पांद्या
सुभान्याला शेतावरून घरी यायला आज जास्तच उशीर झाला होता. मोटार खराब झाल्याने तिला ठीक करून ऊसाला पाणी देऊन घरी यायला रात्रीचा दीड वाजला होता. खरं तर तो उशीर झाला की शेतातच थांबत असे. पण आज त्याने घोंगड व सतरंजी आणली नव्हती. त्यातच सगुणेला दिवस भरत आल्याने कुठल्याही वेळेला तिला दवाखान्यात न्यावं लागणार होतं. अर्धा रस्ता कापल्यावर वाटेत एक पांद लागली. त्यातून रात्री यायचं नाही हे सुभान्याला माहित होतं. पण वरची डगर चढून लांबून येण्यात वेळ लागला असता. शेवटी त्यानं पांदीतून म्हणजेच पाणंद किंवा पांद मधून येण्याचं धाडस केलं. त्याला रात्री शेतात जाताना किंवा येताना रामाची काठी घेऊन जावं हे माहीत असल्यान त्याने ती हातात धरली होती. आता रामाची काठी म्हणजे जी बांबूच्या छडीपासून बनलेली असते. तिला खाली लोखंडी नाल लावलेली असते. वर लोकरीचा काळा दोरा बांधलेला असतो. त्यात दोन चार घुंगरू बांधलेली असतात. ती काठी जर जमिनीवर वाजवत गेलं तर भूत नाही पकडत असं त्याला त्याच्या आजानं सांगितलं होतं. सुभान्याला पांदीमध्ये पांद्याची भीती वाटत होती. पांदीमध्ये दचकून जो कोणी मेला असेल तो पांद्या होऊन पांदीमध्ये राहत असे आणी येणार्या जाणाऱ्या लोकांच्या मानगुटीवर बसून आपल्या इच्छा पूर्ण करत असे. सुभान्या त्या दिवशी पांदीमध्ये उतरला चालायला लागला. सकाळी पाऊस पडल्याने पांदीमध्ये चिखल झाला होता. काठी खाली आदळून आवाज होत नव्हता. सुभान्या घाबरत घाबरत चालू लागला आणि त्याचा कोणी तरी पाय पकडला. सुभान्याला पुढे जाता येईना. तो घाबरून जोर जोरात राम, राम, राम ऽऽ म्हणू लागला. पायजमा ओला झाला. हातातली काठी वाजवायचं भान राहिलं नाही. तो आपली ताकद लाऊ लागला पण पुढं जाता येईना. वरचेवर पाय गाळात रूतून बसला. सुभान्याची बोबडी वळली, तोंडातून राम निघेना. चार पाच मिनिटे गेली आणि त्याला काठीची आठवण झाली. तो काठी वाजवू लागला पण चिखलात वाजेना पण त्याने वाजवणे सोडले नाही. शेवटी मधेच कुठे काठी दगडावर आपटली. काठीचा ठण ऽ ठण ऽऽ तर घुंगराचा खूळ खूळ ऽऽ असा आवाज झाला. सुभान्याचा पाय सुटला. सुभान्या जो पळत सुटला तो शेवटी घरीच पोहचला. पुढे चार दिवस तापान झोपून होता. त्यानंतर तो आयुष्यात कधी रात्री शेतावर गेला नाही आणि पांद्याचा सामना त्याच्याशी झाला नाही.
लेखिका - सौ हेमा येणेगूरे, पुणे
0 टिप्पण्या