
आठवणींचा ताज मागे ठेवून मामी आमच्यातून निघून गेल्या. कालच आम्ही मामींना भेटायला निघालो होतो. "काय करू गं मामींसाठी…?” मी आईला विचारलं. आई म्हणाली “शिरा आणि उप्पीट कर, जे आवडेल ते खातील.” मी पराठे पण केले. तितक्यात मामांचा फोन आला नि मामी आता केवळ आठवणीतच उरल्याचं लक्षात आलं. मामींची आवड-निवड कधी कुणाला कळलीच नाही. जे असेल ते, जे उरेल ते आवडीनं, आनंदानं खायच्या. आम्हा भाचे-भाच्यांना मात्र जे हवं ते करून खाऊ घालायच्या.
साडीचा रेशमी पोत पहावा. जमिनीची कसदार माती पहावी. सोन्याची २४ कॅरेट शुद्धता पहावी आणि मामीचे घरंदाज संस्कार पहावेत. मामींनी आम्हाला कधी आरेतुरे केले नाही. उलट भाच्यांचा मान असतो म्हणत आम्हालाच नमस्कार करायच्या.
शाळेला सुट्टी लागली की मामा आम्हाला न्यायला यायचे. मग दोन महिने मज्जाच मज्जा. मामींच्या हातची शेवयांची खीर म्हणजे आम्हाला पर्वणीच. दूध, गूळ, तूप आणि बक्कळ प्रेम मिसळून केलेल्या शेवयांची सर आज पंचपक्वान्नांही येत नाही. मामी जे करायच्या ते अगदी आनंदाने, मनापासून, समरसून करायच्या. मामींच्या हातचं तांबड्या हुलग्याचं माडगं, उडीदाचं घुटं, चकोल्या, सजोऱ्या, अळूवड्या खाण्यासाठी तर आमच्या उड्या पडायच्या. खाऊन झालं की आम्ही मामींच्या मागे लागायचो, “मामी अंबारीत चला ना..!” मग मामी आम्हाला अंबारी उघडून द्यायच्या. अंबारी म्हणजे आजोबांचं जुन्या वस्तूंचं अजब संग्रहालय. अंबारी हे वाड्यातील प्रचंड मोठं तळघर होतं. आम्हाला खूप आवडायचं ते. तिथं हजारो भलीमोठी सुबक सुरेख घड्याळं, तांब्या-पितळेची भलीथोरली भांडी, सजावटीच्या वस्तू, ग्रामोफोन्स, रेडिओ, आयुर्वेदिक औषधांच्या चंदनी पेट्या, नक्षीदार पानपुडे, चांदीची नक्षीदार भांडी एवढंच काय कस्तुरी देखील होती. काय नव्हतं ते विचारा....या नि अशा असंख्य वस्तू निरखताना दुपार टळून जायची. मग मामी आम्हाला बोलवून दूध प्यायला देत आणि आमराईत घेऊन जात.
आमराईत आंबे आणि लाल पेरूच्या बागा होत्या. आम्ही मनसोक्त आंबे, पेरू खायचो. घरी घेऊन यायचो. घोषा घराणे असल्याने बाहेर जाताना मामी परकाळा पांघरत. पांढऱ्या शुभ्र रेशमी कपड्याच्या ओढणीत मामी स्वतःला नखशिखांत झाकून घेत. आम्हाला फार गंमत वाटायची. आम्ही पण तो परकाळा पांघरायला प्रयत्न करायचो. अन् पाय अडकून धप्पकन पडायचो. मग मामी कडेवरून आमराईत न्यायच्या. रोज कुणी ना कुणी मामींच्या कडेवर असेच असे. इतकंच नाही तर भाच्यांना कडेवर घेऊन ८, १० किलोमीटर अंतर चालत जायच्या आणि हौसेने भाच्यांचे फोटो काढून आणायच्या.
आजी-आजोबांची कमतरता मामींनी आम्हाला कधीच भासू दिली नाही. त्यावेळी तिथे वाड्यात आम्ही १५-२० मुले असायचो. एवढ्या मुलांना आणि मोठ्यांना खाऊ-पिऊ घालताना मामी आम्हाला कधीच थकलेल्या दिसल्या नाहीत. सतत हसत-आनंदी असायच्या. मामी अप्रतिम सुंदर होत्या. मामीचं सौंदर्य मोनालिसाला लाजवेल असं होतं. सोनचाफ्याची सुवर्णकांती, बाणेदार नाक, नाजूक जीवनी आणि भावपूर्ण तेजस्वी डोळे..शांत,संयमी, विवेकी,विलोभनीय व्यक्तिमत्व म्हणजे मामी..!
आजी-आजोबांची कमतरता मामींनी आम्हाला कधीच भासू दिली नाही. त्यावेळी तिथे वाड्यात आम्ही १५-२० मुले असायचो. एवढ्या मुलांना आणि मोठ्यांना खाऊ-पिऊ घालताना मामी आम्हाला कधीच थकलेल्या दिसल्या नाहीत. सतत हसत-आनंदी असायच्या. मामी अप्रतिम सुंदर होत्या. मामीचं सौंदर्य मोनालिसाला लाजवेल असं होतं. सोनचाफ्याची सुवर्णकांती, बाणेदार नाक, नाजूक जीवनी आणि भावपूर्ण तेजस्वी डोळे..शांत,संयमी, विवेकी,विलोभनीय व्यक्तिमत्व म्हणजे मामी..!
मामींना जीवनाचं तत्त्वज्ञान पक्कं ठाऊक होतं. जे जीवन स्वीकारलंय ते आनंदाने जगायचं. जे कर्तव्यकर्म आहे ते आनंदाने करायचं ही मामींची वृत्ती त्यांना आनंदी ठेवत होती. मामींनी मुलांमध्ये दुजाभाव कधीच केला नाही. स्वतःच्या मुलांपेक्षा आमची जपणूक अधिक जिव्हाळ्यानं केली. आम्हालाही अशा मामी होता यावं आणि भाच्यांना हक्काचं आजोळ मिळावं. संस्कारांची शिदोरी मिळावी. इतकीच इच्छा..!!
-विजया पाटील, कराड
0 टिप्पण्या