Header Ad Banner

प्रिय साऊ – सावित्रीबाई फुले यांना भावपूर्ण पत्र | अक्षय जहागीरदार | स्त्रीशिक्षण, सामाजिक क्रांती

savitribai fule
 अक्षय जहागीरदार लिखित “प्रिय साऊ” – सावित्रीबाई फुले यांना भावपूर्ण पत्र. स्त्रीशिक्षण, सामाजिक न्याय, क्रांतीची मशाल आणि आजच्या समाजातील वास्तव -


प्रिय साऊ,


साऊ तुझ्या झिजण्याने इथली पिढी साकार झाली,

साऊ तुझ्या जन्माने इथली धरती पवित्र झाली.


     साऊ आज तुझी फार आठवण येते. अगं मी विसरलो होतो की तुझा आज जन्मदिवस. पण  या सोशल मीडियाने दिली तुझी आठवण करून, की आज तुझी जयंती आहे. म्हणूनच तुझ्याशी बोलावसं वाटतं.


        इतिहासानं तुझी नोंद क्रांतीज्योती म्हणून घेतली साऊ. तू काय काय केलं साऊ इथल्या पिढ्या उभ राहण्यासाठी. अगं तुझा नवरा दिसला होता इथल्या अस्पृश्य असणाऱ्या मानसिकतेला कधीतरी पाण्याचा हंडा त्या विहिरीमध्ये भरताना. पण अगं तुझ्या नवऱ्याला विसरून गेली इथली शेतकऱ्यांची लेकरं की त्याने इथल्या इंग्रजी व्यवस्थेवरती शेतकऱ्यांचा आसूड उठवला होता. बघ ना  तुझ्या नवऱ्याने तुला शिकवलं कारण इथल्या माता-भगिनी शिकल्या पाहिजेत. म्हणून त्यानं त्या शिक्षणाचा पाया, त्याची बीजे तुझ्यात रोवली. साऊ तूही किती कष्ट केलेस ना. तूही बदललीस. तूही शिक्षणाचा ध्यास घेतलास. त्या पाठीवरती त्या पेन्सिलने स्त्री शिक्षणाचं अक्षर कोरलस. साऊ कुणासाठी केलस ग एवढं?


              साऊ अगं तुला सांगायचं विसरलो. तुला क्रांतीज्योती असं म्हणतात. तू स्त्री शिक्षणाचा पाया रचलास असं म्हणतात. हो आता तुला समाज सुधारक सुद्धा म्हणतात बरं. पण सांगू तू घराचा उंबरा ओलांडून त्या भिडे वाड्यामध्ये ज्या मुलींना शिकवण्यासाठी जात होती त्यावेळी तुझ्या उंबऱ्यापासून ते भिडे वाड्याच्या त्या उंबऱ्यापर्यंत जाईपर्यंत तुझ्यावरती घाण, विस्टा आणि दगड सुद्धा ज्या माणसांनी मारली ना त्या माणसांना आता तुझा खोटा का होईना पण खोटा भक्तीचा आव आणतात बरं.. तुझे ते नाव जपतात राजकारणाच्या तथागतीत व्यासपीठावर. आणि काय सांगू तुला माहित आहे का तुझ्या आणि  महात्मा फुलेंच्या बद्दल गेल्या काही महिन्यांमध्ये एका महाशयाने अकलेचे तारे तोडले. बर तू कुणा एका धर्मासाठी केलं नाहीस बरं. अगं तू ज्या वाड्यात पहिली शाळा सुरू केलीस त्यावेळी त्या वर्गात सर्व स्त्रिया या ब्राह्मण होत्या. पण  झालं कसं माहित आहे का आता तुझ्या या कार्याला कुणी जातीत आणि धर्मात अडकवू पाहते. अगं धर्माचा आणि जातीचे विटाळ लागले या समाजाला.


    साऊ तू सांग ना... ज्यावेळी तुझ्या अंगावरती हाच समाज घाण, विस्टा, शेण, दगड मारत होता ना तेव्हा तुला वाटलं नाही का ग कशासाठी हा खटाटोप करतेस. आगं आख्ख आयुष्य तू दोन लुगड्यांवर काढलस. पण नाही वाटलं तुला नवीन लुगडं खरेदी करावं म्हणून. लुगडे नाही म्हणून कधीही नवऱ्याकडे तू मागीतलं नाहीस. अग तुझ्या झिजलेल्या लुगड्यातून ज्ञानाची वस्त्र इथल्या व्यवस्थेला घातलीस तू; पण माफ कर साऊ ज्यांच्यासाठी तू झिजलीस त्यांनीच आज इथली व्यवस्था वेशीवर टांगली.


       साऊ तुला माहित आहे का? अगं तू शिकवलं म्हणून आम्ही सारे घडलो. इथल्या अनेक स्त्रियांनी गगन भरारी घेतली. आकाशात झेप घेतली. अगं नाही ग तर सारं आकाशच कवेत घेतले म्हण. पण आज इथे अनेक स्त्रिया अनेक पक्षामध्ये काम करतात. ज्यावेळी समाजात एखाद्या स्त्रीवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळी ह्या पेटून उठतात बरं पण अगं सांगू जरी यांच्याच पक्षातील एखादा असेल त्यावेळी मात्र तो बलात्कार चमत्कार होतो. या साऱ्या मूग गिळून गप् बसतात. मग या कधीतरी उगवतात आणि एखाद्या स्त्रीने कसे कपडे घालावे याचं जणू काही तत्त्वज्ञानच सांगतात. जणू यांनी आपली भारतीय संस्कृती जन्माला घातली असावी. पण दिसत नाही यांना इथली नग्न झालेली व्यवस्था आणि राजकीय नेत्यांची असलेली भग्न मानसिकता.


      साऊ आज खूप वाईट वाटतं ग. तुझ्या ज्ञानाचा, तुझ्या कार्याचा आणि तुझ्या क्रांतीचा इथल्या प्रत्येक माणसांनी बाजार मांडलेला पाहून. ज्या भिडे वाड्यामध्ये तू क्रांतीची ज्योत पेटवली होतीस तोच भिडे वाडा आता नामशेष झालाय. जसा तो भग्न झाला तसा इथला समाज सुद्धा.


      साऊ खरंच तुझा विसर पडला आहे. मात्र तुझ्या लेकराला तुझ्या आठवणी येतात. क्षणाक्षणाला तुझा भास सुद्धा होतो. तुझ्यामुळेच आमचं आयुष्य समृद्ध झालय. आणि तुझ्यामुळेच जन्माला आलेला अभिमान सुद्धा वाटतो. एका आईने जन्म दिला आणि तुझ्या मातृत्वाने आयुष्य घडवलं. हे माझे भाग्य साऊ. पण हा साऊ सगळच संपले असे नाही. एक दिवस सत्याचा सूर्य नक्की उगवेल...पुन्हा तुझ्या क्रांतीची मशाल पेटेल


तुझंच लेकरू

  अक्षय


- अक्षय जहागिरदार ७३५०००२१४५ 

🔖 Related Keywords

Savitribai Phule, Dear Sau, Akshay Jahagirdar, women’s education, social reform, Marathi letter, inspirational essay, Bhide Wada, equality, anti-untouchability, social justice, women empowerment, Marathi literature, tribute, reform movement
सावित्रीबाई फुले, प्रिय साऊ, अक्षय जहागीरदार, स्त्रीशिक्षण, सामाजिक सुधारणा, क्रांतीज्योती, भिडे वाडा, अस्पृश्यता, समानता, मराठी पत्र, प्रेरणादायी लेख, समाजपरिवर्तन, महिला सक्षमीकरण, न्याय, शिक्षणाचा दीप




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

🌙