मात्रावृत्त, वृत्त = लवंगलता
लगावली = गागागागा गागागागा गागागागा गागा
काळोखाला दावा कोणी रस्ता ऊजेडाचा
भोगायाचा शाप कितीदा त्याने अंधाराचा.
थकून गेले पाय अता हे धुंडाळूनी वाटा
बऱ्याच झाल्या झोळीमध्ये गोळा करून काचा.
असेल फट जर तुझ्या घराला नको करू तू चिंता
कौलातुनही येईल आत तुकडा आभाळाचा.
काही काळापुरते असते त्याचे वैभव येथे
वाडाही मग पडून जातो उरतो नुसता ढाचा.
फुगे संपता चुडे संपता गर्दी निघून जाते
संध्याकाळी नूर बदलतो भरल्या बाजाराचा.
चूल विझवता विझून जाइल जाळासोबत तोही
टिकेल कुठवर धगधगणारा ताठा अंगाराचा.
- वसंत शिंदे , सातारा.
मो.नं. ९९२२७७६०२७
0 टिप्पण्या