Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

कोयता | मराठी कथा | कथाकार सचिन वसंत पाटील

कोयता, मराठी कथा, कथाकार सचिन वसंत पाटील

सूर्य बुडाला. अंधार अस्वलाच्या पावलांनी आला आणि कारखान्या शेजारच्या फडकऱ्यांच्या खोपटास्नी मिठी मारून बसला. सांजवारा सुटला. वाऱ्यानं खोपटांवरचा चघाळा घोंगड्याच्या दशा हलाव्यात तसा हलू लागला.

    गाड्या फडातनं काढून बाया कधीच्या परतल्या. धारापाणी सैपाक करून, जेवनखाण आवरून झोपायच्या तयारीला लागल्या. खोपटाच्या अंगणात बसून सुली लहानग्या भावाला थापटत होती. थापटता-थापटता तिचं विचारचक्र सुरू होतं... अजून कसं आपलं अण्णा आलं नाहीत? गाड्या लवकर खाली झाल्या नसत्याली की कारखान्याची मिलच बंद पडली?... एवडा कसा उशीर?...

    सोळा-सतरा वर्षाची सुली. फडकऱ्याच्या घरात शोभत नव्हतं असलं सौंदर्य. उकिंरड्यावर वावरी उगवलेल्या आंब्याच्या सोनेरी रोपागत तरतरीत तजेलदार अंग. सोन्याहून पिवळं. मुळचाच सुबक रेखीव बांधा. गुलाबाची लहानशी कळी उमलून रूप यावं, हिरव्या पानांत, काट्याकुट्यांत उठून दिसावं, असं देखणं रूप. हे रूप बघून नकळत आजूबाजूच्या सगळ्या नजरा तिच्यावर रोखल्या गेल्या. ताठ मान आणि चालताना नकळत हेंदकाळणाऱ्या हालचाली... सारंच लाजवाब. आगळंवेगळं. कारखान्या समोरल्या त्या कुबट, गलिच्छ तळावरच्या वातावरणापेक्षा कितीतरी पटीनं वेगळं. चिखलात, राडीत कमळ उमलावं तशी सुली.

    आज्जी आजारी असल्यामुळं सुलीच्या आईला अचानक माहेरी जावावं लागलं. नकळत सगळी जबाबदारी सुलीवर येऊन पडली. न्हायतर ती आशीच अर्दालिंबू म्हणून फिरत रहायची. कधी आई बरोबर ऊसाच्या मोळ्या बांधत, वाडं गोळा करत तर कधी अण्णांचा धारदार कोयता हाती घेऊन ती कनाकन ऊस खापलायची. एका घावात दोन कंडकं करायची... पण आई गावाला गेल्यामुळं आता सगळंच थांबलं. एका खेळकर पोरीवर घराची सारी जबाबदारी येऊन पडली. सैपाक कसा करावा? कालवण कसं करावं? भाकरी कशा थापाव्यात? भाताला मीठपाणी किती घालावं?... हे तिला आईनं आधीच शिकवलेलं. त्यामुळे ते तिला चांगलंच माहीत होतं. बाकी आईचं बघूबघून ती सगळं शिकली होती. बाईच्या जातीची उपजत जाण तिच्या ठायी होती. आणि चार वर्षाच्या धाकट्या भावाला सांभाळणं हे तर तिचं रोजचंच काम.
    रानामाळात, मोकळ्या वातावरणात वाढलेली सुली दिसायला किरकोळ दिसत असली तरी घरातलं सैपाकपाणी, जनावरांची उसाबर ही कामं ती करू शकते, याची तिच्या आईला खात्री होती. म्हणूनच सगळी जबाबदारी पोरीवर टाकून ती गावाला गेली होती. आईच्या उसाबरीसाठी तिला जाणं भागच होतं. म्हातारीनं महीना झालं हातरूण धरलेलं. लेकीचा जोसरा काढलेला. कधी कोरभर खायाची. घडाघडा बोलायची. वाटायचं, आता हाय बरं, काय होत न्हाय म्हातारीला! तवर सांजकरून आणखी जास्ती व्हायचं. धापून-धापून छातीचा भाता व्हायचा. सुपात घेऊन पाकडल्यावानी वरला जीव वर, खालचा खाली. भिरमाटल्यागत बडबडायची...पावलांचा आवाज येतोय, कोणतरी मला न्ह्यायला आलंय, म्हणायची! मग म्हातारी भोवतीनं लेकी-सुना, नातवंडं कोंडाळं करून बसायची. आत्ता जीव जातोय का मग जातोय... म्हणूनच सुलीची आई असा ऊसतोडणीचा सिझन मधीच सोडून माहेरी गेलेली.

    सकाळी लवकर उठून अण्णा फडावर जातात. मग सुली घर, अंगण स्वच्छ लोटून काढते. घर कसलं, पालापाचोळ्याची खोपच ती. पण अण्णांनी त्यासाठी विशेष कष्ट घेतलेलं. आहे त्या काठ्या-चिवाट्या, पटकुरांचा कौशल्यानं वापर केलेला. मोठाले येळू चिरून कामठ्या बनवलेल्या. दोन कामठ्यामधे ऊसाचा पाला भरून कुडासाठी छानशा झापी तयार केलेल्या. आईनं त्यावर शेणकाला लिंपून गुळगुळीत भिंती तयार केलेल्या. अण्णानं वरून पाणी गळू नये म्हणून एक डिजिटलची व एक खतांच्या पोत्यांची पांढरी पट्टी टाकलेली. ती उडून जाऊ नये म्हणून त्यावर छोटे-छोटे दगड ठेवलेले. तारेचे कट घातलेले. एक माणूस वाकुन आत जायायाय पुरतं लहानसं दार. त्याला लावायलाही एक सुंदर छोटी झापडी. आणखी एक या झोपडीचं वैशिष्ट्ये म्हणजे आतमध्ये प्रकाश येण्यासाठी तिला एक खिडकी होती. अण्णानं त्यासाठी एक प्लॅस्टिकचा जाडसर कागद वापरला होता. म्हणजे पाऊस आला तरी खिडकीतून पाऊस आत येणार नाही पण दिवसा उजेडी प्रकाश मात्र आत येईल, अशी त्या खिडकीची योजना होती. या खिडकीमुळे खोपीच्या आतलं सगळं बाहेरच्या उजेडासारखं लखलखीत दिसे. चुलीजवळ स्वयंपाक करता-करता जरा वाकुन त्या खिडकीतून बाहेर पहाता येई. कुणी आल्या-गेल्याची चाहुल घेता येई. दुरवरचंही दिसे. अगदी कारखान्याच्या गेटसमोरल्या मोठ्या रस्त्यावरची वरदळ सुद्धा दिसे. त्या खिडकीतून डोकावून-डोकावून बघणे, हा सुलीचा छंदच झाला होता.
    लोटून काढल्यावर सुली बैल बांधलेल्या जागचं शेण गोळा करायची. मग त्याचा पातळ शेणकाला करून ती घर, अंगण सारवून घ्यायची. उरलेल्या शेणाच्या ती जळणासाठी गोवऱ्या थापायची. अण्णानं रानातनं आणलेलं जळण-काटूक आणि या शेणगोवऱ्या यावर त्यांचा स्वयंपाक आरामशीर होई.

    अलीकडं या सुंदर घरात माणसांची वरदळ जरा वाढलीय. टोळीचा मुकादम हटकून घराकडं येतो. तो तरुण आहे. त्याचं लग्न झालं असलं तरी त्याची बायको त्याच्या जवळ रहात नाही. त्याची नजर घाणेरडी आहे. निदान सुलीला तरी तशी वाटते. त्याच्याकडं बुलट गाडी आहे. तिच्यावरनं तो ऐटीत फिरत असतो. बाकीच्यांपेक्षा त्याचे कपडे स्वच्छ असतात. तो आला मजी अण्णांबरोबर अंगणात गप्पा मारीत बसतो. आतबाहेर करणार्‍या सुलीवर तो एक डोळा ठेवून असतो. तिच्या हालचाली टिपत असतो... अण्णा त्याला काही बोलत नाहीत. तेनला हे कळत नाही का? की त्याच्यालेखी आपण एक अजाण पोर. तो एक करता-सवरता बापय. त्यात मुकादमाकडून अण्णांनी बरीच उचल घेतलेली आहे. हिशोबा-ठिशोबाच्या कामाचं निमित्त त्याला पुरेसं असतं. कधीमधी तो खिशातला मोबाईल काढून त्यावर जोरजोरात बोलत रहतो. दहा हजार, वीस हजार.. लाख... असे मोठमोठाले आकडे तो ऐकवित असतो.

    तो घरात आला की सुलीच्या हालचालींवर मर्यादा येतात. काहीवेळा तर तो सकाळी उठल्या-उठल्याच येतो. मग अण्णा त्याच्यासाठी सुलीला चहा करायला सांगतात. चहा करून दिल्यावरही तो हलत नाही. बिडी फुकत उगी हिकडल्या तिकडल्या गप्पा हाणीत रहातो. तो आत्ता जाईल, मग जाईल सुली वाट पहात रहाते...

    तो जास्ती वेळ थांबलाच तर मग सुलीला आंघोळपाणी करणंही अवघड होऊन बसतं. कधीकधी ती बिन आंघोळीचीच रहाते. तर कधी भीत-घाबरत कुडाच्या झापडी पलीकडे अर्धेमुर्दे अंग ओले करून घेते. पहाटे परसाकडला जातानाही तिच्या मनावर प्रचंड ओझं असतं. भोवतालच्या अंधारात काळी अस्वलं आपल्यावर झडप घालण्यासाठी टपलीत, असं तिला सारखं वाटत रहातं. आणि कारखान्यावर एवढ्या दाट वस्तीत दिवसा उजेडी बाई माणसानं परसाकडं जाणं अवघडच. जरी पोटात कळ आलीच तरी ती अंधार होईपर्यंत तिला दाबून ठेवते.

    अण्णा पहाटे-पहाटे बैलं गाडीला जुपुन निघतो. अंतरा अंतरावर असणाऱ्या सात-आठ खोपीतला एक गडी आणि एकेक बैलगाडी. अशी वरात निघते. एकापाठोपाठ एक... त्यापाठोपाठ असणारी मुकादमाची बुलट. लांब लांब जाणारा बुलटचा आवाज... बुडबुडऽ... बुडबुडऽ... बुड बुडऽ... मग तळ रिकामा होतो. सुलीच्या घरातली एक शेळी पोटुशी आहे. दिवस भरलेत. वील वाटतंय एक-दोन दिवसांत. शेळीचं बाळंतपण करण्यातही सुली तरबेज आहे. त्याची चिंता तिला नाही. पण ढिम्म दुपार तिला खायला उठते. तळावर क्वचित कोणी माणूस. शेरडू करडू, दुभत्या गायीम्हशी. एखांदी म्हाताकोतारी बाई. जनावरांच्या उसाबरीसाठी राह्यलेली. एवढेच सोबती.
    शेरडीची उसाबर आवरल्यावर सुलीला भर दुपार उदास, एकलकोंडी वाटते. वारा गप्प गप्प होतो. वातावरण गुढगंभीर राहतं. मधेच एखादं शेरडीचं कोकरू आईच्या आठवणीनं कातर होऊन ओरडतं नि गंभीर दुपारच्या पोटात कुणीतरी सुरा खुपसल्यासारखं वाटतं. उगी मन अस्वस्थ होतं. काही सुचत नाही. कुठे जावावं? कुणाबरोबर बोलावं? सुली कंटाळते. हळूहळू दुपार टळते. उन्ह मावळू लागतं. मग कारखान्यावरली उंडगी पोरं मोठ्या रस्त्यावरून हेलपाटे घालतात. पानपट्टी भोवताली टोळकं करून मावा खावून पिचीपिची थुकत बसतात. जातायेता खोपीत कुठं कोण दिसतंय का तपासून बघतात. अलीकडं एका टोळक्याला सुलीचा शोध लागलाय. वाटेवरून तिरकं तिरकं बघत ती हेलपाटे घालतात. सुली दिसताच तोंडात बोटं घालून शिट्ट्या मारतात. विनाकारण गाडीचा हाॅर्न वाजवतात. अलीकडं त्यांचा त्रास खूपच वाढलाय. कधी कुठलं हिप्पीवालं पोरटं येऊन हात धरेल सांगता येत नाही. पण सुली घरात कुणालाच सांगत नाही. बोलत नाही. वाटेवरल्या पोरांच्या नजरेपासून लपत-छपत त्रास सहन करत रहाते. घरातलं सैपाकपाणी, जनावरांची उसाबर करत रहाते. अण्णाला काही कमी पडू देत नाही.

    गावाकडं हुतो तवा सुलीची आज्जी म्हणत होती, 'पोरगी न्हातीधुती झालीय अण्णा.. अवंदा उजवून टाक.. ज्याचं धन जाऊंदे त्याच्या घरी!'

    तिनं लगोलग तेंच्याच टोळीतला एक नवरा मुलगा शोधून काढला. आज्जीच्या भणीकडनं लांबणं पावन्यापैचा संमंद हुता. नंदू त्याचं नाव. सहा फुट उंचीचा नंदू आडदांड होता. ओबडधोबड हातपाय आणि भरीव मनगट असलेला ह्यो बापय खडबडीत तोंडाचा होता. अंगावर, हाता-पायांवर भरपूर केस होते त्याच्या. काळ्याकुट्ट गुंड दगडावर बचकभर आकाराचा बटाटा ठेवावा तसं त्याचं नाक होतं. पण ऐन पंचवीशीतील हा नंदू कामाला वाघ होता. पहाटं पहाटंला कोयता घेऊन शेजंला भिडला की टण-दीड टण ऊस आडवा केल्याशिवाय मागं हटायचा नाही. हेच्या कोयत्याचा फडात कायम पयला नंबर. खरं ह्यो कोयता घेऊन फडातनं निघाला की बारकी पोरंटोरं त्याला बघून घाबरायची.

    सुलीही त्याच्यापासून दबूनच असायची. त्याचे तांबरलेले डोळे बघितले की तिला भीतीच वाटायची. नवरा म्हणून काय, पण तो तिला शेजारी म्हणूनही आवडत नव्हता. उभ्या आयुष्यात ती त्याच्याशी कधी बोलली नव्हती. पण आजीची अशी समजूत होती की, तो कामाला वाघ आहे. त्याच्या मागं पडलेल्या ऊसाच्या मोळ्या बांधायला दोन-दोन बायका पुरत नाहीत. पाण्यागत पैसा मिळवील त्यो. राणीगत ठेवील पोरीला... अशी आजीची समजूत होती.
    जोडीदार कसा असावा याचीही तिने काही मनातल्या मनात स्वप्ने बघितलेली. गोरागोमटा. उंचापुरा. भरदार छातीचा. मानेवर केस रूळणारा. पिक्चरातल्या चाॅकलेट हिरोवानी. हिरव्यागार कुरणातून पांढर्‍या घोड्यावर स्वार होऊन येणारा. जवळ येऊन गुडघे टेकुन, दोन्ही हात पसरून म्हणणारा, 'ये प्रिये येऽ... अशी जवळ ये...'

    आजीनं लग्नाची ही गोष्ट एकदा अण्णांच्या कानावर घातली. नंदूबद्दल गुणगान गाऊ लागली. तर अण्णा म्हणालं,

    'आजून कुठं मोठी झालीय ती, ल्हान पोरच हाय!'
    'ल्हान का असतीया, हिच्याबरोबरच्या पोरी बगजा...'
    'नेमापरमाणं अठरा वरसं तरी हुंदेल. जाऊंदेल अजून दोन पावसाळं!'
    'हिच्याबरोबरच्या पोरी बगजा.. लग्नं हून पोरंबी झाली तेंनला...'
    'जगाचं काय असायचं ते आसुंदे, माज्या पुरगीचं लगीन वय पुरं झाल्यावरच हुईल!'

खूप खूप बरं वाटलं सुलीला. बापाच्या मयेनं गळा दाटून आला. कसायाच्या तावडीत घावलेलं कोकरू हातातनं सुटावं आणि लांब जंगलात पळून जावावं, तसं सुलीला वाटलं.

    आठ वाजून गेले असावेत. अजून कसा आला नाही अण्णा! फडावरलं कोणच गाडीवान आल्यालं न्हाईत खरं. त्यामुळं गाड्या खाली झाल्या नसाव्यात... निदान मुकादम तरी फटफटीवरून यायला पायजे होता. काही निरोप-बिरोप घिऊन... त्योबी अजून आलेला नाही!

    मांडीवर झोपलेल्या आपल्या धाकल्या भावाला थापटत, त्याचे केस कुरवाळीत सुली विचार करीत होती. त्याला आता झोप लागलेली. तरी वेळ जावा म्हणून ती त्याला थापटीत होती.
    आजूबाजूच्या खोपटातल्या चुली विझत चालल्या होत्या. क्वचित कुठे हालचाल जाणवत होती. बोलण्याचा आवाज बंद झाला होता. दारापाठीमागली शेळी रवंथ करीत खाली बसली होती. तिने आता डोळे मिटले होते. चुलीवर ठेवलेली चिमणी एकाकी जळत होती. वाऱ्याच्या झुळकेवर तिची ज्योत आळोखे-पिळोखे देत होती. ती ही आता आळसावली होती. पोराला हाथरूण टाकायला म्हणून सुली आत गेली. कुडाशेजारची सप्पय जागा तिने निवडली. खाली पडलेलं खुरपं आणि कोयता तिने कुडाच्या कामठ्यात अडकवून ठेवला. खाली अंथरलेल्या पटकुरावर तिने एक मऊमऊ दुपटं अंथरलं. आणि त्यावर बाळाला घातलं.

    लांबनं कुठूनतरी बुलटचा आवाज येत होता. हळूहळू तो मोठा होऊ लागला. बुडबुडऽ.. बुडबुडऽ.. बुड बुडऽ... सुलीनं वाकुन खिडकीतनं बघितलं. काळ्यामीट्ट अंधाराला चिरत बुलटचा फोकस पुढंपुढं सरकीत होता. गाडीच्या आवाजावरनं सुलीनं ताडलं, ही मुकादमाचीच गाडीय! हळूच जाऊन ती चुलीजवळ बसली. बाहेरचा अंदाज घेऊ लागली.

    गाडी आली ते सुलीच्या दारातच येऊन उभी राह्यली. बाहेरून हाळी आली,

    'सुलेऽ.. ये सुलेऽ...'

पहिल्यांदा तिनं हाक ऐकुन न ऐकल्यागत केलं. पुन्हा दोन-तीन हाळ्या आल्या. आता बोललंच पाहिजे... ती वाकुन पुढे झाली. दाराच्या वर्तुळातून तिचे दोन डोळे मांजरागत चकाकले. भितभित तिनं विचारलं,

    'कोण हाय तीऽ...'

'आगं मी हाय, मुकादम! तुझ्या अण्णाला यायला उशीर हुईल. टायर फुटल्या गाडीची. सकाळपतूर हुईल दुरूस्त. रातभर तिथंच थांबावं लागंल. जिवून झोप म्हणून सांगितलंय तेनं!'
    'हांऽ.. हां.. बरंऽ... बाकी समद्या गाड्या कशा आल्या न्हाईत मग...' सुलीनं भितभित विचारलं.
    'येतील आत्ता एवड्यात.. ह्या मुरगाळ्यावर आल्यात नव्हका!'
असं म्हणून मुकादमानं गाडीला किक मारली. आपल्या खोपीपशी जाऊन तो थांबला.

आता अण्णा सकाळीच येणार, रात्रभर आपुन खोपीत एकटंच, या धास्तीने सुलीच्या अंगाचा थरकाप उडाला. यापूर्वी कधीच आसं झालं नव्हतं. अण्णा नसलं तरी आई हमखास घरात असायची. त्यामुळं तिला निर्धास्त वाटायचं. पण अशी वेळ कधी आली नव्हती... ती घाबरून गेली. पाय थरथरू लागले. काय करावं? आजच्या दिवस शेजारच्या कुणाच्यातरी खोपीत झोपायला जावावं का? पर आपली खोप, जनावरं वार्‍यावर सोडून दुसऱ्याच्या घरात कशाला झोपाय जावावं. त्यात ती शेरडी एक याला झाल्या. कुठं रात्रीच पाणटुळ बाहीर आलं तर... आणि समजा येली यवस्थित आणि वार पडंना झाली... न्हेली कुत्र्यानं वडून तर... तिला विचारच सहन झाला नाही! गेल्यावर्षी सुक्यानानाची कुत्र्यांनी फाडून खाल्लेली शेरडी आठवली.

जेवा-खायाचं सोडून ती शेजारच्या रघूआप्पाच्या खोपीत घुसली. सुनंदा वैनीला तिनं विचारलं,
    'जेवलासा का?'
    'हे न्हवं आत्ताच जेवले बग..'
    'आणि तू गंऽ... तू जेवलीस का?'
    'जेवले मी बी!'
सुलीनं दाबून खोटंच सांगितलं. उगी ती, का? कुणीकडं?... म्हणून लांबड लावाय नगो म्हणून.
    'गाड्या काय आज लवकर येणार न्हाईत म्हणं..'
    'व्हयगं म्याबी ऐकलं मघा.. अण्णाच्या गाडीची टायर फुटल्या जणू... बाकी येतील की सगळी.'
    'व्हयवं, आता कवा दुरूस्ती हुतीया कुणास ठावं? कारखान्याची गाडी येणार.. मग जॅक लावून दुसरा टायर घालणार. मग गाडी कारखान्यावर यिऊन खाली हुणार!'
    'व्हय, रात उजडंल तेला! झोप तू आपली निर्धास्तवाणी... का आमच्यात येतीस आजच्या रोज झोपायला?'
    'आली आस्ती खरं, ती शेरडी एक याला झाल्या.. बाळाला आणि घेतलं पायजे. जागा पुरायची न्हाय तुमच्या खोपीतबी. झोपते आपली माजी मी...'
    'झोप, तेला काय हुतंय... आणि आमी हायच की हितं. काय लागलं केलं तर कवाबी हाक मार... लगी येतो!'
    'आईचा काय फोनबीन आल्ता काय? कशी हाय म्हातारीची तब्येत तेन काय?'
    'परवादिशी आल्ता... मुकादमाच्या मोबाईलवर. हाय बरं म्हणत्या. कवा बिगाडतंय कवा सवंनी आसत्या... हाय तसंच म्हणायचं!'
    आसंच काहीबाही दोघी बोलत बसल्या. तोवर बैलगाड्या आल्याचा आवाज आला. बैलांच्या गळ्यातील चाळ, साठ्यातला पत्रा वाजताना ऐकू येऊ लागला. 'आरं शिरप्या है, चलरं!' कोणतरी गाडीवान म्हणीत होता.

    सुली आपल्या खोपीपाशी उभी राह्यली. आपला अण्णा आज येणार नाही, हे माहीत असूनही तिनं सगळ्या गाड्या नजरेनं धुंडाळल्या. त्यात आपला अण्णा कुठं दिसतोय का याची खात्री केली. पण घोर निराशा पदरी आली. हळूहळू सगळ्या गाड्या आपापल्या जाग्यावर गेल्या. उदास मनानं पाय ओढत ती आपल्या खोपीत आली. गाड्या आल्यामुळे तळ काही काळ जिवंत झाला. काही वेळ जनावरांना वैरण पाणी देतानाचे आवाज. पुरूष माणसं जेवताना बोलत असलेली. टोळीत काही दारूडेही होते. येताना टाकुनच आलेले. विनाकारण आपल्या बायकापोरांना शिव्या हासडीत होते.
    काही वेळातच सारे चिडीचूप झाले. दमुन भागुन आलेली आंगं विसावली. मेल्यागत पडली. सुलीनंही पोतेल्यातला चार घास भात खावून घेतला. भुकच नव्हती. तसाच पाण्याच्या घोटा बरोबर गिळला.

    नऊ-साडेनऊ झाले असावेत. पाण्यात पडल्यागत तळ शांत झालेला. सगळं वातावरण थंडगार झालेलं. मधेच एखाद्या बैलाच्या गळ्यातील घुंगरांची किनकिन नि रातकिड्यांची किरकिर तेवढी ऐकू येत होती. बाळाच्या शेजारी पटकूर हातरून तिने पाठ टेकली. तोवर शेरडीची धडपड ऐकू आली... अगं बाईऽ वैरण टाकायची राह्यलीच की! असं म्हणून ती पुन्हा उठली. शेरडीला बारीक-बारीक कोंबऱ्या आणि शेवरीची मूठ टाकली. शेरडी कुरूकुरू शेंडे कुरतडू लागली.

    काहीवेळ ती तिच्याकडे बघत थांबली. पुन्हा खोपीबाहेर आली. अंगणात उभी राह्यली. वातावरण चिडीचूप झालेलं. तिने आभाळाकडं बघितलं. नुकतीच पौर्णिमा होऊन गेल्यामुळं टिपूर चांदणं पडलेलं. चंद्राचा गोल कात्रीनं कापावा तसा एका बाजूनं कातरलेला. त्याचा पिवळसर प्रकाश झिरपत झिरपत खोपीवर पडला होता. चांदण्याच्या त्या मंद प्रकाशानं सारा तळच न्हाऊन निघालेला. खोपीवरला वाळला पाला त्या उजेडानं चमकत होता. आणि सुलीच्या नकळत खोपीच्या सावल्या आपले पाय पसरत चालल्या होत्या.

    ती आत आली. चुलीवरची चिमणी तिने विझवून टाकली. अंथरूणावर पहुडली. तिला आपल्या आईची आठवण झाली. आईनं जाताना दिलेल्या सूचना आठवल्या, झोपताना चिमणी बंद करायची. बाहेर कुणी बोलावलं तर जायाचं नाही. ओळख असल्याशिवाय बोलायचं नाही. असं बरंच काही... ती अंथरुणावर पडल्या पडल्या आठवत होती.

    हळूहळू झोप येऊ लागली... डोळे पेंगुळले. पहाटेच्या निबिड अंधारातली अस्वलं आठवू लागली... त्यांचे नख्या असणारे पंजे. तोंडावरचे काळेभोर केस. माणसांसारखी दोन पायांवर उभी राहून ती पुढे पुढे चालत येतायत...
    ती दचकून उठली. घामानं डबडबलेली. तोंड पुसलं. थोडं पाणी पिऊन घेतलं. पुन्हा अंथरुणावर पडली. तिने मन घट्ट केलं. कशाला घाबरायचं नाही, असं ठरवलं. पुन्हा झोपी गेली.

    मध्यानरातचंच कसल्यातरी आवाजानं ती दचकली. काळजात चमक उठली. दाराबाहेर कुणीतरी खोकल्यासारखं वाटलं. तिने डोळे उघडले. अंधाराचा ती अंदाज घेऊ लागली. कोण असावं इतक्या रात्री. का आलं असावं? बुलटवाला मुकादम असेल का? का आला असावा? एवढ्या रात्री? त्याला माहीत आहे, आज अण्णा-आई घरात नाहीत. त्या संधीचा फायदा उठवायचा आहे का त्याला?

    मनात प्रश्नांचं काहूर माजलं. ते झटकून ती अंथरुणावरून उठली. खिडकीपाशी गेली. तिने एक डोळा बाहेर लावला. कोणच कसं दिसेना? ती तशीच थोडावेळ थांबली... तिला वाटलं, कारखान्यावरची कुणी उडाणटप्पू पोरं आली असावीत का? अलीकडं लईच चेकाळल्यात. काय नेम सांगावा तेंचा? ती तशीच थोडावेळ कोणोसा घेत थांबली. पण परत काहीच हालचाल नाही. तिचे डोळे मिटू लागले...

    तिथनंच गुडघ्यानं रांगत-रांगत ती अंथरुणावर आली. कलंडली. तिची झोप लागली. पुन्हा थोडा वेळ गेला. दार ढकलल्यासारखा आवाज आला. पाल चमकावी तशी ती चमकली. खडबडून उठली. जोरात ओरडली, 'कोणाय तेऽ..’बाहेर कुणी पळून गेलेल्या पावलांचा आवाज. लांब लांब जाणारा. तिने खिडकीतनं बघितलं तर बाहेर कुणीच नव्हतं. टिपूर चांदणं तळावर पसरलेलं...

    ती अंथरुणावर येऊन बसली... कोण असावं ते? मुकादम? कारखान्यावरची पोरं? की आणखी कोण? आज्जीनं काढलेला नवरा नंदू तर नसेल?... काळाकुट्ट. बसलेल्या नाकाचा. अंगावर केस असणारा. अस्वलासारखा दिसणारा! तिची मती गुंग झाली. कोण असावं? एवढ्या रात्री येऊन त्याचा काय उद्देश असावा? पेपरला येणाऱ्या स्त्रीयांच्या बातम्या, टिव्हीवर सांगितलेल्या बलात्काराच्या घटना ती ऐकून होती. ती विचार करू लागली... असं घाबरून राहिलो तर आपणही उद्या पेपरची बातमी होऊन जाऊ? आई-अण्णानं येवडी आपल्यावर जबाबदारी टाकल्या ती पार पाडली पायजे. आता इथनं पळ काडायचा न्हायी. काय हुईल तेला सामोरं जायाचं. आल्या संकटाला धिरानं तोंड द्यायला पायजे... खरंतर तिचं पोरपण आता सरलं होतं. विचाराला बळकटी आली होती. असे अनेक प्रसंग बाईच्या जातीला निभावून न्यावे लागतात याची बारीकशी चुणूक आज यौवनाच्या उंबरठ्यावर असताना तिच्या वाट्याला आली होती.
    विचार करता-करता तिचं लक्ष कुडाला अडकवलेल्या कोयत्याकडं गेलं. आणि लख्खकन तिच्या मनात विचार आला... त्या विचारासरशी तिने कोयता उपसला. हातात घेतला. त्याची धार तपासली. अगदी पुढं येणाऱ्या हाताचं मनगट एका घावात तुटण्यासारखी कारी धार होती त्याला. आणि कोयता चालवून ऊसाचे कंडके पाडायचा अनुभवही तिच्या गाठीशी होता.

    ती पुन्हा झोपली. एक हात तिने बाळाच्या अंगावर टाकला होता तर दुसर्‍या हातात तिने कोयत्याची मुठ धरली होती. आता तिला कुणाची भिती वाटत नव्हती. मुकादमाची, नंदूची, कारखान्यावरच्या पोरांची आणि अंधारातल्या अस्वलांची सुद्धा!

- सचिन वसंत पाटील,
विजय भारत चौक, मु.पो.कर्नाळ,
ता.मिरज, जि.सांगली.
मोबा. ८२७५३७७०४९.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या