लगावली = गालगागा गालगागा गालगा
कागदाची नाव आहे जिंदगी
कागदाची नाव आहे जिंदगी
अन् रडीचा डाव आहे जिंदगी.
दाखवू शकतो न कोणाला असा
खोल वर्मी घाव आहे जिंदगी.
भींत धरणाची उभी ती पाहुनी
पांगलेला गाव आहे जिंदगी.
जी किनाऱ्याला बुडाली शेवटी
ती अभागी नाव आहे जिंदगी.
अंगणाच्या पार ना गेला कुणी
कुंपणाची धाव आहे जिंदगी.
ती कधीही स्वस्त नव्हती एवढी
पाडलेला भाव आहे जिंदगी.
श्वास शेवटचा जरी आला तरी
वाढणारी हाव आहे जिंदगी.
ना कुणा जो गाठता आला कधी
अंबराचा ठाव आहे जिंदगी.
- वसंत शिंदे , सातारा.
मो.नं. ९९२२७७६०२७
0 टिप्पण्या