
अक्षरगण वृत्त, वृत्त = मंजुघोषा
लगावली = गालगागा गालगागा गालगागा
कोणता होईन तारा या नभाचा
आसरा मिळणार का तेथे उन्हाचा
दाटुनी आभाळ येता सांजवेळी
जीव का व्याकूळ झाला पाखराचा
'चेहरा बदलून गेला बघ तुझाही'
बोलता पारा उतरला आरशाचा
जाहले आरोप नाहक काळजावर
दोष पण नव्हताच केव्हा काळजाचा
भेटण्या गेले उपाशी पारध्याला
एवढा होता गुन्हा त्या सावजाचा
नाव बुडताना दिला आवाज होता
ऐकला ना पण कुणीही सागराचा
घाव त्याने सोसले सारे छनीचे
केवढा संयम म्हणावा कातळाचा
- वसंत शिंदे, सातारा.
मो.नं. ९९२२७७६०२७
0 टिप्पण्या