
डोह
डोह ओढ्याच्या काठचा,
निळं निळं खोल पाणी
निळ्या लाटेची डोहात
निळी प्रीत...निळी गाणी!
धुंद वाऱ्याशी खेळतो,
डोहाकाठचा लव्हाळा
साऱ्या गावाला लागला
अशा डोहाचा जिव्हाळा.
तुझ्यासाठी माझ्यासाठी,
खोप्यातल्या चिऊसाठी
डोह गावची पुण्याई
डोह मुक्या जीवांसाठी!
डोह अमृताचा ठेवा,
डोह ओढ्याचा या पान्हा
खडकाच्या कुशीमंधी
डोह खिदळतो तान्हा.
युगायुगांचा सोबती,
डोह गावाला प्राणाचा
गंगेहून कितीतरी
डोह गावाला मोलाचा !!
- प्रमोद महादेव मोहिते
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
0 टिप्पण्या