लगावली - लगालगा लगालगा लगालगा लगालगा
सुखात नांदली खुशाल काळजात वेदना
सुरात गात राहिली सदा उरात वेदना.
कवाड खोलले तरी कधी न दूर जाहली
दडून आत राहिली सुन्या घरात वेदना.
कधी न चूल मातली कधी न ओल दाटली
बनून धूर पांगली खुल्या नभात वेदना.
जरी झळा न सोसल्या उजाड प्राक्तनातल्या
तरी गुमान हिंडली सवे उन्हात वेदना.
कधी न जाहली उजाड बाग काळजातली
सुगंधली फुलांपरीच आसवात वेदना.
लबाड या सुखास रे तमाम लोक भाळले
नि बेदखलच राहिली पुर्या जगात वेदना.
- वसंत शिंदे , सातारा.
मो.नं. ९९२२७७६०२७
0 टिप्पण्या