Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

वारी | कथा | जयश्री दाणी, नागपूर

वारी | जयश्री दाणी  | Vari | Jayshree Dani | Pandharpur | marathi Katha | मराठी कथा

वारी 

        जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठलचा अखंड नामघोष सुरू होता. ती झपझप पावले टाकत होती. झिमझीम पाऊस येत होता. तास, दोन तासात पाऊस चांगले उग्र रूप घेणार असल्याचे चिन्ह दिसत होते. आकाश मेघांच्या दाटीने काळेशार झाले होते. तरीही सावळ्याला भेटायची उर्मी वारकऱ्यांमध्ये तसूभरही कमी होत नव्हती.

        तिने आजूबाजू पाहिले. कपाळी केशरी टिळा, हातात टाळ-चिपळ्या किंवा भगव्या पताका, डोईवर मंजिरी-तुळस, डोळ्यात निरागस श्रद्धा घेऊन मोजताही न येईल इतके अगणित वारकरी तल्लीन होऊन चालत होते. जणू पांढऱ्या शुभ्र वस्त्रातील महासागरच. समुद्रात जशा लाटा उठाव्या अन् अवघ्या आसमंताला चैतन्य बहाल व्हावे तसे घाटाघाटातील अवर्णनीय देखावे सोहळ्या दरम्यान वाटत होते.

        छोट्या छोट्या परकरी मुलींसह वयस्कर बाया बापडेही लाजत मुरकत फुगडी खेळत होते. रामकृष्ण हरीच्या गजरावर टाळ्यांचा नाद उमटत होता. रिमझिम थेंबही ताल धरत होते. अश्वाचे रिंगण, त्या अश्वाला केलेला नमस्कार माऊलीला मिळतोच या अपार भावनेने अश्वाला पूजणारे गावोगावचे रहिवासी, भक्तिरसात फुललेली पालखी...सगळे कसे अनुपम आनंददायी दृश्य होते.

        फुलपाखरासारखे भिरभिरणारे तिचे चित्तही त्या सहजसुंदर अनुभूतीत रमून गेले. आपण वारीत विशिष्ट उद्देशाने आलोय, गेल्या पाच वर्षांपासून त्यासाठीच येतोय याचा तिला अबलख विसर पडून गेला. मोबाईलच्या रिंगने ती किंचित भानावर आली. पावसाने अंग बऱ्यापैकी ओले झाले होते. धर्मशाळा पाच मिनिटात येणारच होती. तिथे पोहचून फोन करावा असा विचार करत तिने फोन तसाच वाजू दिला.

        फोन आईचाच असणार याची तिला खात्री होती. दरवर्षी बरोबर दिवेघाट पार केला की तिचा फोन येतो. अगदी नेमाने. 'त्यांची' अन् आईची इथेच तर चुकामूक झाली होती ना? 'त्यांच्या' आठवणीने तिच्या छातीत धडधडले. अनंत विचारांच्या आवर्तनात मन गरगरू लागले. असे कसे विपरीत घडून गेले आपल्या हातून? काय करून बसलो आपण पौंगंडावस्थेत? देवतासमान पित्याला देशोधडीला लावले. भरल्या संसारातून खेचून दूर निघून जायला भाग पाडले. एवढे मोठे पाप कसे घडले आपल्याकडून?

        भिजलेले कपडे बदलताना जुन्या स्मृतींचा पट तिच्या डोळ्यासमोर झरझर नाचून गेला. त्या स्मृतिचित्रातील इतर सारी पात्रे तर आपापल्या लयीनुसार व्यवस्थित मंडल घेत होती. त्यांच्या शांत हालचालींना जबर दणका देणारा थयथयाट तिचाच सुरू होता. कशी विसरणार होती तीही तो दिवस नि तिच्या अबोध मनाने केलेली गंभीर आगळीक?

        तेरा वर्षांची होती ती जेव्हा आईचा पुनर्विवाह करण्याचे आजोबांनी योजले. आई राजीच नव्हती पण आईला हरेक प्रकारे समजावण्यात आले. आईसोबत तिनेही 'त्यांना' पाहिले. मिस्टर दीक्षित. आईपेक्षा पाचसात वर्षांनी मोठे, जरासे स्थूल, पुष्कळ हसरे. निर्मळ. भरभराटीला आलेला छोटासा व्यवसाय होता त्यांचा. सुखवस्तू होते. गावी भरपूर शेती, जमीनजुमला. लहान बहीण भावंडांचे करताना त्यांचे लग्नाचे वय उलटून गेले. आता त्यांनाही कुणीतरी आग्रह धरला नि ही सोयरीक जुळून आली.

        तिला नाही पसंत पडले ते. त्यांना भेटून भर पावसात घरी येतांना तिच्या डोळ्यांतले अश्रू इतरांना दिसले नाही, तरी आईला अचूक जाणवले होते. रिक्षात बसल्या बसल्या अनेकदा आई तिचे डोळे पुसत होती. कसे म्हणणार ती त्यांना बाबा? तिचा बाबा केव्हढा स्मार्ट, हँडसम होता. तिला कडे उचलायचा, पापी घ्यायचा. तिचे आवडते सिल्क चॉकलेट द्यायचा. आई बाबा सोबत कसे सुंदर सुंदर दिसायचे. देवाला मात्र हे सुख पाहवले नाही. क्षुल्लकशा आजाराचे निमित्त झाले अन् तिचा बाबा देवाघरी गेला. तेव्हापासून घरात ती आणि आई, दोघीच. तुफानी पावसात उडालेल्या छतानंतर राहिलेल्या ओलसर भिंतीसारख्या एकाकी. मुक्या.

        तिची भावना ओळखून आई गप्पच होती सगळ्यांच्या चर्चेत. समस्त कुटुंबियांसमोर आई किती अगतिक आहे हे तिला चांगल्यानेच कळत होते पण तरीही आईने ठामपणे नकार द्यावा हीच तिची एकमेव अपेक्षा होती. तसे झाले नाही. घरात वाजंत्री वाजली. तिची आई मनोरमा पांडेची मनोरमा वामन दीक्षित झाली. आपल्या फ्लॅटचे एक एक दार बंद करून मिस्टर दीक्षितांच्या घरात जातांना तिच्या मनाला अनंत इंगळ्या डसत होत्या. कसे घर होते त्यांचे विचित्र. मागून पुढून उघडे. इकडून कुणी शिरेल तर, तिकडून कुणी शिरेल तर? तिला भीती वाटायची.

        तिच्या बाबाने किती छान रंगवून दिली होती तिची रूम. मस्त बेबी पिंक कलर, त्यात छोटे छोटे पीओपीचे हार्ट, दारावर तिच्या लाडुल्या स्नो व्हाईटचे पोस्टर. आत बंक बेड. वर तिच्या बाहुल्या निजायच्या खाली ती. या लग्नाने अचानकच तिची ती उबदार जागा हिरावल्या गेली. तिचे मन खूप दुखले. इथल्या सपाट पांढऱ्या भिंतीच्या खोलीत तिचे मन रमेना. त्यात आई रात्री 'त्यांच्या' खोलीत शिरतांना दिसली की तिच्या अंगाचा तीळपापडच उडे. रात्र रात्र जागी राहून ती खिडकीतून दिसणाऱ्या चांदण्या पाहत राही.

        इथे काहीच आपलं वाटेना तिला. मग वरच्या काळ्या आकाशात विविध आकार शोधत राही. नभाच्या पुंजक्यात आपला बाबा दिसतो का म्हणून निक्षून पाही. कोऱ्या करकरीत काळोख्या अवकाशाशिवाय आसपास, वरखाली काहीच नसे. ती रडकुंडीला येई. हळूच 'त्यांच्या' खोलीला कान लावी. तिची अवस्था माहिती असल्यासारखे शंभर वेळा आई खोलीच्या बाहेर येई. काळजीने तिच्या पाठीवर हात फिरवी. तिला नको वाटे तो स्पर्श आताशा. आईच्या त्या स्पर्शाला मिस्टर दीक्षितांच्या शरीरासारखा वास येई.

        कपाळावर अष्टगंध लावलेल्या मिस्टर दीक्षितांच्या सदऱ्याच्या खिशात नेहमी कापराची एक छोटी वडी असे. ते जवळून गेले की नाकाजवळ तो वास हुळहुळे. त्यांची देवपूजा, आरती-स्तोत्र म्हणतानाचा स्निग्ध चेहरा नकोच वाटे तिला बघायला. ज्या बाप्पाने तिच्या बाबाला नेले त्या देवाचा तर ती काळासारखा राग राग करी. मिस्टर दीक्षितांनी तिच्या हातावर प्रसादाची खडीसाखर ठेवली तर लगेच ती फेकून देई.

        तिच्या रागावर, संतापावर ते काहीच बोलत नसे. खालमानेने निघून जात. एकदा तिरमिरीत तिने आईला सांगितलेच, मी नाही राहत या घाणेरड्या घरात, मी आपल्या फ्लॅटमध्ये चालली राहायला. चौदा वर्षाच्या तिच्या कोरड्या अविर्भावापुढे आई गारच पडली. बाबापुता करू लागली. तिला ठाऊक होते आई तिच्याशिवाय कदापिही राहणार नाही. ती हेकेखोरी करू लागली. निघून जायच्या धमक्या देऊ लागली. शेवटी आईने तिच्या पायावर लोटांगणच घातले तेव्हा मात्र तिचा जीव कळवळला.

        "का नाही सोडत तू त्या माणसाला?" जोरात खेकसून ती आत चालत गेली. आईने कितीही लपविले तरी तिची भयंकर नाराजी 'त्यांच्या' नजरेतून सुटली नव्हती. ते खूप प्रयत्न करायचे तिच्याशी नाते जुळवायचा, सामोपचाराचा. पण ती अतिशय कटूपणे पुढ्यातून उठून जायची. त्यांना एकही शब्द बोलू द्यायची नाही. संवादाचा हा पूल कसा सांधावा हेच त्यांना कळेना. त्यांची हतबलता बघून तिला समाधान वाटायचे. "माझ्या बाबाची जागा घेतो नाही का ? मग भोग शिक्षा " ती मनोमन पुटपुटायची.

        दीड दोन वर्ष असेच गेले. घरातले दिनमान खराब झाले. मोकळेचाकळे हसणे बोलणे हरवून गेले. सतत मळभ आल्यासारखे तिघेही कानकोंडले राहू लागले. जुलै महिन्यात जेव्हा पावसाच्या अखंड धारा कोसळू लागल्या नि ते वारीला जायला निघाले तेव्हा आपणही जाऊयात का वारीला असे आईने तिला विचारले. आईला आषाढवारीला जायची खूप इच्छा असते हे ती जाणत होती. कारण दरवर्षी जेव्हा आषाढीचे वेध लागत तेव्हा आई टीव्हीवर दाखवणाऱ्या वारकऱ्यांना, विठ्ठलाच्या मंदिराला आसुसून पहात असे. मनोभावे वारी करायचे आईच्या प्रचंड मनात होते. बाबा असताना आईचे हे सर्व मनसुबे तिला खूप आवडत. तिने आणि बाबाने ठरवलेही होते ती जरा मोठी झाली की वारीला जायचे. त्या गंधभारल्या कल्पनेने ती आषाढाच्या पावसात मनसोक्त थिरकायची. पण बाबा गेला सारी सारी स्वप्न मिटली. त्या तिघांनी पाहिलेली स्वप्न या या मिस्टर दीक्षितांसोबत पूर्ण करायची? छट, कोण हे आपले?

        "तू जा नं, मी राहीन आजीकडे" आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत थबकलेल्या आईला ती म्हणाली.

        "तूही चल, वेगळा सुंदर अनुभव मिळेल", आईने तिला आग्रह केला. आईला दुजोरा द्यायला म्हणून मिस्टर दीक्षितही आईमागे येऊन उभे राहिले. त्यांना पाहिल्यावर तिच्या मस्तकाची आगच झाली.

        "मी काय करू तुमच्या हनिमूनमध्ये येऊन?" ती उध्द्टपणे उद्गारली. आईने तर हातच उगारला तिच्यावर पण मिस्टर दीक्षितांच्याही चेहर्‍यावर अतीव वेदनेची ठळक रेषा चमकली.

        आई खूप दुखावल्या गेली तिच्या बोलण्याने. कधी नव्हे ते तिला आजीजवळ सोडून मिस्टर दीक्षितांसोबत वारीला चालली. तिला बरेच वाटले. त्या रात्री मिस्टर दीक्षितांच्या खोलीत जाऊन त्यांच्या सामानाची नासधूस करायचेच ठरवले तिने. त्यांची जपमाळ तर कधीचीच तोडायची होती तिला. त्या उद्देशाने गेलीही ती खोलीत पण आत दरवळत असणाऱ्या सौम्य कर्पूर गंधाने आपसूकच तिचे मन निवळायला लागले. पलंगावरची पांढरी शुभ्र चादर, फुलदाणीत खोचलेली काही फुले, भिंतीवरची विठ्ठल रुखमाईची तसबीर, त्यातून येणारा चंदनाचा सुवास तिला शांतवत गेला. चिरफाडलेल्या मनासह ती कितीतरी वेळ तिथे निमूट बसून राहिली.

        जाग आली तेव्हा तिच्या डोक्यावर मायेचा हळुवार हात फिरल्यासारखे वाटले. रोजच या हाताच्या मायाळू स्पर्शाचे तिला झोपेत प्रकट भास व्हायचे. आपला बाबा येऊन गेला असेल असे ती स्वतःची समजूत काढायची. ते आज चर्रकन तिला जाणवले की तो हात मिस्टर दीक्षितांचा असायचा. याचा अर्थ तिला गाढ झोप लागली की ते तिच्याजवळ येऊन बसत. तिला प्रेमळपणे थोपटत. कारण जागेपणी तर ती त्यांच्या वाऱ्यालाही उभी राहत नसे.

        ती जसजशी खोल्याखोल्यांतून फिरायला लागली तसतशी तिला त्या दोघांची खूप आठवण यायला लागली. खरं सांगायचे तर मिस्टर दीक्षितांचीच जास्त. आपण त्यांच्यासोबत, त्यांच्यामुळे आईसोबत किती वाईट वागलो ही भावना तिला कुरतडायला लागली. नाही म्हंटले तरी मिस्टर दीक्षित त्यांच्या साध्या सरळ वागणुकीने आपल्या मनाचा नव्हे निर्विवादपणे आपल्या आयुष्याचा भाग झालेय हे तिचे तिलाच उमजले. त्यांना त्रास द्यायचा नाही, त्यांच्यावरून आईला उलटेसुलटे बोलायचे नाही, त्यांचे नाते समजून घेऊन आपणही त्या उत्तम संबंधाचा एक बहरलेला भाग व्हायचे तिने निश्चित केले. ती नकळतपणे त्या दोघांची वाट बघू लागली.

        आषाढी एकादशीनंतर जेव्हा आजी म्हणाली, आज येईल गं ते, तेव्हा तिने त्यांची खोली स्वत: साफ केली. ते खोवत तसे फुलदाणीत फुले रचली. पलंगावरची चादर नीट लावली. दारात छानशी रांगोळी काढली. आजीसोबत दोघांच्या येण्याची आतुरतेने वाट बघत बसली.

        एखादे ताठ झाड धप्पकन कोसळावे व सारा पालापाचोळा आवतीभोवती पसरावा तशी आई एकदम घरात शिरताच ती घाबरूनच गेली. अस्ताव्यस्त पिंजारलेले केस, मळकट साडी अन् भान हरपलेला आईचा चेहरा पाहून आजूबाजूचे शेजारीही गोळा झाले. "काय झाले हो, काय झाले हो? यजमान कुठे आहेत?" जो तो विचारू लागला. काय माहिती काय माहिती या अर्थाचे आई नुसते हातवारे करत होती. तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता.

        "दिवेघाटात भाऊंची आणि वहिनीची चुकामूक झाली, खूप शोधले त्यांना. पोलीस, वारकरी, पंढरपुरातील रहिवासी, दुकानदार, पुजारी सगळ्यांना विचारले, मंदिराचा चप्पाचप्पा छानला पण दीक्षित भाऊ काही मिळाले नाही. चंद्रभागेत बुडालेल्यांचीही यादी पाहिली, घाटात जीव गेला ते देहही तपासले पण भाऊंचा कुठेच पत्ता लागला नाही. कुठे गडप झाले कुणास ठाऊक?" सोबतीचा वारकरी सांगत होता. तिच्या तर हृदयावर मोठा दगड पडल्यासारखेच झाले. आईच्या नजरेला नजरही देववेना. त्यांच्या परत न येण्याला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत का ही शंका तिला टोचू लागली. तीही त्या गर्दीत मुकाट होऊन बसली.

        "सत्पुरुष होता कुठे लुप्त झाला कोण जाणे?" आपापल्या घरी जाता जाता सारे हळहळले. बाबा गेल्यानंतर तिला हा दुसरा जोराचा मानसिक धक्का बसला.

        ती सकाळी उठली तेव्हा आई चहाचे आधण ठेवत होती. तिने थोडी चुळबुळ चुळबुळ केली पण आईचे तिच्याकडे लक्षच नव्हते. ती थोडी खाकरली. विचारावे तर लागेल ना कसे हरवले ते? इथेही पोलीस ठाण्यात कम्प्लेन्ट देऊन त्यांना शोधायला सांगावे लागेल.

        "आई.."

        "काय गं? उठलीस, कॉफी देऊ? बैस" तिच्याकडे न पाहताच आई म्हणाली. तिच्या काळजात खूप तटतटले. काही क्षण ती स्तब्ध उभी राहिली. पण तिला विचारल्याशिवाय रहावेना.

        "आई, कसे हरवलेत गं बाबा?" 

तिचा प्रश्नही पुरा झाला नव्हता तोच आई विजेसारखी कडाडली, "बाबा नाही मिस्टर दीक्षित".

        ती गर्भगळीतच झाली. मागे सरकली. त्वेषाने आई तिच्या अंगावर धावून आली, "असाच, असाच उल्लेख करायचीस ना त्यांचा, तो मिस्टर दीक्षित, तो मिस्टर दीक्षित, अरे कितीवेळा सांगितले ते ऐकतात बरं, त्यांना वाईट वाटेल पण ऐकायचे नाव नाही, शिंग फुटले होते ना वयाला. गेले ते सर्व कटकटींना कंटाळून निघून. नाही यायचेत परत. त्यांना वाटायचे त्यांच्यामुळे आपल्यात दुरावा निर्माण होतोय. मायलेकी एकमेकींपासून तुटत आहे. हळव्या हृदयाचा, माणुसकी, नातेसंबंध जपणारा पुरुष होता तो. चालले गेले आपल्यापासून दूर न सांगता." एका दमात आई बोलून गेली.

        त्यानंतर दोघीही अंतर्मुख झाल्यात. आईने पुन्हा कधी तुझ्यामुळे ते निघून गेलेत असा चुकूनही आरोप केला नाही. त्यांच्या नातलगांनी, आईच्या लोकांनी खूप शोध घेतला त्यांचा. वारंवार पंढरीला जाऊन पाहिले पण प्रत्येकवेळी हाती शून्यच आले. जेव्हा त्यांच्या सर्व इस्टेटीचे तिच्या नि आईच्या नावे असलेले कागदपत्र त्यांच्या हाती पडले तेव्हा ते मनाशी पक्के ठरवूनच घरापासून दूर झाल्याचे दोघींच्या लक्षात आले.

        ओळखीची मंडळी विचारपूस करायला यायची. संसारी माणसाला आईवडील अथवा पत्नीची परवानगी न घेता असा गृहस्थाश्रम त्यागता येत नाही म्हणायची, कारणमीमांसा करायची किंवा एखादा अकस्मातच ते पंढरपुरात दिसल्याचे सांगायचा तेव्हा त्यांच्या आशा पल्लवित व्हायच्या. नव्या जोमाने ते धुंडाळायला जायचे पण पदरी निराशाच पडायची. तरी प्रत्येक वारी दरम्यान ते गर्दीत दिसले, विठ्ठल मंदिरात दिसले, महाप्रसादात दिसले, नामदेव पायरीजवळ झळकले, चंद्रभागेकाठी उभे होते अशी काही ना काही वार्ता यायची आणि अवकाळी पाऊस यावा तसे आईचे डोळे झरायचे. तिने मात्र अपराध्यापोटी मनातला दुःखभार कधीच डोळ्यांतून धो धो वाहू दिला नाही.

        दिवस वाऱ्याच्या वेगाने पळत होते. पाहता, पाहता ती इंजिनिअर झाली. बंगलोरच्या नामांकित कंपनीत नोकरीला लागली. चांगला घसघशीत पाच आकडी पगार मिळू लागला. यथावकाश लग्न झाले. नवराही बड्या पोस्टवर. मूल झाले, पाच वर्ष उलटले. जीवनात ती बरीच स्थिर झाली. पण आतल्या आत तिचे मन तिला सदैव खात रहायचे. 'त्यांच्या' संसारातून निघून जाण्याला ती स्वतःला कारणीभूत ठरवायची. एक दिवस तिने या साऱ्या गोष्टी जोडीदाराला सांगितल्या. तोही खूप हेलावला.

        "मी दरवर्षी वारीला जात जाईल तुषार, त्यांचा कसून शोध घेईल, मला त्यांना परत आणायचेच आहे", तिने आपला निश्चय जाहीर केला. नवऱ्यानेही पाठिंबा दिला. तेव्हापासून ती दरवर्षी न चुकता वारी करते. रात्रंदिवस डोळे उघडे ठेवून त्यांना शोधते.

        तसा आईचा फोन सतत येतच असतो तिला पण वारीत विशेष आशेने येतो. ज्या घाटात ते आईचा डोळा चुकवून गायब झालेत तिथे ती पोहोचली की चारचारदा येतो. त्यावेळी आई खूप अवांतर बोलत राहते. शब्दानेही विचारत नाही ते दिसले का? त्यांच्याबद्दल काही कळले का? तिला माहिती असतं आईला निदान त्यांची खुशाली तरी कळावी एवढीच माफक इच्छा आहे. पण ते दिसतच नसल्याने ती तरी काय सांगणार आईला त्यांच्याबद्दल?

        आताही आईशी जुजबी बोलून तिने फोन ठेवला. दुःखातिरेकाने तिचे मन भरून आले होते. विखरू पाहणाऱ्या आशा जमा करत ती पुन्हा वारीत चालू लागली. ऊन वारा पाऊस सोसत भोळ्या वारकऱ्यांची दिंडी पंढरपुरात येऊन धडकली. दुरूनच कळस दिसताच तिचाही पूर्ण शिणवटा गेला. पंढरीराया, सावळ्या देवा या खेपेला तरी त्यांची भेट घडू दे रे. मला त्या भल्या माणसाच्या पाया पडून मनापासून माफी मागायची आहे. त्यांना बाबा म्हणून हाक मारायची आहे. आईसाठी घरी चलायचा आग्रह करायचा आहे. असंख्य विचार तिच्या डोक्यात येत होते जात होते. पायरीशी तळ ठोकून ती वेड्यासारखे प्रत्येक भाविकाला आपादमस्तक निरखत होती. सालस भाबडा चेहरा दिसला की मिस्टर दीक्षित म्हणत उचंबळून उठत होती. विठ्ठलाचेही दर्शन घेताना तिचे डोळे त्यांचाच शोध घेत होते. कुठे लपवले रे त्यांना ती चिडून विठ्ठलाला विचारी.

        यावेळीही दर्शन, मुखदर्शन, महाप्रसादाची बारी, दिंडी-पालख्या, परिसरातील रंगीत दुकाने, आसपासच्या सर्व धर्मशाळा, पोलिसचौकी, घरं असे सगळीकडे शोधले तिने त्यांना. पण व्यर्थ. त्यांच्याबद्दल कुठेच काहीच कळले नाही. शेवटी मलूलपणे रेती तुडवत ती चंद्रभागेजवळ आली. तू तरी सांग त्यांचा पत्ता तिच्या मनाने आर्जव केले.

        निळ्या जांभळ्या गर्द घनदाट ढगांखाली झडीचा पाऊस झेलत चंद्रभागा मात्र कसलीही खळखळ न करता निमूट वहात होती...

- जयश्री दाणी, नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या