Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

घे विसावा या वळणावर | मराठी लेख | Marathi Lekh

घे विसावा या वळणावर - मराठी कथा | Kranti Patil Karad

दवाने न्हालेली ती रम्य सकाळ, थोडी थंड पण हवीहवीशी वाटणारी थंड हवा, सडा-रांगोळीने नटलेले अंगण पाहून एक वेगळीच प्रसन्नता मनाला वाटत होती. पक्षांची किलबिल वातावरणात चैतन्य आणत होतं. झोपी गेलेले गाव पुन्हा जागे झाले होते. घरातील काम आवरता, आवरता उजूची चाललेली गडबड घराला आणखीनच जिवंतपणा आणत होती. तेवढ्यातच मस्तपैकी गरमागरम वाफाळलेला कडक चहा तिने माझ्या हातावर टेकवला व बाकीच्या कामांकडे ती वळली. पाणी भरून झाल्यावर ती नाश्ता बनवत असताना…भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर…या वळणावर…हे रेडिओवरील गीत ऐकता, ऐकताच ती स्वतःही गुणगुणत, गुणगुणत कामात व्यस्त होती. स्वतःची कामे भराभर हातावेगळी करायची, ही तिच्या हातची जादूच होती जणू. हे सारं आज पेपर वाचत, वाचत विनय मात्र सारखं उज्ज्वलाला न्याहाळत होता. तिच्या ओठातले ते शब्द ऐकून तो ही क्षणभर विचारात पडला. बायकोकडे एक स्मित कटाक्ष टाकून पेपर बाजूला टेबलवर ठेवून तो उठला. पटकन तिच्या समोर जाऊन म्हणाला. "उजा खरचं किती छान आहेत ना या ओळी…बघ ना बघता, बघता २०२० सालही संपलं देखील !"

      ३१ डिसेंबर आज वर्षाचा शेवटचा दिवस. किती पटपट दिवस संपतात. महिन्या मागून महिने, वर्षे संपतात…आपण मात्र यंत्रासारखे धावत असतो. कशासाठी…तर सुख, आनंद मिळवण्यासाठी पण आपल्याला तो तरी भेटतो का? जरा विसावू या वळणावर… किती समर्पक ओळी आहेत आयुष्यासाठी. विनय तिच्या हाताला धरून उजूला म्हणाला, "ठेव बाजूला ते सगळं काम आणि बस बरं इथे माझ्यासोबत गप्पा मारु थोड्याश्या ".अहो, पण…! "उजू ऐक 'पण नाही बिण नाही' बसं बरं थोडसं!", "अहो, नंतर मला सर्व कामे आवरायला वेळ होईल...", "होऊ दे! मघापासून काय गुणगुणत होतीस. जरा विसावू या वळणावर…मग आता "घे विसावा या वळणावर"...!" उजाच्याही चेहऱ्यावर हसू फुललं व ती विनय सोबत बसली. मग नकळतच संपलेल्या वर्षाचा लेखाजोखा दोघांच्याही बोलण्यातून ऐकायला मिळत होता. विनय सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. कंपनीतील काम, मुंबई मधील ती ट्रफिक, त्यागर्दीतून सतत नोकरी करताना विनयची होणारी ओढातान…शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा खूप असायचा. त्याला सारखंच कम्प्युटर पुढे बसून त्याचं डोकंही आता यंत्रासारखे धावत होते. त्यामुळे निवांतपणा असला तरी त्याला आठवत नव्हता. पण २०२० मध्ये जानेवारी पासूनच छुप्या पावलांनी चीनमधील कोरोनाचा हा विषाणू कधी भारतात पोहचला हे समजले सुध्दा नाही. २० मार्चला तर संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर केले. जगाच्या इतिहासातील २०२० हे साल काळेवर्ष म्हणून नोंदवले गेले. भयंकर अश्या या विषाणूच्या महामारीत सर्व जग निपचीत झाले. पण काहीही म्हण उजा या २०२० सालाने. खूप काही शिकवलं साऱ्यांना. लॉकडाऊन पडले आणि बघता बघता अहोरात्र पळणारी, कधीच न थांबणारी मुंबई शांत झाली. आपआपल्याला घरात माणसांना राहावं लागलं…खूप उलथापालथ केली या कोरोनाने. होना, उजूने त्याच्या सुरात सूर मिसळला.
        खूप साथीचे रोग येऊन गेले. पण या कोरोना विषाणूचा संसर्ग काही वेगळाच. माणसामाणसात दुरावा निर्माण झाला. छोट्यांचे खेळणे बंद झाले. हाता तोंडाला आलेली तरुण मुलं या कोवीड-१९ ची बळी ठरले. कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झालीत. मरण जरी आले तरी बेवारस म्हणूनच जावं लागलं. कितीतरी भयानक प्रसंगातून जावे लागले सर्वांना...माणसांतील नाती तोडली जणू या विषाणूने. मग विनूही बोलला, हो तर…जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली. अनेकजण बेरोजगारी झाले. कोरोनाच्या भितीने प्रत्येकाने गावाकडची वाट धरली. वाहने बंद झाली तर पायी चालत जावू लागले. जाताना त्या ट्रेन खाली चिरडलेले ते तरुण. मन हेलावून टाकणारी ती घटना होती. काही उपासमारीनेच मेले. तर काही औषधपाण्याविना. काही जणांना पैसा असुनही उपचाराविना प्राण गमवावे लागले. सारं असूनही कोरानापुढे सारं असूनही काहींना शरण जावं लागले. आठवलं तरी अंगावर काटा येतोय. ती भिती अजूनही नाही थांबली. पण…येणारे २०२१ हे वर्ष या कोरोनाला नक्कीच प्रतिकार करेल. अशी आशा बाळगू या. आयुष्याचेही यापेक्षा काय वेगळे आहे. वर्षे बदलतात त्याबरोबर आपले आयुष्य. बघता, बघता आपली मुलं किती मोठी झाली. दोघांची शिक्षणे पूर्ण झाली. आपण मात्र या जबाबदाऱ्या पार पाडता, पाडता क्षणभराचीही उसंत न घेता धावतच आहोत. कितीतरी वर्षांनी आज आपण दोघेही निवांत गप्पा मारत बसलो आहोत. विनय बोलला अगदी खरं आहे उजू.
        अगं, आयुष्य म्हणजे तरी काय? बालपण, तारुण्य आणि शेवटी वार्धक्य या तिन्ही टप्प्यात आयुष्य पूर्ण होते. बालपण किती छान असते. एकदम निरागस, स्वच्छंदी ना अपेक्षा ना स्पर्धांची जाणीव त्यामुळे आनंदी आनंद गडे. तरुणपणात मात्र तो ऐहिक सुखासाठी धावतो. तुलनेच्या विचित्र खेळात अडकून जातो व आपलं सुख हरवून बसतो. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर म्हातारपणी अनेक व्याधींनीग्रस्त जगावे लागते. सर्वांना आपण भार वाटू लागतो. तेंव्हा समजते एवढी धावाधाव करुन काय मिळालं किंवा मिळवलं. आणि मग नजरेसमोर प्रश्नचिन्ह उभे राहते. म्हणूनच उजू आयुष्याचा प्रवास करतानाही आपण ठराविक वळणावर विसावलं पाहिजे. त्या वळणावरुन पुन्हा मागे पाहावं. आपोआपच या वळणावर विसावल्यामुळे पुढे नक्की काय करायला हवं हे समजून जातं. थोडे विसावल्यामुळे पुन्हा नव्याने जगण्याची ऊर्जा मिळते. अगं म्हणूनच ३६५ दिवसांत ३१ डिसेंबरला महत्त्व आहे. कारण हा दिवस आपल्याला पाठीमागचे दिवस आठवायला लावतो. चांगले, वाईट सोडून देऊन एका नव्या उत्साहाने पुन्हा नुतनवर्षाच्या स्वागताला तयार राहतो. एक नवचैतन्य, नवं बळ घेऊन. ३१ डिसेंबर हा दिवस एक निमित्त आहे मनाची मरगळ झटकून टाकण्यासाठी. आयुष्याचेही तसेच आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. त्याचा आनंद घ्यायचा असेल तर 'भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणाव…' पाठीमागचा आयुष्यक्रम विसरुन जाऊ या. जुनी मरगळ झटकून "कात" टाकून पुन्हा नव्याने जीवनाची सुंदर सुरवात करु या. नव्या उमेदीने, आनंदाने, समाधानाने. एकाच या जन्मे जणू फिरुनी नवे जन्मेन मी, याप्रमाणे सुख, शांती, आरोग्य, समृद्धी, भरभराट खऱ्या अर्थाने हवी असेल तर…खरंच,"घे विसावा या वळणावर… या वळणावर. उज्जवला ने विनयचा हात हाती घेत ती कधीच त्याच्या खांद्यावर विसावली होती. नव आशेची स्वप्ने घेऊनी.

- सौ.क्रांती तानाजी पाटील.
मु.पो.दुशेरे. ता.कराड.जि.सातारा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या