
मात्रावृत्त, वृत्त = ब्रम्हरूपक
लगावली = गागागागा गागागागा गागागागा गागागागा
कुठे निघालो माहित नाही घेउन पाठी आयुष्याला
माथ्यावरती सूर्य तरीही वाट लागते चालायाला.
सारे आहे अवतीभवती खंत तरीही आहे इतकी
एकलकोंड्या मुक्या मनाशी कुणीच नाही बोलायाला.
रात्र अघोरी रोजच येते दार ढकलुनी घरात माझ्या
संपुन जाते तेल दिव्याचे कुठे जायचे मागायाला.
वेळ विसरुनी घड्याळ पळते काट्या मागे पळतो काटा
धाप लागते डोळ्यांना पण तरी लागते धावायाला.
हात कशाने जखडुन जातो पायामध्ये पडते बेडी
रातकिड्यांची सेना येते रोजच धुडगुस घालायाला.
वारा येतो खिडकीपाशी थोडा थांबुन निघून जातो
उघडुन बघतो दार परंतू कडी न येते उघडायाला.
ताऱ्यांच्या त्या अग्नीमध्ये रात्र बिचारी जळून जाते
भूपाळीच्या सूरांसंगे सूर्य लागतो उगवायाला.
- वसंत शिंदे, सातारा.
मो.नं. ९९२२७७६०२७
0 टिप्पण्या