Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

सागरी किनारा I क्रांती तानाजी पाटील

सागर किनारा, किनाऱ्यावरील आठवणी, निळा समुद्र, क्रांती पाटील

नजरेत भरणारी ती निळ्या, निळ्या रंगाची निळी, निळी निळाई. फिकट निळा, जांभुळका रंग लेवून निळसर विस्तारलेले त्या निळ्या नभाचे रुप, अगदी लक्षवेधक व मनमोहक मनाला आकर्षित करणारे वाटत होते. त्याच्या त्या निळाई जादुईत सागर किनार्‍यावरची ही माडाची झाडे त्याच्या प्रेमात पडली होती हे त्यांच्या सळसळत्या पानातूनच स्पष्ट जाणवत होते. त्याच्या भेटीसाठी आतुरलेले हे माड तनामनाने रोमांचित झालेले. किती अधीर मन झाले होते त्यांचे. त्यांचे ते हेलकावणेच सारं काही सांगून जात होते. अधीरलेले हे माड पाहताना चेहर्‍यावर नकळत हसू उमटले. त्याच क्षणी मनाला वाटून ही गेलं की केवढी प्रचंड ताकद असते बरं प्रेमात.

        लगतच पसरलेला तो सागर. त्याचं एक वेगळंच विशालपण आहे बरं का!. जिथे, जिथे नजर पोहचते तिथे, तिथे तो दूरवर पसरलेलाच असतो. मन ही एवढं मोठं असू शकते. हे त्याच्याकडे पाहून समजते. कधी शांत तर कधी अधूनमधून उसळणारा. सारं काही पोटात घेऊन. आपल्या वेगळ्याच धुंदीत नादमय गात राहणारा हा सागर खूप बोलका वाटतो. फेसाळणारे त्याचे रुप पाहताना असे वाटते की, मोठ्या मनाने साऱ्यांच्या चुका आपल्या पोटात घेणारा हा सागर. इतरांना समजून घेऊन उदार अंत:करणाने माफ करताना त्यालाही वेदना होत असाव्यात का? असंख्य विचारांची खलबते बहुतेक त्याच्या अंत:करणात चालू असावीत का? असे एक ना अनेक प्रश्न त्या सागराला न्याहाळताना मनात उमटत होते. कधी त्याच्या विचारांना भरती येत होती तर कधी ओहोटी. पण..एक मात्र, तो त्याच्या या वागण्याचा त्रास इतरांना देत नव्हता. उलट तो त्याच्या भावना इतक्या सफाईदारपणे व्यक्त करतो की, त्याचे दु:ख आतल्या आत गदगदत राहते. मात्र वरून तो एवढा मनमोहक दिसतो त्याक्षणी त्याच्या सौंदर्य पाहताना पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. म्हणूनच तर मी नेहमीच सागरी किनार्‍याच्या प्रेमात पडते. शांत करतो तो मनातील आवर्तनांना. तासन् तास गप्पा मारत राहते त्याच्याशी. त्या मऊ मऊ पसरलेल्या सोनेरी रेशमी वाळूत.

        ही सोनेरी रेशमी वाळू थोडीशी अंगाला चिकटणारी पण मुलायम स्पर्श देणारी. अंगातोंडावरून मायेचा हात फिरवणारी ही वाळू सारं दर्शन घडवत राहते. ह्याच वाळूत अनेक स्वप्नांचे मनोरे रचायला खूप गंमत येते. ते मनोरे रचून झाले की एक वेगळाच आनंद वाटतो. सारं स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद मनाला स्पर्शून जातो. त्या सुखात तल्लीन असताना अवचित सागराची लाट येते आणि नकळत त्याला स्पर्शून जाते. अगदी तनामनाला ही. मन ही भानावर येते तो पर्यंत ते मनोरे त्या लाटेसोबत विलीन होतात त्या सागरात. ते दृश्य पाहताना मनात एक विचारही चमकून गेला. खरंच इच्छा ही अशाच असाव्यात क्षणात विरघळून जाणाऱ्या, म्हणजे मनाला बोझ जाणवणार नाही. असा सुंदर विचारांना प्रेरणा देणारा हा सागरी किनारा. क्षितिजांच्या कडेपर्यंत नेहमीच पसरलेला असतो.

        दूरवर दिसणारे डोंगर किती स्थितप्रज्ञ असतात. या साऱ्या भावना कल्लोळांची साक्ष देत युगानुयुगे उभे राहतात. शब्दांपलिकडचा हा सागरी किनारा त्याचे विलोभनीय सौंदर्य नजरेत साठवताच येत नाही. वरती विस्तीर्ण पसरलेली निळाई. सभोवताली हिरवीगार हेलकावणारी ताडा, माडाची झाडे. दूरवर पसरलेली ही मऊ मुलायम सोनेरी वाळू, थोडेसे दूर उभे असणारे डोंगर व समोर पसरलेला हा सागर व सागरी किनारा विशाल असला तरी नजरेत सामावणारा, मनाला वेडावणारा ओल्या सुगंधी वाऱ्याने मला मिठीत सामावून घेणारा. नेहमीच मनाला भुलवितो… हा सागरी किनारा.
- सौ. क्रांती तानाजी पाटील, दुशेरे (कराड)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या