Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

बंडखोर बंड्या | मराठी ग्रामीण कथा | कथाकार प्रा.दिलीपकुमार मोहिते

Bandkhor Bandya, Marathi Gramin Katha, मराठी कथा

    चक्रीवादळ जसं आकस्मित येते आणि हा हा म्हणता गावाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत रोरावत जात आणि काही काळ प्रत्येकाच्या तोंडी जसा तोच विषय असतो. त्याचप्रमाणे काही माणसं अशी असतात की, ज्यांच्याशी आपला काडीमात्र संबंध नसतानाही ती इतकी नावारूपाला आलेली असतात की, त्यांच्या कृतीची ग्वाही कर्णोपकर्णी आपल्यापर्यंत येऊन धडकते. चक्री वादळासारखी ही माणसं आपल्याला त्यांच्या कृतीने चक्रावूनच टाकतात. अशा माणसांपैकी आमच्या गावचा 'बंड्या' हा एक होता.

    बंड्याचा नि आमचा तसा प्रत्यक्ष संबंध येतच नसे. बंड्या नावाप्रमाणेच बंडखोर असल्याने त्याच्या बंडखोरीच्या वार्ता मात्र आम्हाला आमच्या मित्रांकडून समजत असे, कारण बंड्या हा दारूसारख्या चक्रीवादळात सापडलेला त्यामुळे चक्रावून टाकणार्‍या विक्रमी गोष्टी करणे हा बंड्याचा स्वभावधर्मच बनला होता. तसा बंड्या मामलेदाराच्या ऑफिसात पट्टेवाल्याची नोकरी करीत होता. पण गावात मिरवायचा मात्र मामलेदाराच्या ऐटीत. बारक्या पोरांस्नी तर वाटायचं बंड्या मामलेदारच हाय त्यामुळे आम्ही सर्वजण त्याला बंड्या मामलेदार म्हणायचो. मग बंड्या फुगायचा इतका की, त्याच्या अंगात घातलेला शर्ट तटाटू लागायचा. भट्टीचा पांढरा शर्ट, विजार आणि पांढरी टोपी हा बंड्याचा ड्रेस. पण टोपी असली की शर्ट नसायचा, शर्ट असला की विजार नसायची असा बंड्याच्या वेषात बदल व्हायचा. टोपीच्या जागी टक्कल पडलेलं डोकं दिसायचं. जरा खाली बघितलं की बनियन दिसायचं. बनियनबरोबर उडप्याप्रमाणे दुमडलेली लुंगी नाहीतर अर्धीच चड्डी असायची. पायात असलेल्या चपलेचा अंगठा असेल तेव्हा पना नसायचा आणि पना असला की हमखास अंगठा नसायचा. अशा वेषातला बंड्या गावात मिरवायचा मात्र मामलेदारासारखा. ह्या बंड्याला सुरुवातीला पानाचं व्यसन होतं, पानाची जागा तंबाखूनं घेतली आणि तंबाखूच्या घरात आपोआप दारू विसावली. बंड्याला दारूचं कधी आणि कसं व्यसन लागलं याचा कुणालाच पत्ता नव्हता. पण सुरुवातीला सुखासुखी घरी येणारा बंड्या नको त्या स्थितीत घरी येऊ लागला. तेव्हा बिचारी बायकू ‘भिकी’ फार हबकून गेली.

    बंड्याला भाऊ नव्हता, बहीणही नव्हती. वंशाचा दिवा उजवायला आलेला एकुलता एक बंड्या हा आईचं ‘लाडकं लेकरू’ होतं! बंड्याच्या बालपणीच बंड्याचा बाप गचकला होता. त्योही दारूपाईच. आपलं लेकरू दारू घेत नाही याचा केवढा तरी अभिमान त्या बिचारीला होता. पण कुठून त्याला अवदसा भेटली कोण जाणे! पण भेटली खरी अन्‌ आईने हाय खाल्ली. बिचारीने अंथरुण धरलं ते धरतीला कवटाळण्यासाठी. ती पुन्हा उठलीच नाही. झाले. बंड्याने धडा घेतला दारू सोडली. आईच्या दु:खात बंड्या विरघळला. त्यानं प्रतिज्ञा केली दारू सोडणार. बायकोला दिलासा वाटला पण दारुड्याचं जीवन आणि दारुड्यांच्या प्रतिज्ञा ह्या आळवाच्या पानावरील थेंबासारख्या असतात. कारण पावसाचे थेंब आळवाच्या पानावर पडले की जसे आपोआप जमिनीवर घरंगळतात तसेच दारुड्याचे जीवन असते. ते एकदा घसरले की आपोआप त्याची जीवनवाट घरंगळू लागते न थांबण्यासाठी. चाललेली ती जणू घसरणच असते. तशीच दारुड्याची प्रतिज्ञाही असते. कोणत्यातरी संकटाने त्याच्या प्रतिज्ञेला फुंकर बसते अन्‌ तो पुन्हा दारूच्या बाटलीस कवटाळतो ते न सोडण्यासाठीच. जणू स्वत:हून एखाद्या दरीत घसरत जातो. न उठण्यासाठीच आणि मग त्याची जी फटफजिती होते ती न लिहिण्यासारखीच.

    बंड्यानं दारू पिऊन स्वत:भोवती पाचपंचवीस माणसं जमवण्याची बंडखोर क्रांती गावात कोणत्या घटनेपासून केली त्याचा आम्हाला काही पत्ता नाही. परंतु आता कधीही बंड्या वडगावात असला की बंड्याचा फुकटातला सिनिमा बघायला गावातली मोकाट पोरं सुसाट वाऱ्याच्या वेगानं धावत्यात आणि हां हां म्हणता बंड्याभोवती कुडबुड्या जादूगाराभोवती जसा फेर धरावा तशी उभी राहत्यात आणि बंड्याच्या आख्यानाला सुरूवात होते. जोर येतो बंड्याच्या आख्यानाला कोणताही विषय चालतो.

    आमच्या गावचे सेंटर म्हणजे भला मोठा मोहित्यांचा जुना वाडा आहे. त्याच्यापुढं थोडंसं पटांगण आहे. गावचं ४-५ मुख्य रस्ते या ठिकाणी मिळालेले आहेत. पण खऱ्या अर्थानं आमच्या गावचं सेंटर मारुतीच देवालयच आहे. देवळाशेजारीच भलं मोठं पटांगण आहे. मधोमध एक लिबाचं झाड आहे. त्याला वळसा मारून गावची एस.टी. अगदी देवळाशेजारी उभी राहते. देवळाला चिकटून गावकऱ्यांनी एक स्टेज बांधले आहे. स्टेजला लागूनच एक तुळशीचा ओटा आहे. देवळाच्या पायऱ्या तीनच पण देवळाच्या लांबीइतक्या ३०-४० फूट आहेत. या ठिकाणी फावल्या वेळात काम नसलं की गावचे नागरिक बसलेले असतात. ग्रामपंचायतीचं ऑफिसही देवळाला लागून आहे तर देवळाच्या पलीकडे दूध डेअरी व सोसायटीची इमारत आहे. पोरंही आट्यापाट्याचा डाव मांडून खेळत असतात. शेजारीच एक सार्वजनिक आड आहे. त्यामुळे तेथील भागात तुम्ही केव्हाही गेलात तरी पाचपंचवीस माणसं तरी तुम्हाला दिसतीलच.

    या देवळाच्या पूर्वेच्या कोपर्‍यापासून शे-दीडशे फुटाच्या अंतरावर आमच्या बंड्याची दादागिरी राजरोसपणे चालत असते. बंड्या तसा मागासलेल्या जमातीतील. दिवसभर कष्ट करून दमलेल्या भागलेल्या त्याच्या बांधवांना फुकटच्या शिव्या घालणारा. बंड्या म्हणजे दारूच्या प्रेरणेने शांततेविरूध्द बंडखोर क्रांती करणारा, बंड्या म्हणजे त्या राकट मदिरेचा पुत्र शोभायचा ! मारूतीच्या देवळाच्या गावाकडील भागात मात्र बंड्याची धडगत नसायची. कारण गाववाल्यांचा चोप मार खावा लागेल याची कल्पना बंड्याला आली होती. पण असा मार खाऊन शांत राहिला अगर मारापुढं नतमस्तक होऊन जीवन सुधारेल तो बंड्या कसला ? त्याच्या रक्तात ते नव्हते आणि असली दारूच्या आहारी गेलेली प्रत्येक व्यक्ती ही एक बंड्याप्रमाणेच बंडखोर असते. त्यांना समाजापुढे बंडखोरी करण्याची फार मोठी ईर्षा येते ती ही दारू पिऊनच. मग बंड्याची ही बंडखोर दादागिरी हळूहळू गावातही घुसू लागली तर नवल काय !

    एकदा बंड्या असाच गावात सुसाट सुटला त्याचं मोकाट तोंड चालूच होतं. अचकटबिचकट शिव्यांची गाणी म्हणत तो अंद्याच्या आळीत घुसला. अंद्याच्या आळीतून तो देवळापुढे आपले शिव्या स्तोत्र गात होता. अंद्या आमच्या गावचा पैलवान होता. अंद्याला कुठनंतरी बातमी समजली की बंड्या आपल्या आळीतून गेला. दोघाचं कधीही पटत नव्हतं. ते काते बंड्यालाच ठाव. अद्या बंड्याच्या रोखानं चालू लागला. आपल्याच मैफलीत रंगलेला बंड्या आज धुंद होता. बंड्याचा एक गुण घेण्यासारखा होता. दारू न पिलेला असला की तो प्रत्येकाशी एखाद्या सद्गृहस्थासारखा बोलत असे. इतका सद्गृहस्थ की त्याची उपमा बंड्यालाच! ती कुणालाही देता येणार नाही, पण आज बंड्या कामातनं गेला होता अन अद्या त्याच्या मागावर आला. मोठी जुपणार असं दिसू लागलं.

    अंद्यानं चित्त्याच्या चपळाईने बंड्याचं गचूर धरलं आणि इचारलं, ‘पोळा, आमच्या आळीत का उधळलास?’ बंड्यानंही डरकाळी फोडली. ‘अद्या गचूरं सोड!’ ‘मामलेदाराची पॉवर लई वाईट असती. जन्मभर गेटात बसवीन.’ ‘कोणासमोर बोलतोयस!’ अंद्या भडकला ‘तुझ्या बा समोर’, ‘माझा बा पडलाय स्वर्गात, त्याच्यासमोर जाऊन डिरक्या फोड आंडील खोंडागत’. झालं. अद्याचा पारा चढला. त्याचा पैलवानी ठोसा बंड्याच्या बत्तीशीवर आदळला आणि मग कणीक तिंबाबी तसं त्यानं बंड्याला तिंबला. बंड्यानं आठ दिवस अंथरूण धरलं. पण नऊ दिवसानं डिवचलेल्या नागागत बड्यानं पुरती ढोसली आणि मांग वाड्याच्या बाँड्रीवर अंद्याच्या नावाचा जल्लोष केला. घुंगराच्या काठीला खंडोबाचा भंडारा लावून 'जयमल्लार' चा जयजयकार करून गावाच्या व मांगवाड्याच्या बाँड्रीवर काठी आपटण्याचा ठेका धरला.

    'जय मल्हार, आला, अंद्या, तर कर रेंदा' लाव भंडार. कर हल्ला. पण बाऊंड्रीच्या पुढं बंड्याचा पाय सरकत नव्हता. अंद्याची समजूत गावकऱ्यांनी घातली. पिऊन येडं झालंय ते तुझ्यासारखा पैलवान गड्याने कशाला लक्ष द्याचं. आंदा बघ रागाच्या झीटत मारलंस अन्‌ मेलं बिलं तर फुकट बिलामत नग. अद्या गप्प बसला. पण त्यानं युक्ती केली. गावातली पाच-दहा पोरं बंड्याकडं पळत पाठवली ती नुसती तोंडानं म्हणत होती. ‘आरं बंड्या पळ अंद्या आला' अद्या आला म्हणताच बंड्या पळाला. त्याला बत्तीशीची हालत आठवली. अन्‌ म्हणाला, 
    'पळ बंडा, आला अंदा
    नाहीतर यंदा, चुकत नाही रेंदा
    जयमल्हार, येईल रे अदा
    बंड्याचा रेंदा, पडल यंदा
    पळ रे बंडा, चल रे बंडा'

    बंड्यान गाणं म्हणत घर गाठलं. पुन्हा अंदाकडं तो फिरकला नाही. अंदा दिसला तर आता तो भितो. त्याच्याशी गोड गोड बोलतो. सलाम करतो. एकप्रकारे बंडा अंदाला शरण आला. दोघांचं युध्द संपलं व तह झाला. तहाच्या अटी काय कोण जाणे! पण आजपर्यंत बंड्यानं तह पाळलाय खरा. अंदागत दहा-पंधरा जणांबरोबर तरी बंड्याचे युध्द झालंय. आणि बंडा त्यांनाही शरण येवून तह पाळत आलाय (तहाची अट बहुतेक त्यांनाही फुकटात दारू देणं ही असावी) पण या बाबतीत ही बंडखोर बडा गप्प बसणार नाही असं मात्र वाटतंय.

    सगळ्या मांगवाड्याला सतावणाऱ्या बंड्याच्या घरी व त्याचा शेजारचा मित्र रंगराव पण त्याला सर्वजण रंग्याच म्हणत. कारण रंग्या बंडाजी ऊर्फ बंडखोर बंड्याचा जानीदोस्त होता. तर या दोघा दोस्तांच्या पत्र्याच्या घरावर दोघांना सतावणाऱ्या त्यांच्या वाड्यातल्या लहान पोरांनी रात्रीचा दगडांचा भडीमार केला. झालं. दोघांचीही टाळकी फिरली. आधीच त्यात घेतलेली. त्यामुळे आपोआप ठिणगी पडली. दोघांनी बचकच एवढं दगाड घेतलं आणि दगाड पडत हुत त्याच्याबरोबर विरूद्ध बाजूला. दोघं पळत सुटली. रात्रीचा दहाचा सुमार, स्टेजवर बरीच माणसं झोपावयास होती. तिथं दोघ आले आणि कुणी दगाड मारलं म्हणून विचारू लागली. स्टेजवरनंच दगड पडत होतं असं रंग्या बरळला आणि नुक्त्याच आलेल्या अंद्यानं रंग्याला बकूटीला धरलं अन्‌ माजलास काय म्हणून ठोसा मारला. चला, याचं ब्लड जास्त झालंय ते दवाखान्यात काढून घेऊ या म्हणाला व त्याला ओढत चांगला फर्लांगभर नेला. तेव्हा बड्यानं आपला पवित्रा आपोआपच बदला. हातातलं दगड हळूच भिरकावून दिलं आणि म्हणाला, तरी म्या म्हणतोया खालनं दगाड येत्याती पण रंग्याला ब्लडच जास्त झालंय. झालं, रंग्या विरूद्ध त्यानं पवित्रा घेतला व त्यावेळच्या बचावाच्या पावित्र्याने त्याचा मार वाचविला. एकदा या दोन मित्रांनी चांगल्या चार बाटल्या मारल्या अन्‌ आळीतल्या पटांगणात मोठ्यानं जाहीर केलं की थोड्याच वेळात आपल्या येथे बंड्या मामलेदार आणि रंगा होसे यांचा टक्कर घेण्याचा भव्य सामना भरणार आहे. छदीष्ट प्रेक्षकांनी या संधीचा फायदा घ्यावा. तिकीट दर नेहमीप्रमाणे कंसात (फुकटात) अशी आरोळी दोघांनी मारली. झालं. तासाभरात शे-दीडशे बारीक मोठे प्रेक्षक जमलं आणि गावातील क्रांतीकारक असा हा 'दारुडे टक्कर' कार्यक्रम बंड्याच्या वाड्यात सुरू झाला.

    रंगा इकडून बंडा तिकडून एकमेकांच्या डोक्यावर डोकी आपटू लागली. रंगानं मध्येच एक डाव केला. बंड्याला आणखी एक पदरची बाटली फुकट दिली व स्वत: मात्र कांदा कोरडाच मैदानात खाल्लेला. पुन्हा टक्करेला सुरूवात झाली. एक-दोन-तीन टक्करांवर टकरा बसू लागल्या. रंगाच्या टकरेत जोर नव्हता. त्यानं ओळखलं आपणाला हार खावी लागणार या भीमप्राय बंड्यापुढे आपली धडगत नाही. लगेच त्याला शिवाजीराजांच्या गनिमी काव्याची आठवण झाली. (युक्तीचीही) अफजलही असाच नव्हता का? बंड्या विरूद्ध बाजून ओरडत आला. रंग्यानंही पवित्रा घेतला टक्करेचा आणि पळत आलेल्या बंड्याला टक्कर देण्यासाठी डोकं पुढं नेलं बंड्याला हेच हवं होतं. पण बंड्याने मुसंडी मारण्यास आणि रंग्यानं डोकं बाजूला काढण्यास एकच वेळ आली. रग्याची युक्ती यशस्वी झाली होती. बंड्याची टक्कर समोरच्या भिंतीवर बसली होती आणि त्याच्या चेहऱ्याची ठेवणंही बदलली, चेहऱ्यावर लाल पाणी वाहू लागलं आणि रंग्यानं टक्कर कार्यक्रम समाप्त झाल्याचं जाहीर करून बंड्यापुढं धडगत नाही हे ओळखून रंग्यातर्फे बंड्याला कोंबडा बक्षीस देण्यात येईल व बंडा आणि रंगा मिळून माळावर फीस्ट करून खातील. तरी प्रेक्षकांनी घरी जावे. झालं, कोंबडा मिळणार म्हणून बंड्या खूश, तर रंग्या पण खूश होता. ते फुकटचा कोंबडा मिळणार म्हणून तसेच रंगा खुश होता. कारण टक्कर घेताना त्याने हळूच बंड्याच्या शर्टाच्या बंडीच्या खिशातली ५००/-रु.ची नोट काढून घेतली होती व आता तो बंड्याला कोंबडा देणार होता.

    पाटण तालुक्यातील कुठल्याशा गावात बंड्याच्या मुलीचं लग्न होतं ते ठिकाण रग्याच्या सासरवाडीचे असल्याने त्याने अगोदरच दोन दिवस त्या गावात बायका पोरांसह तळ दिला होता. वर्‍हाड घेऊन बंड्याही त्याच्या भेटीला गेला. लग्नाचा दिवस उजाडला. बंड्या व रंग्या यांचा दारूच्या दुकानापुढं नंबर लागला. बंड्या पिऊन आला व पुन्हा मागच्या लाईनमध्ये नंबर लावण्यास गेला. अशा चार-दोन फेऱ्या तरी झाल्या. पाचव्या फेरीला बंड्याचा धक्का तेथील एका रांगेतील मुसलमानाच्या मुलास लागला. दोघंही तंद्रीत होती. त्या पोरानं बंड्याला या गोष्टीचा जाब विचारला. आधीच कलागतीचे कारण शोधणाऱ्या बंड्याला गिर्‍हाईक सापडलं आणि बंड्याचा हात वर गेला व याचवेळी रंग्याही बंड्याच्या मदतीला धावला आणि त्या दोघांनी मुस्लिम पावण्याला यथेच्छ मार दिला आणि त्या दोघांना मारल्याची बातमी जेव्हा मुस्लिम वाड्यात गेली. तेव्हा पाच पन्नास मुसलमान टाळकी हातात काठ्या घेऊन दुकानाच्या दिशेने गरजतच धावली. बंड्या व रंग्या विजयाच्या पावित्र्यात उभे होते. पण त्यांचा विजय क्षणभंगुर ठरला. पाच पन्नास पोरांच्या काठ्या दिसताच दोघंही सैरावैरा धावू लागले. पण टाच पोरांनी पाठलाग करून बंड्या रंग्याला पकडून चितपट करण्यात यश मिळवलं. बंड्याच्या पोरीच्या बरातीसाठी सजवलेली गाडी ऐनवेळी बड्या, रंग्याला दवाखान्यात नेण्यास उपयोगी पडली.

    मारातून बरा झालेला बंड्या नोकरीवर जाण्यासाठी महिनाभरात तयार झाला. आणि बंड्या पुन्हा नोकरीवर जाणार ही बातमी हां हां म्हणता गावात पसरली. मांग वाड्यानं सुटकेचा निश्वास सोडला. अन्‌ फुकटात बड्याचा सिनेमा बघणारी मोकाट पोरं नाराज झाली. एकदाची पिडा टळली या भावनेनं सगळी वडगाव नगरी बंड्याला निरोप देण्यासाठी तारळी नदीच्या काठी जमा झाली. तो सोहळा मात्र अजब वाटत होता. तारळी नदीच्या वाळवंटातून बंड्याचे पाय उचलत नव्हते. तो फिरून फिरून मागे पहात होता. एवढ्यात त्याची नजर अद्यावर खिळली. अद्या माणसात पवित्रात उभा होता हे पाहून बंड्यानं मागं पहायचं सोडून दिलं. महिन्याभरात गावात हूल उठली की, बंड्या तारळी नदीच्या पलीकडच्या तरटीच्या माळावरून दररोज रात्री काशीळ व शिरगावावरून येतो व सकाळी जातो. पण गावची कटकट टळली होती.

    एक दिवस आम्ही असंच स्टेजवर गप्पा मारीत बसलो होतो. गप्पा रंगात आल्या होत्या. एवढ्यात तारळीच्या पाण्यानं भिजलेला व गाळानं भरलेला दुहेरी रंगाचा बंड्या गरजतच गावात आला. 'भिके मी आलोय, साहेबाला खिशात घालून तो ही कायमचा न जाण्यासाठी राजीनामा देऊन' झालं. पुन्हा बंड्याच्या ग्रहणानं गावाला ग्रासलं.

    एका रात्री बंड्या लहान, लहान पुड्या घेऊन देवळाच्या दिशेनं धावत सुटला त्याच्या मागं त्याची बायको भिकी व सगळा मांगवाडा लागला होता. लहान पोरं रडत व्हती. बायको ओरडत होती. माणसं ‘धरा’,‘धरा’ म्हणत होती. आम्हाला वाटलं त्यानं एखाद्याचा बळी घेतला की काय? परंतु बंड्याच्या वक्तव्यावरून तो स्वत:चाच बळी द्यावयाला निघाला हे स्पष्ट झाले. तो म्हणे की ढेकूण आणि उंदीर यांना मारण्याच्या औषधाच्या पुड्या मा‍झ्या हातात आहेत. मला आता कोणी रोखू शकत नाही. मी कायमचा आज वडगावचाच काय पण जगाचा निरोप घेऊन जाणार आहे. सर्वांना माझा शेवटचा सलाम' असे म्हणत तो सुसाट पळत सुटला. आमच्यासकट स्टेजवरील पंचवीस तीस माणसं त्याला काळाच्या जबड्यातून वाचवण्यासाठी त्याच्या पाठीमागे धावू लागली. अंद्या व रंग्या पळणाऱ्यात सर्वात आघाडीवर होते. रंग्या बंड्याचे प्राण वाचवण्यास धावत होता तर अद्या नेमका विरूद्ध विचाराने धावत हुता. त्याला बरेच दिवस कुणाला खरपूस मार देता आला नव्हता म्हणून. तो नामी संधी सोडणार नव्हता. दोघांच्या विचारात जमीन अस्मानाचा फरक होता. आणि एकदाचा अंद्याला बंड्या सापडला व आंद्या चित्कारला. ‘तू आज वाचत नाहीस’ पण बंड्यानं रंग्याला पाहताच व अंद्याही जोडगोळीला पाहताच नरमाईचे धोरण स्वीकारले. तोपर्यंत सगळा गाव त्यांना भिडला. आणि बंड्यानं गर्जना केली. औषधाच्या पुड्या घ्यायला अला काय? बुध्दू समजलात. गाववाल्यांनो, तुम्ही ज्याला औषधाच्या पुड्या समजत आहात आणि माझ्यावरील अगाध प्रेमानं आपण मला वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न करू नका. कारण तुम्ही ज्याला विषाच्या पुड्या समजता त्या तर निळीच्या आहेत आणि त्यानं हातातल्या ३-४ पुड्या गाववाल्यापुढं भिरकावल्या. गाववाल्यांनी पाहिल्या तर त्या खरोखरच निळीच्या होत्या.'

    त्या दिवसापासून बंड्याचा गावानं व मांगवाड्यानं नाद सोडला. ती वेळ ऐन दुपारची होती. दिवस सुगीचे असल्याने गावातली कर्ती धर्ती माणसं रानात गेली होती. गावात कुठंतरी एक कुत्र रडत व्हुत. मध्येच टिटवीचा कर्कश आवाज नदीच्या काठावरून स्टेजवर ऐकू येत होता.

    मांगवाड्यातील बाया-माणसं शेतात भांगलाय गेली हुती. अन्‌ बंड्याच्या घरात बंड्या आज उजाडल्यापासनं एकसारखा पीत होता. बंडाची पत्नी भिकी रानात जायच्या विचारात होती. परंतु बंडाचा आजचा उग्र अवतार पाहून तिने रानात जायचं नाही असे ठरवले. स्टेजवर गावातली म्हातारी माणसं सावली बघून आडवी पडली हुती. एवढ्यात मांगवाड्याच्या दिशेने गोंधळ, गोंगाट ऐकू येऊ लागला. थोड्याच वेळात पावलांचा आवाज आला. पाठोपाठ आरडा ओरडा.

    स्टेजवरल्या एक दोन म्हातार्‍यांनी उठून कानोसा घेतला. बघतात तो बंड्या हातात सुटलेले कागद घेऊन पळत होता अन्‌ पाठीमागून बायकू, पोरगं पळत हुतं. त्यांच्या मागनं मागंवाड्यातली १०-२० पोरं पळत होती. ती समदी १० वर्षापर्यंतची होती. गंमत म्हणून ती मागनं पळत हुती. बंडा जोरात पळत सुटला त्येच्या पोराला सोनबानं विचारलं, अरं शामा, का म्हणून बाच्या मागनं पळतोयास?'

    'अवो आमच्या बानं औषधाच्या पुड्या घेतल्या. आई घरात नव्हती अन्‌ ह्यो पळायला लागलाय. ते ऐकताच सोनबाने, धोंडीतात्या, भैरू आप्पांना उठवले. काठ्या टेकत टेकत पोरांच्या मागनं ती बी चालू लागली. इकडे बंडा जोरात पळत होता. त्याच्या हातातले कागद दिसत होतेच. उन्हाचा पारा चढत होता. चिवटोकाचा डोंगर वडगावपासून दीड मैलाच्या अंतरावर होता. त्याच दिशेने बंडा पळत हूता. पायात चपलाभी नव्हत्या. ९ वर्षाचा शामा ओरडते बाला म्हणता होता. दादा मागं फिर, माझं पाय लय भाजत्यात, दादा मला सोडून कुठं चाललास?" बंडाला त्याचे आर्त अन्‌ केविलवाणे शब्द ऐकू येत नव्हते. दुर्देवाने गावातली कोणी तरणी माणसं हजर नव्हती. मैलाचं अंतर, रणरणतं उन्ह, रस्त्यावरचा फोफाटा, पळणाऱ्याच्या पायाचा दणादण आवाज उन्हाच्या रखरखीत झळात विरघळत होता. शिवारातली माणसं आपल्या कामात गुंग होती.

    रस्त्याकडच्या एक-दोन बाया-बापड्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण बंडा त्यांना न जुमानता पळत चिवटोकाकडे जात होता. पूर्ण चढाचा रस्ता, चिवटोकाच्या डोंगराच्या पायथ्याला परूस, दोन परूस उंचीचा एक भला मोठा काळा पत्थर हाय त्याला सर्वजण ‘काळा धोंडा’ म्हणतात. चोऱ्यावरून इंदोळीकडं जाणारा डांबरी रस्ता बंडानं पार केला. अन बंडाच्या पळण्याचा वेग कमी झाला. त्याच्या तोंडाला फेस येऊ लागला. कसातरी तो काळ्या धोंड्यापर्यंत पोहचला. त्याच्या भल्या मोठ्या सावलीत येताच तो मटकन खाली बसला. बसला कसला पडलाच. त्येला चक्कर आली. भिकी व ९ वर्षाचा शामा सर्वांच्यापुढे पळत होते. आईच्याबी पुढे पायाला चटक बसत असताना, पायाला फोडं आलं असताना बापाच्या वडीनं पोरगं पळत हुतं. रडत हुतं तोंडानं दादा, दादा थांबा असं म्हणत होतं.

    रस्त्याकडंची शेतातली माणसं त्या २०-२५ जणांचे ते पळत असलेले लेंडार पाहून त्यांच्या मागून काय झालं म्हणून पळू लागली. त्यामध्ये अंदा पैलवानही होता. त्या सर्वांचा रोख काळ्या धोंड्याच्या दिशेने होता. म्हातारी माणसं काय झालंय न काय नाही म्हणून चटाचटा पाय उचलत होती. इकडे काळ्या धोंड्याखाली पडलेला बंडा हात पाय झाडू लागला होता. तोंडातून फेस बाहेर येत होता. एवढ्यात पोरगं शामा त्याच्याजवळ गेलं अन्‌ दादा असं काय करतूयास म्हणून रडू लागलं. बंडाला हलवू लागलं, 'दादा, माझ्या संग बोल की, माझ्या पायाला बघ कसं फोड आल्यात. त्याच लक्ष बाच्या तोंडाकडं गेलं अन तो वडिलांना मिठी मारून रडू लागला. तोपर्यंत शेतात राबणारी पंचविशीतली पोरे बंडाजवळ येऊन पोहाचली. बंडाची पत्नी भिकीही आली.

    बडा पाणी पाणी करीत होता. अंदा पैलवानानं ते ऐकलं, अन तो पळतच जवळच्या दगडाच्या खाणीत गेला. पाण्याला भांड नव्हतं म्हणून त्याने लुंगी सोडली होती. पाण्यात भिजवली व त्याच पावली काळ्या धोंड्याकडं पळू लागला. तोपर्यंत धोंडीतात्याच्या पोरानं वैरणीला आणलेली बैलगाडी बिगी बिगी जुपली. अंदानं एका हाताने तोंडाचा फेस काढला. अन्‌ भिजवून आणलेली लुमी. हळूहळू बंडाच्या तोंडात पिळली. त्याबरोबर पाण्याची एक धार बंडाच्या तोंडात पडली. त्यो घोट बंडा प्याला. अदानं थोडसं पाणी बंडाच्या तोंडावर मारलं. जुंपलेल्या बैलगाडीत बंडाला घालताना त्याचा पोरगा शामा ओरडत व्हता, 'दादा, असं काय करतूयास, मी नाही त्याला नेहू देणार. दादा, दादा, माझ्यासंग बोल की' बायकू भिकी ऊर बडवून घेत होती. बंडाच्या मिटलेल्या हातातले कागद अन्‌ एक बाटली अंदानं काढली तर त्या ढेकणं व उंदीर मारण्याच्या रिकाम्या पुड्या व दारूची रिकामी बाटली हुती.

    गाडी कासराभर अंतरावर गेली नसलं तवरच बंडानं मान टाकली ती कायमचीच. काळ्या धोंड्याच्या सावलीत तो पडला ते कायमचाच विसावा घेण्यासाठी. पोरंग रडत हुत अन्‌ आईस म्हणत हुत, 'आये, दादा का ग माझ्यासंग बोलला नाही? का म्हणून माझ्यावर रुसलाय? आये, तू का म्हणून रडतीयास?' भिकी बिचारी ओरडत होती. तिचा जोडीदार, तिला कायमचा सोडून गेला होता. भविष्यकाळ तिला भेसूर दिसत होता. भविष्यातील अंकुर तिला विचारात होता. अन्‌ (भिकी) रडत रडत पोराला म्हणत होती- ‘श्यामा, तुझा लाडका बा देवाघरी गेला रं, आपल्याला वाऱ्यावर सोडून कायमचाच’ अन्‌ ते चिमुरडं पोरगं बापाच्या अंगाला मिठी मारून म्हणत होतं, ‘आये मी आता दादाला कुठं बी सोडणार नाय, मी आता दादा जाईल तिकडं जाणार’.

    अन्‌ भिकीनं त्याच्या तोंडावर हात फिरवला अन म्हटली, नगं र माझ्या सोन्या असं बोलूस, आता तूच माझं सारं काय हायस, तुझ्यासाठी वाटेल ते मी करीन. अरं तुझा बा दारूडा असला तरी तू शिकावस, मोठं व्हावस अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी मी आता वाटेल ते कष्ट करीन. पण सोन्या मी तुझी शाळा पुरी करीन'.

    अरं सोन्या तुझा बा लई चांगला हुता. अक्शी देवमाणूस पण कुणाच्या संगतीनं दारूसारखी अवदसा घरात शिरली अन्‌ सोन्यासारख्या संसाराची त्या दारूच्या आगीत पाक राखरांगोळी झाली. पोरा, पाक राख झाली… अन्‌ त्याला मिठीत घेऊन भिकी रडू लागली

    आईचं डोळं पुसत छोटासा शाम रडत रडत म्हणू लागला, ‘आये, आये तू रडू नगस, मी दादाची शपथ घेऊन सांगतो, मी शिकून मोठा होणार. दारूसारख्या व्यसनाला कधीही शिवणार नाही.'

    छोट्याशा पोराचं बोल ऐकून भिकीने त्याचे पटापट मुकं घेतले अन्‌ म्हणाली, ‘शामा, अर तुला जे श्यानपण सुचलं ते जर तुझ्या 'बा' ला सुचलं असतं तर तर आज तू पोरका झाला नसतास… '

-प्रा.दिलीपकुमार मोहिते
मु.पो.वडगाव (उंब्रज) ता.कराड, जि.सातारा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या