
माय जिजाऊ आणि शिवबा राजेंच्या पाऊलांनी आणि पराक्रमांनी पुनित झालेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास मुलांना सांगतो तेव्हा मन आभाळाएवढं होतं, नाही का..?
गडकिल्ले म्हणजे शिवरायांच्या दैदीप्यमान, स्फूर्तिदायी प्रवासाची साक्ष..
मला दिसत होते तटबंदीशी उभे राहून अफजलखानाच्या भेटीची व्यूहरचना आखणारे राजे..
दरबारात सल्ला मसलत करणारे अष्टप्रधान मंडळ..
इथेच राजांना जिजाऊंच्या पावलांशी लढण्याचं बळ मिळालं असेल.
सईबाई-सोयराबाई-पुतळाबाईंनी इथेच मोहिमेवर गेलेल्या राजांची डोळ्यात प्राण आणून वाट पाहिली असेल.
शंभूबाळ-बाळ राजाराम इथेच दौडले असतील.
भवानी-येसू-तारा इथेच कर्तृत्वनिष्ठ झाल्या असतील.
कित्येक प्रसंग, कित्येक अनुभव नुकतेच घडल्याप्रमाणे डोळ्यासमोरून सरकत गेले.
मी माझ्या या सर्व दैवतांची चरणधूली नतमस्तक होऊन अभिमानाने मस्तकी रेखिली. त्यांच्या प्रतापाची साक्ष देणारे हिऱ्याहून मौल्यवान चार कणखर दगड मुठीत गच्च धरून मार्गस्थ झाले..
-विजया पाटील, कराड
0 टिप्पण्या