
लगावली = लगालगा लगालगा लगालगा लगालगा
सख्या कुशीत घे मला अजून ना उजाडले
अजून जागले कुठे निनाद राउळातले.
विझून जावु देत हे नभात शुभ्र चांदणे
खुशाल हात काढ मग हळूच तू गळ्यातले.
निशब्द गात्र गात्र अन् निशब्द ओठ हे जरी
लयीत बोलती कसे तुझे ठसे उरातले.
तुझ्या मिठीत मंद मंद श्वास धुंद जाहला
तुझ्या उरातले अनंत मी तरंग चुंबले.
फुलून प्रीत येवु दे झरा भरून वाहु दे
खुडायचेय चांदणे तुझ्या खुल्या नभातले.
तुझेच स्पर्श नेहमी मनोमनी शहारले
तुझेच राजसा सदा धुके उरात दाटले.
- वसंत शिंदे , सातारा.
मो.नं. ९९२२७७६०२७
0 टिप्पण्या