Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

चांदणराती | सौ.क्रांती तानाजी पाटील

चांदणराती - ललित लेख

थंड मंद वारा, काळीकभिन्न रात्र, या काळ्याकुट्ट नभोमंडपी स्वयंप्रकाशाने काजव्याप्रमाणे लुकलुकणाऱ्या चांदण्या, सदोदित मनोविलासात विराजमान असतात. त्यांचे तेजस्वी दिसणं, लुकलुकणं बालवयापासूनच लक्षवेधक ठरलयं. जणू अतूट नात्यांची घट्ट वीण बनत गेली. या नभांगणीच्या चांदण्याभोवती अनोखं भावविश्व सदैव घुटमळत राहिलं. इवलुश्या त्या गोंडस रुपात आईच्या कडेवरती नाजूक बोटांनी या शुभ्र तेजस्वी तारकांना घातलेली हाक अजूनही ताजीच वाटते. हळूहळू या चांदण्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की चक्क त्या अंगणात ही खेळायला उतरायच्या. चांदण्या रात्रीत त्यांच्या सोबतच खेळणं अविस्मरणीय असचं. मृगाच्या कुपीतील कस्तुरीप्रमाणेच. पाठशिवणी, लपंडाव खूप रंगायचा. कधी-कधी पाठशिवणीच्या या खेळात चक्क एखादी चांदणी दुडूदुडू पळायची तर कधी वेगाने ही पळायची सुध्दा. काही चांदण्या तर खूप आकर्षक व तेजस्वी दिसतात आणि आपलसं करून ठेवतात हे उमगत ही नाही. शुक्रतारा, मंगळ नेहमीच लक्ष वेधून घेतात. नभांगणीचा उत्तरेचा तो ध्रुव तारा प्रथम दर्शनी नजरेत भरणारा. त्याचं एक अढळ स्थान नकळत मनावर उमटलेले आहे. अशा या चांदणरातीची सहल करत असताना खूप मौज वाटायची. चांदण्याचे ते चमकदार बाजले हिऱ्याप्रमाणे चमचम करायचं, तो रामाचा बाण जणू बकुळफुलांनीच गुंफलाय असं भासायचा, जागो जागीचे तारका पुंज सुंदर, चांदीसम लखलखणार्‍या दिव्य शक्तीची प्रचिती देत. एखाद्या कामाक्षीने चांदण्यांची साडी लपेटून घेतल्यानंतर ते रुप अधिकच खुलून दिसावं तशी ही चांदणरात भासायची. चांदणरातीची ही सहल रात्रभर आनंद द्यायची. अंगावर जणू पारिजातकांच्या फुलांची चादरच पांघरली आहे असा भास होत.

लखलखणार्‍या, तेजस्वी तेजाच्या चांदणरातीत बालपण विरघळून कधी तारुण्यात प्रवेश झाला. हे समजलंच नाही. तारुण्याच्या उंबरठ्यातील ही चांदणरात अधिकच मोहक दिसायची. तारुण्याने मुसमुसलेल्या मनाला या चांदण्या अधिकच भुरळ घालत. त्यांचे खट्याळ, चोरटे इशारे मनाला लाजवंती बनवायच्या. लहानपणी खेळणाऱ्या चांदण्या आता त्याही तरुण सौंदर्य वती अश्या सख्या बनल्या होत्या. तासनतास त्याही चांदणरातीत गप्पा मारत. प्रेमाची, विरहाची तर कधी मीलनाची गाणी ओठावरती असायची. शीतल, मंद तेजात अनोखी हुरहूर वाटायची. कालपर्यंत दुडूदुडू पळणाऱ्या या चांदण्या, खोड्या काढून चिडवतात. मनोमन वाट पाहाणाऱ्या राजसाच्या आठवांत तुझंही रुप किती नितळ, तेजस्वी, मनोहर वाटतं आहे अगदी आमच्या सारखंच हे सांगायलाही त्या विसरत नसत. ते ऐकताच गालावर लाली चढायची. नवतारुण्याचे ते रुप घेऊन एकटक चांदणरात न्हाळत असतानाच.

एक निखळता तारा भेटीला आला. मनातील इच्छापूर्तिसाठी. न कळत हात जोडले त्याच्यासमोर मनातील इच्छा मागण्यासाठी. एका गोड स्पर्शाने डोळे उघडले. जवळच एक राजबिंडे रुप दिसलं, स्वप्नातले. क्षणात या भेटीने ती चांदणरात लख्ख, शुभ्र, दुग्ध प्रकाशाने न्हाऊन निघाली. नीरव शांततेतला मंदवारा, लुकलुकणाऱ्या चांदण्यांची ती बरसात पाहून फक्त एकच ओळ मनी गुणगुणावी वाटत होती.

चांदणीरात है, हम तेरे साथ है !!

- सौ.क्रांती तानाजी पाटील.
मु.पो.दुशेरे ता.कराड.जि.सातारा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या