Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

सावट | मराठी कथा | क्रांती पाटील

सावट मराठी कथा, क्रांती पाटील दुशेरे, marathi katha

उकाडा दोन दिवसापासून जरा जास्तच वाढला होता. जीवाची नुसती लाहीलाही चालू होती. घामानं अंग झिरपत होते. अंगातील कपडा अंगालाच चिटकत होता. पाणी पिऊन पिऊनच पोट भरतं होतं. त्यामुळे रोज सकाळी असेल ती चटणी भाकरी पोटभर खाऊन तृप्ती मानणाऱ्या धन्याची आज भूकचं पळाली होती. कसंबसं दोन घोट पाण्याचे पिऊन ते उठले आणि लगबगीनेच काहीतरी विचारात गुंग होऊन मनाशीच काहीतरी निर्णय घेतला. मीही मा‍झ्या घरकामांची आवरा आवर करू लागले. सूर्य डोक्यावर तळपत होता आणि जीवाची घालमेल वाढतच होती. तो पर्यंत दुपार झाली म्हणून परत माझी पावलं धन्याकडे वळली. जेवायला या आता तरी.. येताय ना जेवायला. खूप वेळ झालाय. खाऊन घ्या अगोदर दोन घास पोटाला. तिकडून आवाज आला. तू जेव सोने मी नंतर खातो, अगं!!

        उकाडा खूप वाढलाय, आभाळ बी तसं नाही दिसतं. एवढं पण काय सांगावे या पावसाचा काही नेम नाही बघ. माणसांची जुळणी झालीये तो पर्यंत भात काढून घेतो आम्ही. सोन्यासारखं आलेले पीक कसं तरी घरी आणतो. बघता बघता वाऱ्याच्या वेगाने भाताचे विळे, खुरपी, तळवट, भात बडवायला लोखंडी कॉट, पाण्याची कळशी, पोती. रानाला आणि डोलणाऱ्या पि‍काला दही भाताचा नैवेद्य अशा अनेक गोष्टी एकत्र करून त्यांची पावले झपाझप रानाच्या दिशेकडे वळलीसुद्धा. पंधरावीस माणसांची जुळणी करून भात काढणीला बघता बघता सुरुवातही झाली. सपासप भात कापून झाल्यावर काहींनी पेंड्या आवळल्या तर काहींनी कोवळे उचलून नेऊन दिले. काहींनी मग तो भात कॉटवर भराभर बडवायला चालू केले. भाताची रासा पडू लागल्या पण एकाएकी काळ्याकुट्ट ढगांची दाटी आकाशात झाली. वारा, वि‍जा चमकू लागल्या तसं मात्र पाया खालची जमीन हळूहळू सरकू लागली. अंधारलेल्या ढगापेक्षाही डोळ्यासमोर अंधारून आले. भावनांचा एकच गोंधळ उडाला होता. अधूनमधून देवाला हात जोडायचे चालू होते. जाऊ दे बाबा डोक्यावर लोंबकळत असलेला हा ‍काळाकुट्ट ढग. वाऱ्याबरोबर हा ढग सरकला पुढे तर नाही पडायचा पाऊस. असा स्वत:ला समजावत तिप्पट वेगाने त्यांच्या कामाचा वेगही वाढत होता. कारण गुडघाभर चिखलात केलेली ती भात लागण, ते कष्ट, ती वेदना, आता आठवत होती. भात लागण करताना आलेल्या सलग जोरदार पावसामुळे नदीचं पाणी वाढलं होतं आणि गळ्याबरोबर आलेल्या पाण्यातून मोटरी बाहेर काढताना झालेला त्रास आजही नजरेसमोर होता. त्यानंतर भाताचं पीक जोमाला लागले.

        एखाद्या लहानग्या बाळाप्रमाणे. भाताचं पिकही तसंच मोठं झाले अगदी झटपट. धन्याच्या चेहर्‍यावर हसू उमटलं होतं. तो आनंद आजही आठवतोय. पिकाचे थोडे दिवस गेले जमिनीतल्या ओलाव्यावर आणि बरोबर पावसाने वढ दिली. रान सुकू लागलं. रोपांची बी तरतरी जरा कमीच झाली. तरीही, पाऊस आला नाही. दोन नक्षत्रं कोरडीच गेली. मग मात्र पुन्हा नदीवर मोटर जोडून पाणी पाजायला लागणार होतं पि‍काला. मोटर भिजल्यामुळे पुन्हा दोन पैशे खर्च करून मिस्त्रीला बोलवून मोटर जोडावीच लागणार होती. नाही तर आलेले पीक जळेल म्हणून पुन्हा खटाटोप करून मोटर जोडली आणि रात्रंदिन दारीधरुन भाताला पाणी पाजलं. अधूनमधून औषध फवारणीही करावी लागायची. औषधफवारणी केल्यानंतर अंगातील ठणक धन्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसायची. अंग धरणीवर आडवे करेपर्यंतच झोप लागायची. तरीपण उद्याची सकाळ त्याला नवीन ऊभारी द्यायची.

        उगवणाऱ्या कोवळ्या किरणांसोबत त्याची पिके आणि धनी न्हाऊन निघायचा. या आनंदी दिवसा बरोबरच त्याचे भाताचे पिकही जोमाने वाढत होते. हिरवाईची जागा आता गडद हिरवीगार रंगाने घेतली होती. हळूहळू भाताला पोटरा सुध्दा पडला. टच भरलेले ते पीक पाहून धनी मनोमन सुखावला. दरवर्षी पेक्षा यंदा पिक बी चांगलंच आलं होतं. पाचू, माणिकांनी भरलेल्या पि‍काकडे नजर टाकून तो मुला बाळांच्या गरजा पूर्ण करून दिवाळी पुरते तरी चांगले पैसे येतीलच ही स्वप्ने बघत होता. यंदा दिवाळीला घरच्या लक्ष्मीला व पोराबाळासनी चांगली कपडे घ्यायचीच हे ठरवले होते पक्केच. कारण पीक बी तसंच होतं भारात आणि जोमात. या सुखद स्वप्नांबरोबरच तो हुर्र, हुर्र, हुर्र…असा आवाज करत पाखरे राखीत असायचा. आनंदात दिवस चालले होते.

        एक दिवस पीक बघायला मलाबी रानात नेले होते. डौलदार आलेला खास भात बघण्यासाठी. गेल्या, गेल्या पिकावर नजर ठरतच नव्हती खरतरं. माझ्याकडे पाहून धनी नजरेनेच बोलला कसं पीक आलंय राणीसाहेब!! मी पण हसून म्हणाले अगदी पाचू सारखंच दिसतंय बघा सुंदर आणि हिरवंगार. त्या शब्दाने व गार वाऱ्याच्या झुळकीने तो सुखावला होता. त्याच्या सगळ्या वेदना व कष्ट तो क्षणभर विसरला होता. आता बघच तू यंदा दिवाळी कशी जोरात साजरी होईल ते…आणि हळूच गाल ओढत बोलला. तुला बी सजवतो पाचूवाणी हिरवीगार साडी घेऊन. धन्याचा हसरा चेहरा बघून मला पण जणू स्वर्गच भेटल्यासारखा वाटला. काही दिवसांनी या हिरव्या पाचूची जागा आता सोन्याने घेतली होती. सोनेरी, तांबूस रंग अंगावर लपेटून घेतलेलं भाताचं पीक काढणीला आलं होतं. ते सोनं घरी न्यायचं तो पर्यंतच पावसाने डाव साधला. आभाळ फाटलं होतं. सलग दोन दिवस अहोरात्र कोसळणार्‍या पावसात हाता तोंडाशी आलेलं पीक वाहत होतं. थोडी भरलेली पोती घरी आणली तरी घरात पसरायला पण जागा शिल्लक नव्हती. वरून घर गळत होतं, खाली जमीन ओली होती. फाटक्या संसाराला किती ठिगळं जोडली तरी ती पुन्हा उसवतच होती. रानात काढलेल्या भाताच्या पेंड्या चिखलात रूतल्या होत्या, जनावरांचा चारा वाया गेला होता. राहिलेले अर्धे पीक मुळ्या घट्ट पकडून मालकाला साथ द्येण्याचा प्रयत्न करीत होते. पण दिवसरात्र कोसळणार्‍या वादळी पावसापुढे तेही जमीन दोस्त झाले होते.

        धन्याच्या भावना गारठून गेल्या होत्या. डोळ्यातले पाणी पावसाबरोबर वाहून गेले होते. तो एकटक मातीमोल झालेल्या कष्टाकडे व मातीमोल झालेल्या स्वप्नांच्याकडे आवासून पाहत होता. गुडघे जमिनीवर टेकून, डोके बडवायलाही जमीन शिल्लक नव्हती. सभोवार पाणी साचले होते. गावातील काही शहाणी, शिकलेली मंडळी पिकाचा पंचनामा करून सरकारला मदत मागूया अशी चर्चा करत होते. पण मा‍झ्या धन्याला ते काही नको होते. जो जगाचा अन्नदाता आहे. गरीब, श्रीमंत, भिकारी, अडले, नडले साऱ्यांना शिवारातील माणिक, मोती पसापसा भरून मुक्त्त हस्ताने दान करणारा. त्याला दुसर्‍याच्या मदतीची भीक नको होती. त्याला त्याच्या हक्काची काळ्या आईची माया हवी होती. कारण फक्त तिच त्याला पोटभर दान देऊ शकते. किती साध्या, साध्या इच्छा होत्या त्याच्या बायका पोरांसाठी पण त्या नेहमीच अपूर्ण राहतात. जबाबदारी सांभाळताना त्याला तारेवरची कसरत करावी लागते. मुला बाळांच्या शिक्षणाचा खर्च, नंतर मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज, ते फिटते न फिटते तोच लेक बांळतपणासाठी आणायची असते. म्हातार्‍या आई बाबांचे आजारपण, औषध, गोळ्या या साऱ्या गोष्टी त्याला सांभाळायच्या असतातच.

        दिवसेंदिवस महागाई वाढतच असते फक्त वाढत नसतो तो या "शेतकर्‍याच्या मालाचा भाव". म्हणूनच त्याच्या जीवनाची नाव सतत पाण्याच्या लाटेवर हेलकावे खाताना दिसते. या बळीराजाचा बळी सारेच घेतात. आणि हा निसर्ग सुध्दा तोंडाजवळ आलेला घास पुन्हा नशीबाने हिसकावून नेला होता. जगाला जगवणारा पोशिंदा पण त्याच्या पोटाची खळगी मात्र भरतच नव्हती. पावसाने डाव साधला होता पण शेतकर्‍याच्या काळजावरचा घाव कुणालाच दिसत नव्हता. आतल्याआत भळभळणाऱ्या जखमेची वेदना फक्त त्यालाच जाणवत होती. शहाण्या पुढारी मंडळीनी फोटो काढले पि‍काचे व ती मंडळी निघून गेली. मात्र हा दिलदार राजा समजावत होता पुन्हा पुन्हा स्वत:ला की, निसर्गापुढे कोणाचेच काही चालत नाही. मलाच काय साऱ्या शेतकर्‍यांना हे भोग नशीबात आलेत. शून्यात असलेली त्याची नजर 'पुढे काय?' हे प्रश्नचिन्ह बघत होती. एक अवंढा गिळून अनेक प्रश्नांची उत्तरे तो समोर पसरलेल्या अंधारातच बहुधा शोधणार होता. सूर्यही हळूहळू अस्ताला गेला. अंधार पसरला होता आणि त्या अंधाराबरोबरच भावना आवर्तनांचाही वेग मंदावला होता. त्या पुसटश्या अंधारात धन्याची पाठमोरी आकृती दिसत होती. पुन्हा एकदा हे काळजीचे सावट त्याच्या पाठमोर्‍या आकृतीत स्पष्ट जाणवत होते !!

- सौ .क्रांती तानाजी पाटील
मु.पो. दुशेरे. ता.कराड. जि.सातारा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या