Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

दंश | ग्रामीण कथा | रोहिदास बापू होले

Gramin Marathi Katha  | Rohidas Bapu Hole I Balatkar Marathi story

आज नारबा बिगी बिगी गावची वाट चालू लागला होता. मनात विचारांचा कोंडमारा चाललेला. कपाळावर गोधडीसारख्या आट्या पांघरलेल्या स्पष्ट जाणवत होत्या. घर रानात असल्याने रोज एखादी चक्कर गावात हमखास असायची. पण आज पावलं झपाट्याने पडत होती, म्हणजे नक्कीच काहीतरी विपरीत कारण असावं म्हणून वाटेत भेटलेला हरी चौकशी करू लागला.
        “अरं काय रं नारबा? आज लयच गडबडीत हायशी”
        “काय सांगू लेका हरी, जरा इशेस काम हाय. सरपंचाच्या वाड्याकडं जायचं हाय. सरपंचानं बोलावणं धाडलं हाय. तवा येळात येळ काढून म्या निघालोय”
नारबाचं बोलणं ऐकून हरीच्या विचारांची उंची गगनाला भिडत होती आणि तो जरा हळू आवाजात पुटपुटलाच.
        “काय इशेश काम तुला ठाऊक असलंच नव्हं. म्हंजी सहजच इचारपूस केली”
        “तसं काय बी नव्हं हरी. तू काय परकाबिरका हायसं का रं?” असं म्हणत नारबा उरलेली वाट भर उन्हात कापत निघाला. काही वेळातच सरपंचाच्या वाड्याजवळ पोहचताच नारबाच्या मनात विचारांचं जाळं घट्ट होऊ लागलं. “कशासाठी बोलावलं असल बरं” नकळतपणे स्वत:शीच बोलत होता. तेवढ्यात, “अरं ये नारबा! आतमंधी ये.” सरपंचानी वरच्या खोलीच्या गच्चीतून आवाज दिला. चटकन् विचाराने बावरलेला नारबा भानावर येत बोलला, “येतू येतू सरपंच सायब.” इतक्या मोठ्या माणसाच्या घरचा टापटीपपणा पाहून नारबा तसाच उभा राहीला. त्याला आपलं सात जन्माचं उसवलेलं दारिद्र्यच दिसत हुतं. कारण सरपंचाच्या घरचं राजवैभव पाहून तो खजील झाल्यासारखा भासत होता. हे सरपंचाने तारलं आणि बोलू लागले.
        “हे बघ नारबा काय बी फिकीर करू नगं. आपलंच घर हाय. तवा हक्कानं यायचं. काय लागल तवा मला बोल.” बोलणं ऐकून नारबाने स्वत:ला सावरत होकारार्थी मान डुलवली. नारबा विचारू लागला.
        “काय काम व्हतं सायब मला बोलावून घेतलंशी.”
        “अरं नारबा तुझी पोर शिकली हाय. रुपानं पण उजवी हाय. तवा काय इचारबिचार केला का नव्हं पिवळं करण्याचा?” सरपंचाच्या बोलण्यावर बारकाईनं लक्ष देत नारबा बोलला,
        “सरपंच सायब! सगळं खरं हाय, पण म्या काय म्हणतूय यंदा पावसानं दगा दिला. तवापासून वावार इधवा बायसारखं एकटंच निपचीत पडलंय. घरात पैका तरी कुठून येणार! पयलंच सावकारचं करजं फेडता फेडता नाकी नऊ आलूया. कारभारणीचं बी सपान अपुरं राह्यलं. गळ्यात फुटका मणी सुद्धा नाय. पोर हुशार केली कशीबशी. पण उभं आयुष्य घालवलं गरिबीत. एक वकूत पोटाची खायची पंचाईत. तवा अशा परिस्थितीत कसा ईचार करणार साहेब?” गहिवरता सूर डोळे भरत होता. तेवढ्यात सरपंचानं मनात कसलातरी विचार करून नारबाच्या खांद्यावर हात ठेवला.
        “लय इचार करू नगंस नारबा. जात्याल दिस निघून” म्हणत आतल्या खोलीत सरपंच गेले. घरगड्याने नारबासाठी चहा आणला होता. चहाचा घोट तोंडात घेणार तोच सरपंच बाहेर आले. त्यांच्या हातात पैशाचा बंडल स्थिरावला होता.
        “सायब चहा प्या की.”
        “अरं घे तू नारबा”
असं म्हणत सरपंचानी पैक्याचा बंडल नारबा पुढं ठेवला. इमानदारी नारबाला काही समजत नव्हतं. पैसे पाहून अवाक झाला.
        “ह्य बघ नारबा, ह्य काही पैकं घे. तुझी काय काम असत्याल ती उरकून घे.”
        “नगं नगं सरपंच सायब! मला ह्य झेपणार नव्हं अजाबात नगं.” कळकळीन नारबा बोलू लागला.
        “अरं लक्ष्मी हाय,तिला असं कोणबी डावलतं व्हय? घ्ये जसं तुला जमल तसं मला फिरतं कर. पर आताची येळ झाकून ने.” सरपंचाच्या आग्रहाने नारबाने पैसे घेतले.
        “सायब लय उपकार व्हतील तुमचं. म्या कवा बी इसरणार नाय.”
        “राहू दे नारबा, तू जा आता घरी, म्या उद्याच्याला रानात चक्कर मारलं. तवा बोलू.”
        सरपंचांच्या या बोलण्यावर नारबा खूश झाला आणि म्हणाला, “सायब कधीबी या पर चहा बिगर जायचं नाय.” असे म्हणत नारबाने सरपंचांचा निरोप घेत त्याच्या झोपडीकडे निघाला. घरी येताच नारबाच्या बायकोने पाणी प्यायला दिले आणि म्हणाली,
        “काय व्हं व्हतं काम?”
झालेला विषय नारबानं सगळा कथन केला. दोघंही मनोमन खूश झाले होते. हुरहुरलेली चिंता बर्‍यापैकी कमी झालेली दोघांच्याही चेहर्‍यावर स्पष्ट दिसून येत होती. काही वेळाने नारबाची मुलगी उमा घरातले काम उरकून आई बाबासमोर येऊन बसली. उमा दिसायला सुंदर आणि स्वभाव तिचा मनमोकळा असल्याने सहजच ती सर्वाची लाडकी होती. गप्पागोष्टी झाल्यावर सांजेला उमाने दिवेलागण करुन देवाला,आई बाबांना नमस्कार केला आणि लागलीच आईला मदत म्हणून स्वयंपाक घरातल्या चुलीपुढं ढिय्या मांडला.
        “आई उद्या लवकर उठवशील का गं?” उमा बोलली
        “व्हयं गं पोरी,पर उद्या काय बेत आखलाय गं?” आईनं मिश्कीलपणे विचारलं.
        “काय नाही गं आई, छोटंस काम आहे, मैत्रिणीच्या बाबांचा वाढदिवस आहे; तेव्हा मैत्रिणीकडे मदत म्हणून जाईल म्हणते.” काही हरकत नसेल आईची, हे उमालाही माहीत होते; तरीसुद्धा आपले संस्कार, रितीरिवाज जपणारी उमा बोलली. आईचा होकार आला तशी तिची रात्र स्वप्नांनी कल्पनेच्या पलीकडे डोकावत असताना, आईच्या हाकेने कधी पहाट उजाडली हे तिला कळलंच नाही. गाईचा गोठ्यातून हंबरणारा आवाज,पक्षांचे किलबिल सूर, अंगणात झाडू मारणारी आई, अन् बाबा गुरांना वैरण खायला घालत असलेला हा पहाटेचा वास्तव देखावा आणि निसर्गाला फुटलेली सदाबहार पालवी. त्यात आणखीन उमाचे सौंदर्यतेज उजळून दिसत होते. सकाळची सर्व तयारी आटोपून उमा घरातून निघाली. वाटेत जात असताना मधेच सरपंच भेटले.
        “काय गं पोरी? तू नारबाची लेक हायना”
        “हो” उमा बोलली
        “नारबा घरला हायका का नाय? तू कुठं चाललीया?” सरपंचाने सवाल केला.
        “मी एका कामानिमित्त मैत्रिणीकडे जात आहे; येईल दहा वाजेपर्यंत परत” असे बोलून उमा निघून गेली. सरपंच नारबाच्या घराच्या दिशेने चालू लागले. सरपंच मनात अनेक विचारांशी हितगुज करता करता नारबाच्या दाराशी पाऊल पडलं. तशी नारबाची बायको डोक्यावर पदर घेत घरात शिरली. पाण्याचा लोटा घेऊन सरपंचांना बसण्याकरता एक गोणपाट जमिनीवर टाकलं.
        “कुठं हाय नारबा? समदं बरं हायना?” म्हणत इकडची तिकडची चौकशी करू लागला
        “धनी वावरात काम करत्याती. थांबा म्या बोलावती त्यांसनी” असे म्हणत ती अंगणाच्या बाजूच्या बांधावर उभा राहून आवाज देऊ लागली. इकडे सरपंच घराच्या आड्यावर अडकवलेल्या फोटोला मग्न होऊन न्याहाळत होते. तो फोटो पाहून सरपंचाच्या चेहर्‍यावर एक वेगळाच भाव उमटला होता. तेवढयात नारबा अन् त्याची बायको घरात आली.
        “राम राम सरपंच सायब. गरीबाच्या उंबर्‍याला पाय लागल्ये. लय झाक वाटलं” नारबा बोलला. तसं सरपंच उद्गारले “राम राम नारबा”
असं करता करता यांच्या गप्पागोष्टी चांगल्या रंगल्या. बराच वेळ गेला. पण सरपंचाच्या मनात कसलं तरी वादळ घोंघावत होतं. साडे दहाच्या दरम्यान उमा घरी आली. अजूनही यांची गप्पांची मैफील चांगलीच रंगली होती. उमाला पाहताच सरपंच जरा स्तब्ध झाले.
        “काय गं उमा केली का गं मदत मैतरणीला?”
        “हो गं आई! छान वाटलं तिला आणि तिच्या बाबांना” असे म्हणत उमा स्वयंपाक घरात गेली.
        “दोन घास खाऊनच जावा सायब तुमी आता आमच्याकडं” नारबाचा आग्रह जोर धरत होता.
        “बरं बरं” म्हणत सरपंचानी दुजोरा दिला. नंतर दोघंही स्वयंपाक होईपर्यंत वावरात गेले.
        “नारबा तुझी छोकरी झ्याक शिकली सवरली हाय. तवा तिला एका बेस ठिकाणी नवकरीला लावतू. पर तुझी तयारी असल तर. मा‍झ्या लय वळखी हाय मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यासोबत.” सरपंचाच्या या बोलण्यावर नारबाचा सरपंचाविषयी विश्वास बराच बसला.
        “पर सायब! लोक काय म्हणत्याल? पोरगीला कामाला लावून आयबापांनी चुकी केली.”
        “तसं काय नसतं नारबा, शिकली हाय बेस. नवकरी करून समाजात नाव कमवलं. चार लोकांत तुझ्या नावाची चरचा होईल. गरिबीतून हाल काढून पोरगीला सरकारच्या खात्यात नवकरीला लावलं. बघ गड्या इचार कर. माझं काय बी नाय. इच्छा असल तर तिला कागदपतरं तिचा फोटो आणि तिला घेऊन ये.” तेवढ्यात नारबाच्या बायकोने जेवायला आवाज दिला. नारबाच्या मनातला आनंद त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. कधी बायकोला सांगेल त्याला वाटू लागले. पण सरपंच गेल्यावरच बोलावं असं त्यानं मनाशी पक्कं केलं. जेवण आटोपल्यावर सरपंच वाड्याकडे निघून गेले. नारबाने खुशीची बातमी बायकोपुढे मांडली. तिला ही खूप आनंद झाला. या खुशीतच दोघांची रात्र विचार करण्यात गेली. शेवटी दोघांच्या मनाचा ठाम निर्धार होऊन उमाला सरपंचाकडे घेऊन जायचे ठरले. आता हे आयबाप सुखाचे स्वप्न रंगवू लागले होते. मागले दिस आता उलगडणार म्हणून मनातून सरपंच देवाप्रमाणे वाटू लागले. नशीब चांगले आहे या विश्वासाने ते झोपी गेले. दोन तीन दिवसांनी नारबा उमाला घेऊन वाड्यावर गेला.
        “ये नारबा बस! अरे लय झाक झालं उमाला पण आणलं.”
        “व्हय सायब आलो, अन् हा संगती कागदंपतरं पण आणलीत पोरीची.”
        “बेस केलं नारबा, म्या बोलतू वरच्या लोकांशी. कामाचं फिट करतू, काय बी काळजी करू नगस. पंधरा ईस दिवसांनी येक येढा मार वाड्यावर. मंजी समदी खबर तुला कळलं.” असं म्हणत सरपंचानी एक नजर उमाला न्याहाळलं.
        “काय गं उमा हायना तयारी काम करायची” सरपंच बोलले.
        “हो आहेना तयारी, मला मा‍झ्या आई वडीलांनी कष्ट करून पोटाला पीळ देऊन शिक्षण दिले. तर मी नक्कीच त्यांचे नाव उज्ज्वल करेन!”
        उमाच्या बोलण्याने सरपंचाने “शाब्बास बाळा” म्हणत पाठीवर कौतुकाची थाप दिली. आणि थेट नारबाने पोरीला घेऊन घर गाठलं. घरात जणू आता आनंदाचा उत्सव भरल्याचं चित्र दिसत होतं. नवी स्वप्न, नव्या दिशा, आणि सरपंचाचा आधार यातंच नारबाच्या कुटुंबाचं विश्व हरवलं होतं. अचानक एके दिवशी नारबाच्या बायकोची तब्येत बिघडली. गावच्या दवाखान्यात तिला घेऊन गेले. गोळ्या औषधे दिली. तरीही काडीमात्र फरक पडेना. देव-देवरूषी पण पाहून झालं. कसलीच दवा तिला स्वस्थ होऊ देईना.
        “बाबा, देव-देवरुषी सगळी अंधश्रद्धा असते. आईला चांगल्या डॉक्टरांना दाखवूया.”
पोरीचं हे समजदार बोलणं नारबाला पटत होतं; पण नारबाला मोठा खर्च झेपणारा नव्हता. पण सांगायचे कुणाला म्हणून देवाचाच धावा तो करत होता. अशा नाजूक स्थितीत पूर्ण रोवलेला नारबा हतबल झाला होता. काहीच त्याला सुचत नव्हते. अशातच एक व्यक्ती सरपंचाचा सांगावा घेऊन आला.
        “नारबा तुला अन पोरीला सायबांनी बोलावलं हाय. चांगल्या कामासाठी जिल्ह्याला जावं लागणार हाय.” हे बोलणं ऐकून नारबाला वाटलं चांगली बातमी नशीब उलगडणार. तर दुसरीकडे त्याची आजारी बायको. त्याची अवस्था तराजू प्रमाणे झुकती झाली होती.
        “पाव्हणं सरपंच सायबांशी येक निरुप द्या.”
        “काय सांगायचं हाय?”
        नारबानी आजारी बायकोची अवस्था त्याच्या कानावर घातली.
        “सांगतू सांगतू नारबा. चल जातो म्या.” म्हणत सरपंचाचा गडी निघून गेला.
नारबाच्या बायकोची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली. हाडांची काडं झालेली पाहून नारबाची मनस्थिती आणखीनच गंभीर झाली. एकुलती एक मुलगी आणि बायको असा तिघांचा परिवार. पण आजघडीला उतरती कळा लागलेली पाहून नारबाचं पार अवसान गळून गेलं. तरी शिकल्या पोरीच्या मानसिक आधाराने एक एक दिवस कसा बसा ढकलणे या पलीकडे नारबाकडे कसलाच मार्ग नव्हता. सरपंचाला गड्याकडून मिळालेल्या माहितीवरून सरपंचाने लागलीच नारबाकडे धाव घेतली. हतबल नारबाला पाहून सरपंच बोलले.
        “काय झालं नारबा?”
        “सायब! नशीब फितूर झालंया आमच्याशी,काय बी समजेना,जगणं नको झालंय.” 
एकीकडे नारबाच्या बायकोला सलाईन लावलेली, एकीकडे पैशाची चणचण असे अनेक संकटं तोंड आ वासून उभी होती. सरपंचाने पैशाची तजवीज करून रूग्ण मोठ्या दवाखान्यात हलवायचे ठरवले. नारबाला धीर देऊन कसंबसं आभाळ कोसळलेलं शांत केलं. सरपंचाचे उपकार कसे फेडावे. जणू देवाचा साक्षात्कार व्हावा असा नारबाचा विश्वास दृढ झाला.
        “अरे नारबा, उमाला घेऊनशा जिल्ह्याला जायचं हाय. नवकरीचं काम हाय. तवा कसं काय नियोजन करायचंय, तातडीने अधिकार्‍यांना भेटायचं हाय. संधी चालून आलीया बग.” सरपंच नारबाला सांगत होते. आता तर नारबाला ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी द्विधा अवस्था झाली होती. एकीकडे बायकोचं आजारपण दुसरीकडे नशीब सुखासाठी खुणावतेय अशी मनाची झालेली अटकळ ही स्वस्थ बसू देईना. शेवटी मनाचा निर्णय करून बोलू लागला.
        “सायब येक इनंती करू का?”
        “बोल ना नारबा”
        “सायब तुमी देवमाणूस हाय. येका गरीबासाठी तुम्ही सारं काय करताय. तुमचे उपकार भी लय हाय. आभार कसं मानावं त्येच कळत नाय”.
        “अरं नारबा असं काय बोलतूया?”
        “सायब म्या काय म्हणतूया, म्या कारभारणीसोबत हाय दवाखान्यात. तुमी तेवढं पोरीच्या कामाचं बघा. तिला घेऊनशांनी जावा.” नारबाच्या बोलण्यातून सरपंचाला अपेक्षित होकार मिळाला.
        “बरंय नारबा उद्याच्याला निघतो. पोरीला घेऊन जातो. रातोरात राहिल वाड्यावर. सकाळच्याला लवकर निघल आम्ही. आमच्या सरकाराला पर सोबत व्हईल बग तुझ्या लेकराची.”
        “ठीक हाय सायब, या तुमी जाऊनशानी, म्या कारभारणीची काळजी घेतू.”
        “येते बाबा” म्हणत जड पावलांनी उमा सरपंचाबरोबर वाड्याकडे गेली.
नारबाच्या एका डोळ्यात आनंद तर दुसर्‍या डोळ्यांत दु:ख असा दुहेरी संगम पहायला मिळत होता. बायकोला मोठ्या दवाखान्यात दाखल करून थोडा सुटकेचा निश्वास घेतला. इकडे उमा आणि सरपंच सकाळी लवकर निघाले. गावातून तेवढी एकच बस सकाळी असायची आणि संध्याकाळी मुक्कामी यायची. उमाचा प्रवास बसने चालू झाला. शेजारी सरपंच बसलेले. रस्त्यावरचे खड्डे आदळआपट करत असताना सीटवर बसलेल्या माणसांचा एकमेकांना धक्का लागत होता. रुपाची खाण असणार्‍या उमाला आज फक्त सरकारी नोकरीची आस लागलेली जाणवत होती. पण एक अमानुष खेळ आज जन्म घेणार सरपंचाशिवाय कुणाला ठाऊक असेल का? जशी जशी बस पुढे अंतर कापत होती. तशी तशी वेळेची उत्कंठा वाढत होती. अखेर बस एका थांब्यावर थांबली. सरपंच आणि उमा खाली उतरले. तिला सोबत घेऊन काही अंतरावर आणि जरा सीमेंटच्या जंगलात गर्दी असणार्‍या बंगल्यातल्या एका खोलीमध्ये गेले. तिथं उमाला बसवून सरपंच कुणाला तरी भेटून येतो असे सांगून काही वेळाकरता बाहेर गेले. उमा एकटीच बसलेली. तिच्या नजरेत अजूनही स्वप्नात पाहीलेलं ऑफिस दिसत नव्हतं. ना कोणी तिथे सोबतही नव्हतं. विश्वासावरच दुनिया जिंकता येते. तिथं तर माणूस काय चीज. या विश्वासावरच उमा आज नोकरीच्या आशा पल्लवित करून एकटीच बसली होती. थोड्यावेळाने उमाला समोरचे दृश्य पाहून धक्काच बसला. चक्क सरपंच दारू पिऊन तिच्या समोर उभा होता. थोडावेळ तिला काही सुचेना. सरपंचाने दाराची कडी लावून घेतली. तशी उमा बिथरली. सरपंच पुढे सरसावत तिला स्पर्श करू लागला. आता मात्र तिच्या पायाखालची वाळू सरकली. एका निष्पाप कन्यांवर अत्याचार होणार हे तिलाच काय पण नारबालाही स्वप्नात वाटले नाही. छप्परातील आड्यावरच्या फोटोला आधीचं दंश करून चवताळलेला अमानुष प्राणी तिच्या देहाचे लचके तोडायला लागला होता. कोवळ्या कळीचा चित्कार ऐकायलाही आसपास कोणी नव्हते. जीव मुठीत धरून स्व: रक्षणासाठी केलेली गयावया याचेही भान या विषारी सापाला राहिले नाही. वयालाही न शोभणारे लज्जास्पद वर्तन विश्वासाच्या नावाखाली पुरते धुळीस मिळविले. उमाच्या तारुण्याची राखरांगोळी झाली.
        “ये पोरी झाल्या गोष्टीची कुठं बी वाच्यता केलीस तर पार ठार मारीन. तुझं कुटुंब उध्वस्त करीन” अशी धमकी देत तिला तिच्या घराच्या अर्ध्या रस्त्यात सोडून दिले. ती शिकार झालेली हरिणी चाचपडत चाचपडत आपल्या घराकडे आली. तोच समोर जोर जोराने रडण्याचा आवाज. जमा झालेले लोक. आधीच तिच्यावर वार झालेल्या मानवतेच्या क्रूर हल्ल्याने ती पूर्णच घायाळ झाली होती. तिची आई हे जग सोडून गेली होती. बाप त्या प्रेतावर डोके आदळत का सोडून गेलीस? म्हणून जाब विचारत होता. उमाच्या असह्य झालेल्या मनाचा ताबा ढासळला. तिने थेट झाडाच्या खनपुसाला अडकवलेल्या पिकांवरचे औषध प्राशन केले. आणि घडला प्रकार एका चिठ्ठीत टिपून ठेवला. झाडाखाली तिची तडफड चालू झाली. आणि उमानंही शेवटचा श्वास घेतला. कोणीतरी ही बातमी नारबापर्यंत पोहचवली. सारं आभाळंच तुटून पडलं. त्या चिठ्ठीतील शोकांतिकाने सारं गाव हळहळ करत होतं. विश्वासाचा आणि गरिबीचा फायदा घेत एक अमानुष जातीचा प्राणी निष्पाप देहाला दंश करून गेला, याचं दु:ख कारभारणीच्या जाण्यापेक्षाही विषारी वाटलं. या त्सुनामीतून नारबा स्वत:ला सावरू शकला नाही. विश्वासाने झालेला दंश त्याच्या जगण्यालाही बाधला आणि मृत्यूच्या दारात उभा ठाकला. पण तो विष पेरणारा मानवी दंशक मनगटशाहीच्या बळावर मोकाट फिरून अजून किती जणींना दंश करणार होता देव जाणे...

लेखक - रोहिदास बापू होले.
मु.गोपाळवाडी, ता.दौंड, जि.पुणे.
मो. ९०२८३४१५३६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या