
किल्ले पन्हाळा
किल्ले 'पन्हाळा गड' हा कोल्हापूर पासून २० किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला छत्रपती शिवरायांच्या जीवनातील नाट्यमय घटनांचा साक्षीदार समजला जातो. हा किल्ला करवीर राज संस्थानांच्या काळात मराठ्यांची राजधानी होता.
या किल्ल्याच्या पहिल्याच चौकात शूर वीर बाजीप्रभूंचा पुतळा पाहून वीर मावळ्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. इथून जवळच सज्जा कोटी आहे या ठिकाणाहून छत्रपती संभाजी महाराज प्रांताचा कारभार पहात असत. सज्जा कोटीतील भिंतीवरील उर्दू शिलालेख हे इथले वैशिष्ट्य होय. ही दोन मजली इमारत इब्राहिम आदिलशहा यांनी १५०० मध्ये बांधली असा इतिहास सांगतो.
या गडावरील आणखी एक ठिकाण म्हणजे दुतोंडी बुरूज या बुरूजाला दोन्ही बाजूनी पायऱ्या आहेत म्हणून याचे नाव ‘दुतोंडी’ पडले असे म्हणतात. येथील आणखी एक बुरूज त्याचे नाव ‘ऊसाटी बुरूज’ पश्चिमेकडील हालचाली वर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जात असे. या ठिकाणावरून सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहून डोळ्याचे पारणे फिटल्या शिवाय राहत नाही. पश्चिमेकडील तीन दरवाजा हे ठिकाण ही तितकेच महत्त्वाचे या ठिकाणाहूनच १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने हा किल्ला जिंकला होता. साधारणपणे १२०० वर्षाचा इतिहास या किल्ल्याला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे शिलाहार भोज राजा नरसिंह यांच्या कारकिर्दीत या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत तटबंदी, सुधारणा तसेच किल्ल्याची इतर डागडुजी करण्याचे काम करण्यात आले. १६५९ मध्ये अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.
सिद्धीजौहरच्या वेड्यातून अतिशय हुशारीने शिवाजी महाराजांनी बाजी प्रभू यांच्यासह इथून सुटका करवून घेतली. व शत्रूला चकवा देण्यासाठी शिवा काशीद हे शिवाजीच्या वेषात शत्रूला सामोरे गेले व यातच त्यांची हत्या होऊन त्यांना वीरमरण प्राप्त झाले व बाजी प्रभूंनी घोड खिंड लढवून शिवाजी महाराजांना विशाळ गडावर पाठवविले, जोपर्यंत महाराज विशाळ गडावर पोहचल्यानंतर ठरल्या प्रमाणे तीन तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत हा शूर वीराने खिंडीत शत्रूला थोपवून धरले होते. तोफांचा आवाज आल्यानंतरच या वीराने आपले प्राण इथे सोडले आणि ही खिंड बाजी प्रभूंच्या रक्ताने पावन झाली.
या किल्ल्यावर कमळांची शिल्पे, उर्दू चिन्हे, गणेशाच्या प्रतिमा हे वेगवेगळ्या काळात या किल्ल्यावर असणार्या सत्तांचे प्रतिक असाव्यात. अंधार बावडी, ताराबाईंचा वाडा, अम्बर खाना, तसेच गंगा, यमुना सरस्वती ही भव्य धान्याची कोठारे आहेत. यामध्ये साधारणपणे २५,००० खंडी धान्य मावते असे सांगितले जाते. तबक उद्यान, नेहरू उद्यान, वाघ दरवाजा ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. किल्ल्याच्या प्रवेश द्वारावर शिवा काशीद यांचा पुतळा, सोमेश्वर तलाव व सोमेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. इथेच शिवाजी महाराजांनी लक्ष चाफ्याची फुले पिंडीवर वाहिली होती असे सांगण्यात येते. संभाजी मंदिर तसेच गढी आहे. धर्मकोठी इथून दान धर्माची कामे केली जात असत. नायकिणीचा सज्जा, पराशर गुहा इत्यादी ठिकाणेही इथे आहेत. इथून ३ किलो मीटर अंतरावर मसाईचे पठार आहे. या गडावरून कोल्हापूर तसेच जोतिबा डोंगराचे दर्शन होते.
प्रत्येकाने जरूर किल्ल्यास भेट देऊन आपला इतिहास जाणून घेऊन या पर्यटन स्थळाचा आनंद घेतला पाहिजे असे मला वाटते.
(वरील माहिती मी दिलेली भेट आणि मी संग्रहित केलेल्या माहितीच्या आधारे लिहिली आहे.)
लेखिका - सीमा ह. पाटील, (मनप्रीत)
कोल्हापूर
0 टिप्पण्या