Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

आंदण | मराठी कविता | कवी उन्मेष पाटील

आंदण, राधे, नारी शक्ती

    “आंदण”

    राधे,
    तुझ्या अश्रूंनी यमुनेचा रंग काळा झाला होता…
    असं ऐकिवात आहे
    हाच अश्रूंचा वसा इथे आंदण मिळालाय जन्मजातच
    कित्येक राधांना…

    खरंतर मुलगी सांभाळणं म्हणजे
    एखाद्या तुरूंगात दहशतवादी सांभाळण्या 
    इतकं कठीण वाटतं
    इथल्या प्रत्येक बापाला…
    तुला जगवतो, वाढवतो, शिकवतो आणि उजवतो..
    म्हणजे जणू उपकारच करतो आम्ही
    तुझ्या मानवी देहावर…

    तुझ्या मोबाईलमधल्या फेसबुक, इंस्टाग्राम 
    आणि व्हॉट्सअ‍ॅपचे
    पासवर्ड मिळवण्याचा माझा आग्रह
    तुझ्यासाठी काळजीवाहू की एक संशयी भाऊ म्हणून?
    पण तू कधीच बोलत नाहीस
    मा‍झ्या तीन-तीन अफेअर्स आणि अश्लील चॅटिंग बद्दल,
    वैयक्तिक आयुष्याला सेन्सॉर करण्याचे अधिकारच
    हसत हसत बहाल करतेस तू साऱ्यांना…

    “काळजीपोटी घरचे बाहेर जाऊ देत नाहीत!”
    असं अभिमानाने सांगताना
    तुझे अबोल हुंदके झळकत असतात डोळ्यांमधून…
    मोबाईलवर कॉल, मॅसेज आल्यावर
    सगळ्या संशयी, प्रश्नांकित नजरांना 
    कशी सामोरी जातेस तू ?
    कदाचित त्यालाही सवय लागलीये
    मुकेपणाने वायब्रेट उसासे देण्याची!

    ‘पोरीच्या जातीला हे यायलाच पाहिजे!’
    या अट्टाहासातून घडवत असतेस तू
    भविष्यकाळाची समृद्ध बीजं !

    तुझं वयात येणं घोर लावतं म्हणे आम्हाला
    आणि मग तुझ्या करिअर आणि महत्वाकांक्षांचा
    सामूहिक खून करून…
    समवयस्क, समडिग्रीच्या मानवी देहाबरोबर 
    संधान साधतेस…

    राधे,
    आता यमुनेकाठी श्रीकृष्णाच्या ओल्या खांद्यावर
    विसावण्याचं स्वातंत्र्य तुला नाहीये…
    तुलाच बनावं लागेल आता
    आंदण मिळालेल्या अश्रूंना वाट देणारा खांदा !!

    - उन्मेष उद्धव पाटील,
      तळमावले, ता.पाटण, जि.सातारा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या