
कराड : पुणे येथील प्रतिष्ठित माय मराठी प्रतिष्ठानचा उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार कर्नाळ ता.मिरज जि.सांगली येथील लेखक/कथाकार सचिन वसंत पाटील यांच्या तेजश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'गावठी गिच्चा' या कथासंग्रहास नुकताच जाहीर झाला आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.सुभाष पाचारणे, सचिव बाळासाहेब खरात यांनी दिली आहे. कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह अशा तीन प्रकारांसाठी माय मराठी प्रतिष्ठान कडून पुरस्कार दिले जातात. माय मराठी प्रतिष्ठान या संस्थेने साहित्य क्षेत्रात अगदी कमी वेळेत एक दर्जेदार आणि विश्वासू संस्था अशी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विविध उपक्रम राबवून लिहित्या हातांना बळ देण्याचं काम ही संस्था करते. पुरस्कारांचे हे चौथे वर्ष असून लवकरच जाहीर कार्यक्रमाद्वारे मान्यवरांचे हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल असेही त्यांनी कळविले आहे.
माय मराठी प्रतिष्ठान तर्फे कादंबरी विभागासाठी 'ओरबिन' या लेखक गजानन यशवंत देसाई यांच्या कादंबरीस तसेच 'सईच्या कविता' या संदीप काळे यांच्या कवितासंग्रहास देखील पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत.
सचिन पाटील यांचे 'सांगावा', 'अवकाळी विळखा' व 'गावठी गिच्चा' असे एकूण तीन ग्रामीण कथासंग्रह प्रकाशित असून यापूर्वीही त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे बी.ए. भाग एकच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या 'अवकाळी विळखा' या कथासंग्रहातील 'कष्टाची भाकरी' या कथेचा समावेश करण्यात आला आहे. माय मराठी प्रतिष्ठानच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध माध्यमातून साहित्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या