Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

चकवा | हास्यकथा | प्रा.विजय काकडे

हास्यकथा, प्रा.विजय काकडे, विनोदी मराठी कथा, Vinodi Marathi Katha, Hashykatha Marathi

चकवा

आमचे दिपकराव म्हणजे भारी वल्ली माणूस! गहूवर्णी, मध्यम बांधा, आणि टिपटॉपमध्ये राहून अगदी ऐटीत चालणारा हा मनुष्य भलताच हरहुन्नरी आहे. खाण्यापिण्याची, फिरण्याची, फोटो काढण्याची या माणसाला प्रचंड हौस आहे. जगापेक्षा आपल्याला वेगळं काही भेटतयं का? वेगळं काही करता येईल का? अशा विवंचनेत असणारा हा माणूस इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करत असल्याने सतत चर्चेत असतो. याचा अर्थ दिपकरावांचे वागणे स्वैर आहे असे नाही बरं का! दिपकराव जे काही करतात ते अगदी नैतिकतेला धरून, चारित्र्य वगैरे सांभाळून असते.

पाय म्हणून कुठे कधी घसरला नाही अगदी घसरण्याच्या वयातही नाही. आणि आता तर तशी काही सुतराम शक्यता नाही म्हणजे नाहीच! याचे सर्व क्रेडीट अर्थात आमच्या सौ. वहिनींना...! तसा त्यांचा दिपकरावांवर इतका वचक आहे की दिपकराव बाहेर कसेही वागतील परंतु घरात मात्र सुतासारखे सरळ असतात कारण त्या सुताची दोरी वहिनींच्या बळकट हातात एखाद्या अवखळ जनावराची वेसण धरावी तशी धरलेली असते.

घरात असे वातावरण असूनही दिपकराव नाना गोष्टी करमती करतच असतात. यावरून हा माणूस खरोखरीच किती करामती असेल याची याची चाणाक्ष वाचकांना लागलीच कल्पना आली असेल...

दिपकराव जरी नोकरीच्या निमित्ताने शहरात राहत असले तरी त्यांची नाळ मात्र ग्रामीण वातावरणाशीच अधिक जोडलेली दिसते.

शहरातल्या मित्रांना सहकुटुंब सहलीचे नियोजन करणे. नवनवीन ठिकाणे शोधून जेवायला घेऊन जाणे (आपोआपल्या खर्चाने) या गोष्टीत दिपकरावांना अधिक रस असला तरीही चुलीवरची भाकरी, हुलग्याचे माडगे, शिळ्या बाजरीचे भाजलेले तुकडे, खेकड्याचा रस्सा बनवणे, घरगुती बेदाणे बनवणे या आणि अशा अनेक गोष्टी ते स्वतः बनवून त्या सोशल मिडियावर टाकणे हा दिपकरावांचा विशेष आवडता छंद...! त्या बाबतीत ते सोशल मिडियावर चांगलेच फेमस झाले आहेत त्यांच्या अशा अनेक बारीकसारीक गोष्टी, आवडीनिवडी लोकांना थक्क करतात.

त्याही पुढे जाऊन पाहिले तर दिपकरावांच्या अशा काही मजेशीर गोष्टी आहेत की ज्यावर विश्वास ठेवणे सामान्य पठडीतील माणसाला खूपच कठीण होईल. उदाहरणच द्यायची झाले तर... कधी ते एखाद्या बाजारातून घरी गावरान कोंबडा आणून त्याचे पाय बांधून त्याला रात्रभर गॅलरीत ठेवतात आणि तो कोंबडा मध्यरा‍त्रीपासून ओरडत राहतो आणि सबंध बिल्डींगमधील लोक अवाक होतात! त्यावेळी बिल्डिंगमधल्या लोकांना आपण कुठे आहोत आणि हे काय चाललेय तेच लवकर कळत नाही. आणि ते कळायच्या आत सकाळीच तो कोंबडा दिपकरावांच्या घरी कुकरमध्ये शिजत असतो...

काही ठिकाणाहून तर त्यांनी दोन दोन किलोच्या घोरपडी चक्क पकडून आणून आपल्या प्रिय मित्रांना आणि शाळेतील सहकार्यांना खाऊ घातलेल्या आहेत! परंतु एके दिवशी एका सशाने मात्र त्यांना चांगलाच चकवा घडवला! त्याचे झाले असे, दिपकराव पुण्यात सासुरवाडीला गेले होते. दोन दिवस तिथला पाहुणचार झोडून रविवारी दुपारी जेवणानंतर थोडी विश्रांती घेऊन दिपकराव वहिनींसह निघाले. निघेपर्यंत चांगली संध्याकाळ झाली होती. सासरेबुवा काळजीने दुपारपासूनच “लवकर निघा असे एकसारखे म्हणत होते. हल्ली रात्रीच्या चोऱ्या फार वाढल्या आहेत. रस्त्याने, गाडी अडवून वाटमाऱ्या घडल्याच्या घटना पेपरमध्ये आल्या आहेत.” असे काळजीच्या स्वरात म्हणत होते पण दिपकराव मात्र निश्चिंत होते, “अहो, आम्हाला कोण खातयं? आपल्याकडं काय आहे चोरायाला?” असे जोरदार उत्तर दिपकराव देत होते.

“अहो नाही कसं? नाही म्हणायला चारदोन तोळे दागिने आणि दहापाच लाखांची गाडी आहे तुमच्याकडे.” सासरेबुवा पुन्हा एकदा काळजी वाटून म्हणाले.

“या म्हणावं साल्यांनो हिंमत असेल तर...! मी काही असातसा माणूस नाही. पकक्या गुरूचा चेला आहे.”

“म्हणजे?”

“अहो, म्हणजे मूठभर चटणी ठेवली आहे पुढे गाडीत... काच खाली घेऊन भिरकावली की बास्स...! शिवाय डिक्कीत दांडके असते भले मोठे !”

“ते कशाला?”

“पंक्चर काढायला... आणि टुलबॉक्समध्ये एक कुऱ्हाड सुद्धा असते..”

“बापरे! आता ती कशाला? जावईबापू?”

“अहो, घोरपडी वगैरे आडरानात सापडल्या तर त्या तोडायला!”

जावईबापूंचा हा युक्तिवाद ऐकून सासरेबुवांनी पुढचा प्रश्न विचारण्याचे धाडस काही केले नाही. निघता निघता संध्याकाळ झाली. त्यातच रस्त्यात बायकोला शॉपिंगची लहर आली. तिच्या दोन साड्या घेता घेता एक तास गेला. पुण्यात ट्रॅफिक जाम असल्याने त्यात आणखी एक तास गेला... गाडी घाट चढून वर आल्यावर ‘गारवा’ हॉटेलमध्ये जेवणासाठी आणखी एक तास गेला... त्यावेळी थंडीचे दिवस होते. हवेत चांगलाच गारठा भरला होता. जेवण केल्यावर तो विशेषकरून जास्ती जाणवायला लागला होता. पण गाडीत हिटरची सोय असल्याने आत थंडी जाणवत नसल्याने दिपकरावांची गाडी सुसाट वेगात सुटली होती...

जेजुरी सोडून पुढे आल्यावर अंधार गुडूप आणि रस्ता रिकामा असल्याने वहिनींना थोडी भीती वाटू लागली. सगळे वातावरण भकास दिसत होते. त्यात रात्र अमावस्येची होती! त्यामुळे वहिनींची भीती आणखिनच वाढत होती. दिपकराव मात्र कारटेपवर मोबाईल लावून जूनी गाणी ऐकत गुणगुणत आरामात गाडी चालवत होते. त्यांच्यालेखी भीती वगैरे असला काही प्रकार नव्हता. पेशाने शिक्षक असलेले दिपकराव श्रद्धाळू असले तरी अंधश्रध्दाळू नसल्याने भुताखेतावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. वहिनी मात्र आपण सुखरूप पोहोचावे म्हणून सतत देवाचा धावा करीत होत्या. गाडी मोरगाव सोडून पुढे आल्याने दिपकरावांनाही आपल्या इलाख्यात आल्याने हायसे वाटत होते. त्यामुळे ते अंधार असला तरी बिनधास्तपणे गाडी चालवत होते.

आता गाडीने चांगलाच वेग पकडला होता. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. नेहमीचाच रस्ता असून सुध्दा का उरकत नाही? काही चकवा वगैरे तर घडला नाही ना? अशी भीती वहिनींना वाटत होती. परंतु त्या याबाबत दिपकरावांशी त्या बोलू शकत नव्हत्या...

एका क्षणी वहिनींनी खिडकीतून सहज बाहेर पहिले तर गाडीच्या उजेडात त्यांना गाडीच्या दिशेने काहीतरी वेगात येताना दिसले त्याबरोबर त्या जोरात ओरडल्या, “अहो, बोका...पहा मोठा बोका...”

दिपकराव हसून म्हणाले, “अगं बोका नाही तो ससा आहे वेडे”

“ससा? आणि इतका मोठा?”

“हो, खूप मोठे मोठे ससे आहेत या भागात. बघ ! आणखी एक आला...”

“अहो, गाडीखाली ससा...!” पुन्हा वाहिनी जोरात ओरडल्या त्याबरोबर दिपकरावांनी कचकन ब्रेक लावत गाडी थांबवली...!

“अहो, गाडी कशाला थांबवली?”

“आता त्याला आपल्या गाडीखालीच मरायचे होते म्हटल्यावर आपण तरी काय करणार?”

“म्हणजे?”

“म्हणजे तो मागून आलेला मोठा ससा आपल्या गाडीच्या टायरखाली आला ना...”

“मग?”

“मग काय? घरी नेऊन शिजवून कढान करायचे आणि हानायचा दाबून...”

“अहो, काहीतरीच काय? मला तर वेगळंच काहीतरी वाटतयं त्यात आज अमावस्या आहे. बारा वाजायला आलेत. अजिबात खाली उतरू नका. तुम्ही पटकन गाडी सुरू करा पाहू, मला खूप भीती वाटतेय...”

“अगं मग, अमावस्येला चालून आलेली शिकार अशी हातची दवडून कशी चालेल?” असे म्हणून दरवाजा खोलून दिपकराव चक्क खाली उतरले सुध्दा...

गाडीच्या उजव्या बाजूने वळसा मारून दिपकराव डाव्या बाजूला आले. खाली वाकून सगळीकडे पाहतात तर काय? “अगं, ससा गाडीखाली नाहीये...”

“नसूद्यात, तो ससा नव्हताच मला माहिती आहे सगळं... तुम्ही या बघू लवकर वर, मला भीती वाटतेय...”

“अगं, असं कसं येऊ?”

“मला सशाचा छडा लावलाच पाहिजे... अगं, आहे , आहे ससा...! ये बघू खाली...”

ससा आहे म्हटल्यावर आणि नवऱ्याचा स्वभाव माहित असल्याने व धोका नाही हे पाहून अगदी वहिनी गाडीतून खाली उतरल्या. त्यावेळी दिपकराव गाडीच्या टायरमागे लपलेल्या सशाला पकडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु अगदी हातात आलेला ससा निसटून दुसऱ्या चाकाच्या दिशेने पळाला. सशाला पकडायला दिपकरावांच्या जोडीला आता वहिनीही दाखल झाल्या होत्या.

मोबाईल टॉर्चच्या उजेडात दोघेही सशाच्यामागे धावत होते. गारठल्यामुळे ससा जास्त पळत नव्हता परंतु दिपकरावांना हुलकावणी देण्यात तो यशस्वी होत होता. त्यामुळे खरेच आपल्याला चकवा तर घडला नाही ना? अशी शंका खुद्द दिपकरावांनाही यायला लागली.

परंतु त्यांचा असल्या गोष्टींवर विश्वास नसल्याने, “पाहूया आणखी एक शेवटचा प्रयत्न करून.” असे म्हणून ते पुन्हा सशाच्यामागे धावू लागले तर... एका क्षणी तो ससा अलगद दिपकरावांच्या हातात आला...! मग त्याला घट्ट पकडून त्यांनी रूमालाने त्याचे पाय बांधून त्याला गाडीच्या डिक्कीत सुरक्षित ठेवले. वहीनींचा जीव आता कुठे भांड्यात पडला होता. तरीसुध्दा आपल्या गाडीच्या डिक्कीत कोंडलेला तो नक्की ससाच आहे काय? यावर त्यांना शंका येत होती व तसे वाटून त्या आणखिनच जास्त घाबरत होत्या. आणि झालेही तसेच..

बरोबर रात्री १२ वाजता दिपकरावांची गाडी बिल्डींगच्या पार्कींगमध्ये घुसली. गाडी थांबवून खाली उतरून सामान बाहेर काढायला दिपकरावांनी डिक्की उघडली तर काय? तिथे पाय बांधून ठेवलेला ससा गायब झाला होता!

“अगंबाई! मी सांगत होते तुम्हाला, नका पकडू तो ससा. काहीतरी भानामतीच होती ती..”

“अगं भानामती वगैरे काही नाही. उद्या मस्त आपल्या हा पोटात जाईल हा ससा...” गाडीच्या सीटमागे लपलेला तो भलामोठा ससा हातात घेऊन दाखवत हसून दिपकराव म्हणाले.

“आता त्याला घरात ठेवू नका बाई..., मला फार भीती वाटतेय त्याची...”

“अगं मग घरात नाहीतर कुठे ठेवू?”

“ठेवा कुठे पण...”

एका हातात सामान व एका हातात ससा घेऊन दिपकराव जिन्याच्या पायऱ्या चढत होते. घरात आल्यावर त्यांना एक युक्ती सुचली... त्याप्रमाणे सशाचे पाय घट्ट बांधून त्यांनी तो ससा पिशवीत ठेवून पिशवी दरवाजाच्या आतल्या बाजूने सेफ्टी डोअरच्या ग्रीलला अडकवली... ससा घरातून बाहेर ठेवल्याने वहिनींचीही भीती कमी होऊन त्यांना छान झोप लागली होती... रात्री रात्रभर जागरण केल्यामुळे दोघांनाही शांत आणि गाढ झोप लागली.

सकाळी उशीरा साधारणपणे साडेसात वाजता दोघेही उठले. उठल्याबरोबर दाराला अडकवलेल्या सशाला पहायला म्हणून दिपकराव धावत गेले तर काय...! तिथे पिशवी ग्रीलला अडकवलेली तशीच होती परंतु त्यात ससा नव्हताच...! बहुतेक काय आहे या कुतुहलापोटी कोणीतरी ती पिशवी ग्रीलच्या आतमध्ये हात घालून सशाला बाहेर सोडून दिले असावे. बहुतेक सकाळी लवकर येणार्‍या दूधवाल्याचेच हे काम असणार असा अंदाज दिपकरावांनी बांधला. तेव्हा धावत पळत ससा शोधण्यासाठी म्हणून ते पायऱ्या उतरून खाली गेले तर काय?

बिल्डिंगमधली सगळी मंडळी खाली जमली होती आणि सगळ्यांच्या जोरदार गप्पा रंगल्या होत्या...

“अहो, कुणी आमचा ससा पाहिला का?”

“घ्या, म्हणजे ससा यांचा होता तर...?” बोरावके एकजणाला जोरदार टाळी देत म्हणाले.

“म्हणजे तुम्ही पाहिला ससा?”

“अहो, त्यांनीच काय सगळ्यांनीच पाहिलाय...” आपल्या दातांना टूथ ब्रश घासतच ताबेसर म्हणाले.

“अहो, आम्हा सगळ्यांनाच चकवा दिलाय त्याने...” बोरावके पुन्हा म्हणाले.

“चकवा..., तुम्हाला पण?”

“म्हणजे?”

“अहो, तो रात्रभर आम्हाला चकवा देतोय...” वहिनी मागून चर्चेत सामील होत म्हणाल्या. त्यावर सगळ्यांचाच जोरदार हशा झाला.

“मग आता आहे कुठे तो?” दिपकरावांनी उत्सुकतेपोटी विचारले.

“अहो, काही वेळापूर्वी राऊतांच्या बागेतून निसटला तो थेट रानवारा बिल्डिंगमध्ये...” ताबे म्हणाले

“तिथून?”

“तिथून आतापर्यंत त्याने मोरगाव गाठले असेल बहुतेक...” बोरावके उत्तरले.

“च्या मारी पार्टी हुकली राव आपली म्हणायचं... पहिल्यांदाच असा चकवा घडला राव...!” दिपकराव हताश होऊन म्हणाले.

“हो ना रात्रभर सांभाळून जपला त्याला पण कसा काय सुटला काय माहित...” सौ. वहिनींनीही अखेर निराशा व्यक्त केली.

“कसा काय सुटला म्हणजे काय? ससा मीच सोडला...” दिपकरावांचा एकुलता एक मुलगा सार्थक चकव्याचे गुपित सांगू लागला.

“तू आणि का सोडलास? अरे वेडा आहेस का?” दिपकराव कळवळून म्हणाले.

“आणि तुम्ही किती शहाणे आहात? एकदा काय घरात म्हणे कोंबडा आणून ठेवताय! दुसर्‍यांदा काय घोरपड? आणि आता ससा? अहो एखाद्याला हार्ट ॲटॅक यायचा ना हे असले प्राणी घरात पाहून? म्हणून मीच सोडून दिले सशाला... आता असलं काही घरात आणाल तर याद राखा...” ते ऐकून चकवा घडलेले सगळेच लोक गुपचूपपणे आपापल्या घरात जाऊन बसले.

लेखक : प्रा.विजय काकडे, बारामती
मो.नं.९६५७२६२२२९.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या