
मंदधुंद पहाटवारा, दवात न्हाली अवघी धरा. मंद वाऱ्याने मोहरलेल्या लता, वेली, चाफ्याचा दरवळ, पारिजातकाचा गंध, मोगऱ्याचा सुवास. या सुवासात तन-मन ही डवरले. पक्ष्यांचे गुंजन, वाऱ्याची शीळ कृष्ण मुरारीच्या बासरीसारखे मनाला भुरळ घालत होती. त्यांच्या सुरात माझ्या जीवनाच्या सुरांचे सा, रे, ग, म छान जुळले होते. ही प्रीत मधूनच मनाच्या तारा छेडित होती. मन भावनांचा हा पिसारा मनाला स्पर्शुन जात होता मोरपिसाऱ्या सारखा.
दवात न्हालेले गवताचे अंग सर्वांगाला ओलावून जात होते. तलम रेशमी फुलाफुलांचे हे पदर वाऱ्यावर भिरभिरताना किती अल्लड भासत होते. सारंच कसं मनाला भुरळ घालणारे, तरल, भावुक, अनोख्या रंगाढंगाचे वाटत होते. क्षितिजाचे हे मोहक झिलमिल रंग दाहीदिशातूनी आभाळभर पसरलेले पाहताना त्या तांबूस, सोनेरी रंगछटात मनीच्या भावनांचे रंग कधी गडद होऊन त्यात मिसळून गेले. या रंगात मन भावनांचा अवघाची रंग एक होऊनी गेला. तो निसर्ग आविष्कार पाहताना. मनीच्या भावना या रंगीन दुनियेत रंगून गेल्या.
तो धुक्याचा धूसर पट्टा चंचल, धवल खगांसारखा भासत होता. मोगरा शुभ्र वस्त्र परिधान करून होता. पवित्रतेचा गंध दरवळत होता. पारिजातक पांढर्या फुलाला केशरी दांडा घेऊन उन्मादक गंध पसरवत होता. पिवळा बहावा हळद लागलेल्या नवरी सारखा दिसत होता. गुलमोहराची लाली मनाला समाधानाचा गारवा देत होती. लाल गुलाब आपल्या सौंदर्याची जादू फिरवित होता. हिरव्यागार पानांनी नटलेली ही नववधू अवनी अधिकच मोहक दिसत होती. सोनचाफ्याचा दरवळ साऱ्या आसमंती दरवळत होता. या सुगंधात मन अधिकाधिक घोटाळत होतं, एका वेगळ्याच अनुभूतिने मनभावना उत्तेजित होऊन ! एक नवी उभारी घेऊन ही प्रीत गंधाळली…
जादू है, नशा है, मदहोशीया है…असचं काहीसं गुणगुणत होते हे ओठ.
- सौ.क्रांती तानाजी पाटील.
मु.पो.दुशेरे. ता.कराड. जि.सातारा.
0 टिप्पण्या