Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

हा छंद जीवाला लावी पिसे | ललित लेख | सौ.क्रांती पाटील

ha chand Jivala Lavi Pise, Marathi lalit lekha, kranti Patil

सकाळची वेळ पक्षांची किलबिल, प्रत्येक घरापुढची अंगणे कशी सडा, रांगोळीने नटलेली, घरातील पारुसा केर काढलेला असतो. त्यामुळे घरही स्वच्छ आणि नीटनेटके एखाद्या नव्या नवरीप्रमाणे नटलेले दिसते. आणि मग मूढ ही एकदम भन्नाट होतो. सर्वांचा चहा, नाष्टा, जेवण देऊन मग भांडी कुंडी, कपडे धुऊन हलकेच तोंडावरून हात फिरवून हुश्श केले. आता थोडा आराम करावा असं वाटत होतं. तोपर्यंतच जे डोळ्यांना दिसले. त्यांनी डोळेच विस्पारले एकदम. अरे देवा !!  ही काय? घाण करून ठेवली चिमण्यांनी हॉल मधील त्या निसर्ग चित्राच्या फोटोखाली आणि फोटो पाठीमागेही. शिवाय अजूनही त्यांचा चिवचिवाट चालूच होता. ते घरटे बनवत होत्या. त्यामुळे त्या काड्यांचा खूप कचरा पडला होता. खूप राग आला त्या चिमण्यांचा कारण आता कुठं आवरून बसते न बसते तोपर्यंत हे काम समोर. मग काय रागातच पुन्हा झाडू उचलला आणि शुकशुकशुक करून धुडकावून लावले पहिल्यांदा. मग मोर्चा त्या फोटोकडे वळवला. जरा चिडूनच ते त्यांचे अर्धवट बनवलेले घरटे पहिले मोडले. हो त्यांच्या कामाचा विचार मी का करू. त्यांनी केला का माझा विचार. मा‍झ्या स्वच्छतेच्या कामाचा असे पुटपुटतच काढून टाकले त्यांचे घरटे आणि तो कचराही. 

        चिमण्यांनी एकच चिवचिवाट उठवला व खूपच गोंधळ केला. नंतर थोडी शांतता झाली आणि मग मीही बसले कोचवर पुस्तक वाचत. थोडा वेळ गेला असेल नसेल तोपर्यंतच पुन्हा त्या चिमण्यां आपल्या चोचीमधे एक एक काडी आणून घरटे बनवू लागल्या. एक काडी आणायच्या आणि भुर्रकन चिवचिव करत उडून जायच्या. आता मात्र मी त्यांचा तो छंद बघतच बसले. कसलाच कंटाळा नव्हता त्यांना. एक एक काडी जमवून आणून दिवस मावळेपर्यंत त्यांचे सुंदर घरटे त्यांनी पूर्ण केले. खरतरं आता मलाही खूप आवडलं त्यांचे ते सुंदर घरटे. किती छान कलाकृती बनवली होती त्या चिमण्यांनी कसलाही कंटाळा नव्हता की थकवा. त्यांचा तो काडी काडी जमवून आणून घरटे बनविण्याचा छंद. या छंदामुळे स्वत: तर त्यांना आनंद मिळालाच. परंतु दुसर्‍यांच्या चेहर्‍यावरतीही आनंद देऊन गेला त्यांचा छंद. 

        खाली पडलेला कचरा गोळा केला. घर स्वच्छ केले. पुन्हा मात्र घाण नाही झाली तिथे उलट पूर्ण झालेल्या घरट्यांकडे एकटक पाहत राहिले. एक वेगळाच अनुभव मला आज यातून मिळाला होता. आपण ही असाच आपल्या लिखाणाचा छंद जोपासला या चिमण्यांसारखा न कंटाळता तर आपल्याही हातून अशीच छान कलाकृती निर्माण होईल. ती असाच आनंद देईल स्वत:ही व इतरांनाही. किती छान कल्पना सुचली आज मनाला. नित्याच्या त्याच त्या कामांचा कंटाळा येऊन चिडचिड करत बसण्यापेक्षा असे छंद नक्कीच जगण्यातला आनंद द्विगुणित करतात. चेहर्‍यावर स्मित हास्य घेऊन. एका वेगळ्याच नव ऊर्जेने आपला छंद आपण जोपासायचा आता पासूनच. मग मनाने पक्कं ठरवलं व केली सुरुवात!. छंद विरंगुळा तर देतोच पण स्वत:चे अस्तित्व जपायलाही शिकवतो. म्हणून परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीलाच नव्हे तर पशु, पक्ष्यांनाही एक एक कला बहाल केली आहे. या दैवी देणगीचा उपयोग छंदात करा. मग गुणगुणत राहाल हा छंद जीवाला लावी पिसे.

- सौ.क्रांती तानाजी पाटील
  दुशेरे, ता.कराड, जि.सातारा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या