मधुसिंधू काव्यसंमेलनाचा दिमाखदार सोहळा उत्कृष्ट पद्धतीने व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला, हे पहिले ऑनलाईन काव्यसंमेलन होते. भारतातील व भारताबाहेरील सुमारे ४५ कवयित्रींचे संमेलन १३ जून २०२१ ला संपन्न झाले. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या संमेलनाचे उद्घाटन सौ.सुभद्राताई वागसकर यांच्या हस्ते झाले. ईशस्तवन कु.सुरभी फडणीस यांनी तर स्वागतगीत सौ.आशा नष्टे यांनी सादर केले.
या ऑनलाइन काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थान माधुरी मगर-काकडे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी प्रा.पद्मा हुशिंग व प्रा.डॉ.अरुणा मोरे यांनी रसिकांना खिळवून ठेवणारी मनोगते सादर केली. त्यांनी विविध कवी-कवयित्रींचे साहित्यातील योगदान आणि समाजासाठी असलेले बोधप्रद कार्य यावर प्रकाशझोत टाकला.
पर्यावरण, निसर्ग, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्त्ती, आरोग्य, साक्षरता, स्त्रियांचे योगदान अशा विविध सामाजिक विषयांवर कविता सादर झाल्या.
पर्यावरण राखा
राखा समतोल
जाणा त्याचे मोल
वृक्षारोपण.
स्वांतसुखाय
वृक्षांची तोडणी
निसर्ग मोडणी
पर दु:खाय…
काळजी राखू
जरा निसर्गाची
धरा जपण्याची
मोहीम आखू
हाव वाढली
लोभी माणसाची
आशा भविष्याची
काळवंडली…
झाडे तोडली
श्वसनविकार
रुग्णही बेजार
खोड मोडली
अशाप्रकारे वृक्षारोपण, पर्यावरण रक्षणाची गरज कवितेच्या माध्यमातून काही कवयित्रींनी बोलून दाखवली.
समजू नका
तिला तुम्ही कमी
कर्तव्याची हमी
देते बरं का !
मुलगी असे
परिवारा शान
मिळतसे मान
कर्तृत्व तसे!
जन्मता परी
ठेवूया सुखात
दोन्ही कुळात
आनंद सरी
नाही अबला
राहिल्या महिला
जमाना पाहिला
झाल्या सबला !
मुलगी वाचवून तिच्या कर्तृत्वाला वाव देण्याविषयी आणि तिच्या कार्यक्षमतेविषयी जणू काही आश्वासक दृष्टिकोन प्रकट करणाऱ्या काही कविता रसिकमनाला भावून गेल्या.
मदत सदा
सढळ हाताने
शहाणपणाने
सत्याच वदा
व्यसनांपोटी
कर्जाचा डोंगर
सदा डोईवर
प्रतिष्ठा खोटी
दारू, जुगार
घाणेरडा नाद
फुकटचा वाद
घर बेजार…
आरोग्यासाठी
योग अंगीकारा
सौख्याचाच धारा
व्यायामापाठी
असे सामाजिक संदर्भ असणाऱ्या कविता समाजातील व्यसनांपोटी होणाऱ्या ऱ्हासाचे चित्रणही सहजपणे करत गेल्या. तर काही कवितांमधून निसर्गाचे सुंदर वर्णन दिसून आले.
डोंगरावरी
झरझर आल्या
नदीस मिळाल्या
धावत सरी
पाऊस आला
सुटे गार वारा
गारा आल्या दारा
आनंद झाला!
साहित्यविषयक गुणगाण गाणाऱ्या काही सुंदर रचनाही सादर झाल्या.
साहित्य झरे
ओव्या श्लोक गाणी
सुमधुर वाणी
सदा पाझरे
राजश्री वाणी-मराठे व प्रा.सुनीता फडणीस यांचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. सर्वच कवितांचे अतिशय सुरेख पद्धतीने सादरीकरण झाले. केवळ मनोरंजनाला प्राधान्य न देता प्रबोधनात्मक पातळीवरही हे संमेलन यशस्वी ठरले. या पहिल्या-वहिल्या काव्यसंमेलनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
0 टिप्पण्या