
कधी कधी जाते
कविता डोक्यावरून
कवीच्याही.....
कवी बसतो विचार करत..
शब्दांना पोखरत..
पण अर्थ काही गवसत नाही..
नुसतीच टरफलं
हाती येतात,
आणि अर्थाचे दाणे निसटून पडतात
खाली..
कवी,
गाफील राहून वाचत राहतो
ओळी ..
अन् कवितेची गोळी
पापणी लवण्या आधीच जाते
नजरेपार..
कवी
चकीत होतो..
भ्रमीत होतो..
कधी कधी
'रद्दड ' शेरा मारून मोकळा होतो..
तेव्हा
कविता हसते गालातल्या गालात..
खरेतर
तिला कवीची चरफड
पाहावत नाही..
ती निरखत राहते
कवीचा पडेल चेहरा..
तिला जाणवत राहते
कवीच्या आतली घुसमट..
कवीला
उगाचच वाटत राहतं
कवितेला अंकीत केल्याचं..
पण त्याच्या ध्यानातच येत नाही..
त्याच्या हाती आलेली असते
ती असते कवितेची कात..
कविता केव्हाच निसटून गेलेली असते
चपळ नागिनीसारखी..
हिरव्यागार कवीच्या शोधात...
- वसंत शिंदे, सातारा.
मो.नं.- ९९२२७७६०२७
मो.नं.- ९९२२७७६०२७
0 टिप्पण्या