकदा केलेलं आहे. एका कौलारू घरातून बाहेर पडणाऱ्या धुराने आभाळ धूसर होताच चांदण्यांची सहल दाराशी आलेली! ‘माणूस मेल्यावर चांदणी होतो!’ ‘आपणही मेल्यावर चांदणी होऊ का?’ कोवळ्या मनास पडलेला हा हळवा प्रश्न आजही मनात रुंजी घालत आहे! आमच्या घराचे अंगण बऱ्यापैकी प्रशस्त होते. उन्हाळ्यात बहुतांश सारेच तिन्ही सांजा झाल्यावर अंगणाच्या आश्रयास यायचे. चांदण्या रात्री अंगणात झडणाऱ्या पंगती वेगळीच अनुभूती देऊन जायच्या. अनेकदा तर गव्हाच्या राशीसाठी रात्री शेतावरही पंगती उठायच्या. रॉकेलवर चेतणारी गॅसबत्ती संपूर्ण शिवार उजळून टाकायची. उन्हाळ्यात एखाद्या घरी दुसऱ्या दिवशी लग्नसोहळा असेल तर अवघा गाव रात्रभर जागायचा. वराकडील वरात हळदीच्या रात्रीच दाखल झाल्याने पाहुण्यांच्या सरबराईत गावकऱ्यांची धावपळ होऊन जायची. रात्रभर मेंदी रेखाटण्यासाठी जागणाऱ्या मुलींकडे मी पाहात राहायचो, कुठल्याशा कुतूहलाने....! दुसऱ्या दिवशीची मृण्मयी सांज थेट वधू माता-पित्यांच्या डोळ्यांत उतरलेली...!
दिवस जातात, काळ बदलतो परंतु सांज कधीच रंग बदलत नाही. आजची सांजही जुनीच आहे. पण, तिला नवा साज आणि नवा बाजही आहे. सूर्य कलतीला येताच वारा सावध पावले टाकू लागतो आणि आभाळात विविध रंगांची उधळण होते. शुष्क ढगांचे ढीग एकमेकांना अंग घुसळून झाल्यावर मनमोहक आकार घेऊ लागतात. ‘ढगांमध्ये कोणी पेरली असेल ही किमया?’ सारे वातावरण धीरगंभीर... तितक्यात रानवाऱ्याची एक झुळूक पानाफुलांना स्पर्शून जाते आणि संथ वाहणारी नदी एकाएकी भानावर येते. ‘कसं जमत असेल नदीला सांजसमयी निरागस होणं?’ पाण्यात आभाळ सांडताना नदीची अवघी कायाच आभाळमय होऊन गेलेली...! ‘नदीची खोली मोजता येईलही पण नदीत सांडलेल्या आभाळाची खोली कशी मोजावी कोणी?’ सारं वातावरण शांत नि स्तब्ध आणि अशात पाण्यात पाय पसरून मी नदीच्या दु:खाशी एकरूप होऊन गेलेलो...! तेवढ्यात एक मासा सूर मारून जातो आणि नदीत सांडलेलं आभाळ हेलकावे खाऊ लागतं कितीतरी वेळ...!
दिवस
अस्ताला गेला
तसे रान
सारे मंतरले
तोडूनी
आभाळ आज
डोहात कोणी
अंथरले?
सर्वत्र
नीरव शांतता आहे आणि चोरपावलांनी तिन्ही सांजा चाल करून येत आहेत! अंधार गडद
झाल्यावर नदीला काजव्यांचा विळखा पडतो. त्यांतील काही काजवे नदीच्या पाण्यावर फेर
धरू लागतात. संध्येच्या साक्षीने हा सोहळा
रोजच होत असेल का साजरा? निरभ्र आकाशात टिपूर चांदणं पडताच
नदीच्या आत अवघं ब्रह्मांड दाटून आल्याचा भास होऊ लागतो. एरवी, ढगात लपणारा चंद्र आज विलक्षण खुलून आला आहे आणि मनाला भुरळ घालणारं बिंब
पाण्याचं अस्तर सोलून तळाला जाऊन भिडलं आहे! तितक्यात एक तारा तुटला आणि नदीत
मिसळून गेला. असा हा सांजसोहळा अनुभवताना तुझा हात हाती असता तर.... घुबडाच्या
घुत्काराने मी भानावर आलो. घूऽऽऽक घूऽऽक हा विलक्षण आवाज कानात शिरून मस्तकात गेला
आणि एका अनामिक भीतीने अंगावर सरसरून काटा आला. पावले आपोआपच घराच्या दिशेने
वळली...
सांजा
तिन्ही झाल्या
नदी
चांदणं साठवते
आणि अशात
मला
गाव तुझा
आठवते!
- पुंडलिक आंबटकर (नागपूर)
९८८१७१६०२७ 🌅

2 टिप्पण्या
काळजाचा वेध घेणारा लेख. खूप दिवसांनंतर साहित्य म्हणून चांगलं काही तरी वाचायला मिळालं.
उत्तर द्याहटवाthanks your feedback dearest anonymous person
हटवा-pundlik ambatkar