Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

रखमा | मराठी ग्रामीण कथा | कथाकार प्रा.दिलीपकुमार मोहिते

मराठी ग्रामीण कथा, रखमा, Marathi Katha, Gramin Katha, Dilipkumar Mohite

रखमाच्या लग्नाला तीन साल झाली होती. हातात हिरवा चुडाभरला तवापास्नं रखमाने सुखी संसाराची स्वप्नं रंगवली होती. चार आयाबायांसारखं आपुण बी सुखी गृहिणी बनावं असं येडं सपान उराशी ठेवून शान रखमानं सासरच्या उंबरठ्यावरील माप लवंडल व्हत. पण त्या बापडीच्या सपनाचा चक्काचूर झाला. तिच्या माहेरचा आधार असलेला तिचा एकुलता एक बा तिच्या लग्नानंतर सहा महिन्यातच देवाघरी गेला व्हता. माहेरी मायेचं माणूस असं कोण बी नव्हतं. रखमाची आई रखमा चार महिन्याचीच असतानाच तिला बापाच्या हवाली सोडून या दुनियेतून गेली व्हती. तवापास्न चिमुरड्या रखमाला तिच्या बानं तळहातातल्या फोडाप्रमाणं जपलं होतं अन् रखमा वयात आली की स्वत:जवळची हुती नव्हती ती सारी पूंजी खर्च करून रखमाचं लगीन झोकात केलं होतं. कर्जाचा डोंगर उपसला पण पोरीला काय बी कमी पडू दिलं नाय. असा हिमालयासारखा पाठीशी असलेला एकमेव आधार निघून गेला अन् रखमा पोरकी झाली.

        दु:खाचा डोंगर रखमासमोर उभा राहिला. बापाच्या मृत्यूनं अन् सासरच्या छळानं ! सोसाट्याचा वारा यावा अन् भरलेल्या शेतातला मोतीचारा भुईसपाट व्हावा त्याप्रमाणं रखमाचं सुखाचं क्षण संपलं. रखमाच्या जीवनात वादळ आलं नवऱ्याच्या दारूचं. अन् सासूच्या छळाचं. रखमाच्या रक्ताचा थेंब अन् थेंब संपेपर्यंत ते वादळ घोंघावतच होतं. सहा महिन्यांनंतरच सासरच्या पाशवी वागणुकीस सुरूवात झाली अन् रखमाच्या सुखाची उतरंड ढासळली ती कायमचीच. लग्नाअगोदर भावी संसाराची सपनं बघणारी रखमा कोलमडून गेली.

        दिवसभर रखमाला दुसर्‍याच्या शेतावर मोल मजुरीसाठी जावे लागे. अन् घरी आलं की सगळं पैसं तिचा नवरा हिसकावून घेई. अन् पैसं काय केलं म्हणून सासू तिला बदडून काढी. सकाळचा स्वयंपाक रांधून रखमा कामाला जाई. सासू व नवऱ्याने खाऊन राहिलेलं अन्न तिला मिळे. रातचं राहिलेलं शिळंपाकं भी तिच्या वाटणीला ठरल्यालं असायचं.

        या तीन वर्षात रखमाला एकच सुख बाज्यापासनं मिळालं व्हतं ते म्हणजे तिचं एकुलतं एक लेकरू रामू. रामू आठ नऊ महिन्याचा असल परत्याला आईचं पुरतं दूध भी प्यायला मिळत नव्हतं. दोन वरीस राना-माळात राबून रखमाच्या हाडाची काडं झाली होती. सगळ्या अंगातलं मांस संपून नुसता चालता बोलता राबणारा हाडाचा सापळा झाला व्हता. कारण पोटभर जेवण रखमाला कधी मिळतच नव्हतं. पण रखमा जिद्दी होती, लेकरांसाठी कष्टत व्हती. राबत होती. रोजगार करीत होती. अंगावर दूध येत नव्हतं तर पाच रूपयाचं दूध आणून बाटलीतनं रामूला पाजत व्हती. तेवढंस दूध त्या पोरट्याला पुरत नव्हतं. रखमाला खोकला सुरू झाला. दिवसेंदिवस रखमाच्या अंगातलं रगात कमी होऊ लागलं, रखमा पार वटून गेली. चार आया-बायांनी सांगीतलं म्हणून डाक्टरांकडे गेली. जगाच्या लाजेनं सासूबी सोबत गेली. रखमा पार अशक्त झाली व्हती अन् डाक्टरानं निदान केलं. तिला अतिपरिश्रमानं टी.बी.झालाय म्हणून...

        आता तर रखमाच्या जाचाला सुमार राहिला नाय. तिची भांडी सवती ठिवली. तिला एका कोनाड्यातल्या अंधार्‍या खोलीत राहायला जागा दिली. जुनी फाटकी वाकाळ दिली. डाक्टरच्या दव्याला पैसा आणाय तिलाच मजुरीला पाठवाय लागले अन् तिचे लाडकं लेकरू तिच्यापासनं हिरावून घेतलं. नुसतं त्याच्याकडं बघणं बी तिला मुश्कील झालं. शिळं राहिलेलं कोरड्यास गाडग्यातनं अन् शिळीच भाकरी सकस आहार म्हणून तिला वाढला जाऊ लागला. रखमाला स्वत:च्या जीवाची काळजी नव्हती. अंगावरलं दूध न्हाय निदान पोराला वरचं दूध मिळावं म्हणून नेमानं सासूकडं दहा रुपयं देत व्हती अन् सासू त्यातले पाच रूपयाचं दूध अन् पाच रूपयाची मिसरी स्वत:साठी आणीत होती अन् दूध पाजताना म्हणत व्हती. 'भोकांड पसरायं काय झालयं, हे ढोस की दूध, एवढं बी पुरं व्हयनां व्हय रे. काळाबीळातनं उठल्यागत करतंयस.

        'हे सारं ऐकून रखमा उदास झाली होती. रखमाचा नवरा बाज्या नुसता खाटीक व्हता खाटीक त्याला कधी बी तिची दया-माया येत नव्हती. दारू पिऊन सांच्याला घरी आला म्हंजी तेवढा रामूला मांडीवर घेई अन् त्याला म्हणे, 'आजपासनं तुझा बा दारू सोडणार…' पाच-सात महिन्याचा तो चिमुकला जीव त्याच्याकडं बघून हुंदकं द्यायचा, ओरडायचा अन् बाला मायेची पालवी फुटायची. क्षणभरानं तो म्हणायचा, 'उद्यापास्नं दारू सोडणार, कामावर जाणार, तुला गड्या सुखात ठेवणार’ अन् पोरासमक्ष पोराचीच शपथ घ्यायचा.

        बिचाऱ्या इवल्याशा जीवाला काय बी कळायचं नाय. अंधाऱ्यातल्या खोलीत अंथरुणावर अर्धपोटी पडलेल्या रखमाला हे ऐकू जायचं अन् क्षणभर तिचं सारं दुःख दूर व्हायचं… पण क्षणभरच…

        कारण दारूड्याच्या शपथा या आळवाच्या पानावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाप्रमाणं क्षणभंगूर असतात. आळवाच्या पानावर पडलेला पावसाचा थेंब निघून गेला की ते पान पुन्हा पहिल्या सारखंच कोरडं असतं न भिजल्यासारखच, दारूड्याचं ही तसच असतं. त्यांच्या साऱ्या शपथा या मोडण्यासाठीच असतात. दुसऱ्या दिवसाची सायंकाळ झाली की रखमाला दमदाटी देऊन बाज्या दारू ढोसाय जायचा.

        रखमाची जिद्द मोठी होती. पण आता शरीर तिला साथ देत नव्हतं. रखमा जास्तच वठू लागली, खंगली, दुखण्यानं तिच्यावर मात केली. औषधपाण्याला पुरेसा पैसा तिच्याकडं नव्हता. सकस आहाराची तर ओरडच हुती वरती सासू व नवऱ्याने तिच्यावर आजारी पडल्यापास्नं बहिष्कारचं टाकला व्हता.

        गावात मात्र आपल्या चांगुलपणाची टिमकी सासू व नवरा वाजवीत होते. 'रखमा फाजीलचं हाय, आमच्याशी भांडून मुद्दाम त्या कोनाड्याच्या खोलीत राहिलीया असं आया-बायास्नी सांगत व्हती.'

        पण गावातली माणसं काय दूधखुळी नव्हती. चार आया-बायास्नी रखमाचं दु:ख, व्यथा, वेदना समजल्या होत्या, त्या रखमाच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करत होत्या. तिच्यासारख्या असलेल्या सासुरवाशीणी रखमाला काय ग्वाड ध्वाड खायला आणीत होत्या. आपल्या जवळचं चार दोन आणं, रूपया तिला दवाखान्याला, दवापाण्याला देत होत्या. रखमा आता अंथरुणावरच खिळून व्हती. उठण्याचं त्राणही तिच्यात नव्हतं, नवरा तिच्या उशाचं पैसं घेऊन आपली दारूची तलप भागवीत होता. रडत, कढत पाय आपटत रखमाची सासू पोराचं मात्र सारं करत व्हती. मात्र ती रखमाच्या खोलीकडे फिरकत नव्हती. बाहेरूनच तिला खेकसून जेवाण ठेवल्याचं सांगत होती. रखमाची तर आता अन्नावरची वासनाच उडाली होती.

        भरल्या गावात, भर दिवसा ढवळ्या रखमाचा छळ सासू, नवरा व नियती करीत होती. त्याला विरोध करण्यास एक बी मायेचा पूत आडवा येत नव्हता. कोण येणार ! कारण रखमा बाज्याची लगीन लावल्याली बायको व्हती. रखमाचा जीव रामूमध्ये गुंतला व्हता. तोच तिचा एकुलता एक सहारा होता. त्या चिमुकल्या जीवाकडं बघून तिच्या डोळ्यातलं पाणी सतत वाहत होतं. त्या पाण्याला अंतच नव्हता. नदीला पूर आला म्हंजी कधी तिच्या पाण्याला बांध घालता येतो का? तसंच रखमाच्या अश्रूंना बांध घालणं अशक्य झालं व्हतं. एक दिवस रखमा त्या अंधाऱ्या खोलीतून उठलीच नाही. फाटक्या वाकळच्या त्या अंथरुणातून बाहेर आली नव्हती. सासू जेवाण घेऊन आली होती. तिनं रखमाला हाका मारल्या, कसलीच हालचाल किंवा रखमाचं विव्हळणंही सासूच्या कानावर आलं नाही. तवा तिनं तिला चार दोन शिव्या भी हासडल्या. पण रखमाचं हूं नाही की चू नाय. ती अंधारी खोली रखमाच्या विरहानं मूकपणे अश्रू ढाळीत होती. सासून दिवा लावला व रखमाच्या अंगावरील वाकळ खसकन् ओढली तर वाकळ दूर गेली व पिवळं चुटूक पडलेलं रखमाचं पीरीत सासून बघितलं अन् हंबरडा फोडला…

        'मा‍झ्या रामूची आई गेली ओ ऽऽ, माझी रखमी लई गुणाची व्हती' रखमाचा नवरा बी आला. सारा गाव गोळा झाला. एक वर्षाचं रखमाचं पोर त्या गर्दीनं गांगारलं. टाहो फोडून ओरडू लागलं, ते जणू आपल्या आजीला, बाला, गावाला अन् नियतीला रडत इचारीत व्हतं, माझ्या आईचा बळी घेऊन तुम्हाला काय मिळालं?' इवल्याशा पोराचं ते रडणं ऐकून जमलेल्या समद्या माणसांच्या डोळ्याला पूर आला व्हता.

        तारळे गावच्या मसणवट्यात रखमाचं प्रेत आणलं गेलं. त्याच्या अगुदरच भावकीतल्या माणसांनी लाकडं फोडली होती. चिता रचली होती. त्या चितेवर प्रेत ठेवलं. राकेलचा एक डबा रखमाच्या चितेवर ओतला. बाज्यानं चिरगूट लावल्याला लाकडाच्या काठीचा बोळा पेटवला. तेवढ्यात तुफान वादळ आलं. त्या वादळाच्या झोतानं पेटत्या बोळ्याची ज्योत रचलेल्या चितेला बिलगली, चिता पेटली.. एक आगीचा मोठा लोळ आकाशाकडे झेपावला. चेहऱ्यावर उसणं दुःख आणून बाज्या रडत होता तर सासू ऊर बडवून आक्रोश करत होती. गावातल्या आया बाया डोळ्याला पदर लावून डोळ्याच्या धारा पुसत होत्या.

        रखमाच्या चितेतून एक तेजस्वी स्त्री नवऱ्याला, सासूला जाब इचारीत व्हती, ‘माझा रामू कुठाय?... माझ्यासारखं त्याचं हाल करू नगासा. मोठा झाल्यावर त्याला शिळं तुकडं वाढू नगासा. इटक कोरड्यास वाढू नगासा..’

        जमलेला सारा गाव आसवं ढाळीत व्हता. जमलेल्या आया-बाया लहानग्या रामूकडं बघून आसवं ढाळीत होत्या. नेहमी पुरानं दुथडी वाहणारी तारळी नदी रखमाचं अन् रामूचं दुःख बघून आज आटली होती. कारण रखमाच्या दुःखानं तिचा पाझर आटला व्हता… मग माणसं रडली म्हणून कुठं बिघडलं, अन् बाज्या लहानग्या रामूला मांडीवर घेऊन धाय मोकलून रडत होता, अन् मांडीवरल्या रामूला थोपटत होता.

        'आजपासनं तुझा बा दारू सोडणार…' रखमा मला क्षमा कर आपल्या रामूसाठी मी कायमची दारू सोडणार, तुझ्या शपथ !' मला माफ कर ! रखमा मला माफ कर...'

-प्रा. दिलीपकुमार मोहिते
मु.पो.वडगाव (उंब्रज) ता.कराड, जि.सातारा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या