
लगावली = गागागागा गागागागा गागागागा
काळावरती रेघ ओढुनी गेले काही
जाता जाता भिंत पाडुनी गेले काही.
धूळ झटकली बिळे लिंपली दिवा लावला
बुरसटलेले ग्रंथ जाळुनी गेले काही.
कितीक वर्षे वाहत होती गटारगंगा
नाल्यावरती पूल बांधुनी गेले काही.
काळोखाची सत्ता होती सूर्यावरती
अंधारावर दिवा लावुनी गेले काही.
खुशाल होते निजले सारे दिवसाढवळ्या
रात्र रात्रभर जाग जागुनी गेले काही.
चिंधीसुद्धा नव्हती साधी लाज झाकण्या
उघड्यांवरती शाल टाकुनी गेले काही.
खरे बोलले म्हणून त्यांचा येशू केला
दुबळ्यांसाठी देह टांगुनी गेले काही.
- वसंत शिंदे , सातारा.
मो.नं. ९९२२७७६०२७
0 टिप्पण्या