किल्ले सिंहगड (कोंढाणा) आणि गडाची माहिती
सिंहगड हा किल्ला, समुद्र सपाटी पासून ४४०० फूट उंचीवर पुणे जिल्ह्यामध्ये भुलेश्वराच्या डोंगर रांगेवर, हवेली तालुक्यात ‘डोणजे’ या गावात आहे. तो पुण्याच्या नैऋत्य दिशेस, पुण्यापासून २५ की. मी. अंतरावर आहे. सिंहगडाचे पूर्वीचे नाव ‘कोंढाणा’ होते. शहाजी राज्यांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी १६४९ मध्ये हा किल्ला आदिलशहाला दिला होता. तसेच पुरंदरच्या तहामध्ये जे किल्ले जे मोगलांना दिले त्यामध्ये या किल्ल्याचा समावेश होता.
पुण्याकडून गडावर चढताना तीन दरवाजे लागतात. प्रथम प्रवेशद्वार नंतर, पुणे दरवाजा क्रमांक दोन मधून आत प्रवेश केल्यानंतर डावीकडे ‘खांदकडा' लागतो. खांदकड्यावरील बुरुजावरून गडाच्या पश्चिमेस असणार्या कल्याण दरवाज्याचे दर्शन होते. प्रत्येक किल्याच्या मुख्य दरवाज्याची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की, शत्रूने हल्ला केला तर दारुगोळ्यांचा मारा प्रत्यक्ष प्रवेश द्वारावर होत नसे. पुणे दरवाजा क्रमांक तीन मधून आत प्रवेश केल्यानंतर गडावर शिवाजी महाराजांच्या काळात लढाईसाठी आवश्यक दारू गोळ्याचा संग्रह ज्या कोठारामध्ये केला जायचा ते दारुगोळ्यांचे कोठार, तोफखाना, घोड्यांची पागा पहावयास मिळतात. घोड्याची पागा या ठिकाणची उंची तशी तुलनेने कमी वाटते. त्या वेळची स्वराज्याची राजधानी प्रतापगड आणि पुणे या पासून हा किल्ला जवळ असल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांना तो खूप महत्त्वाचा वाटत होता परंतू तो मोगलांच्या ताब्यात होता. तो आपल्याकडे घेण्याचा निश्चय शिवाजी महाराजांनी केला.
शिवाजी महाराजांचा बालमित्र आणि विश्वासू सुभेदार असलेले तानाजी मालुसरे यांनी आपल्या लाडक्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून, “आधी लग्न कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे!” असे म्हणून, हा किल्ला जिंकण्याचा निश्चय केला. सध्या ‘तानाजीकडा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिशय अवघड कड्यावरून तानाजी मालुसरे आणि त्यांचे सैनिक गडावर चढले. मोगलांतर्फे त्यावेळचा अधिपति असणार्या ‘उदयभान राठोड' याच्याशी लढाई करून, एका चढाई मध्ये हा किल्ला जिंकला. उदयभानशी लढताना तानाजींची ढाल तुटली या वेळी त्यांनी डोक्याचा शेला काढून हाताला गुंडाळला आणि त्याचा ‘ढाल' म्हणून वापर केला व लढाई सुरू ठेवली असे सांगितले जाते. या लढाई मध्ये तानाजी मालुसरे यांना वीर मरण प्राप्त झाले. या लढाईमध्ये तानाजी मालुसरे यांच्यासोबत त्यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तानाजी मालुसरे लढाई मध्ये धारातीर्थी पडले तेव्हा लढणारे सैनिक सैरावैरा पळू लागले पण सूर्याजी मालुसरे यांनी त्यांना एकच आदेश दिला, ‘जिंका किंवा मरा, मी गडावरून खाली उतरण्याचा मार्ग बंद केला आहे!' हे ऐकताच सर्व सैनिक पुन्हा शत्रू वर तुटून पडले. एकीकडे किल्ला सर केल्याचा आनंद आणि हा किल्ला मिळवण्यासाठीच्या लढाईत विश्वासू सवंगडी गमावल्याचे दुःख यामुळे शिवरायांच्या मुखातून आपसूक शब्द बाहेर पडले ते म्हणजे, “गड आला पण सिंह गेला!”
सन १८८९ मध्ये बाळगंगाधर टिळकांनी या किल्ल्यावर बंगला घेऊन ते तिथे वास्तव्यास आले. याच शांत आणि निसर्गरम्य वातावरणात त्यांनी ‘गीतारहस्य' आणि ‘आर्किट होम इन वेदांज' हे दोन ग्रंथ लिहिले. सन १९१५ साली महात्मा गांधी आणि टिळक यांची भेट या बंगल्यावरच झाली होती. या किल्ल्यावर यादवांचे दैवत असणारे ‘कोंडाणेश्वर' हे मंदिर आहे. तिथून जवळच श्री ‘अमृतेश्वर' हे मंदिर आहे. तसेच कोळ्यांचे दैवत असणार्या ‘भैरव’ या देवाचे मंदिर ही या किल्ल्यावर आहे या मंदिरात भैरव आणि भैरवी या दोन मूर्ती आहेत गडावर असणार्या देवटाक्यातील पाणी गडावर सर्वत्र पिण्यासाठी वापरले जाते. या किल्ल्यावर राजस्थानी पद्धतीतील देवळाच्या आकाराचे राजाराम महाराजांचे पवित्र स्मारक आहे. राजाराम महाराजांनी सतत अकरा वर्षे मोगलांच्या सत्तेशी टक्कर दिली होती आणि वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी याच गडावर त्यांचे निधन झाले. या स्मारकाच्या जवळच कलावंतीण बुरूजही आहे.
सिंहगडावरती कोंढणपूरहून ही जाण्यासाठी कल्याण गावामधून वर जाऊन गडाच्या पश्चिम दिशेस असणाऱ्या कल्याण दरवाज्यातून आत प्रवेश करता येतो. या दरवाज्याच्या दोन्ही बाजूस हत्ती आणि माहूत अशी दगडी शिल्पे आहेत. सिंहगडाच्या दक्षिण टोकावर ‘झुंजार बुरूज' आहे. गडावर उदयभानचे स्मारक आहे त्याच्या पुढील टेकडीवरून उतरून या बुरूजावर येता येते. या बुरूजावरून राजगड, तोरणा किल्ला तसेच पूर्व दिशेस पुरंदरही दिसतो आणि पानशेतच्या खोऱ्याचेही विलोभनीय दर्शन होते.
‘तर अशा या स्वराज्यातील महत्त्वाच्या किल्यापैकी एक असणार्या सिंहगडाला प्रत्येकाने प्रत्यक्ष भेट देऊन त्याचा अनमोल इतिहास जाणून घ्यायलाच हवा!'
किल्ले सिंहगड | कोंडाना किल्ला | Kondana killa |History of Sinhgad Fort
0 टिप्पण्या