Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

भावी शिक्षकांची व्यथा... | मनिषा शिंगाडे

भावी शिक्षकांची व्यथा, मनिषा शिंगाडे,मराठी कविता, Manisha Shingade, Marathi Kavita

        अडाणी आई-वडीलांनी
        हलाखीच्या परिस्थितीत आम्हाला
        शाळेत धाडलं
        शिकून मोठं व्हावं आणि
        चांगल जीवन जगता यावं
        म्हणून आई-बाबांनी खूप कष्ट उपसलेत
        आमच्या शिक्षणासाठी लोकांचे बांध ओ धुंडलेत…

        कितीतरी दिस ते उपाशी राहिलेत
        त्यांच्या कष्टाचे मोल होऊ द्या,
        त्यांच्या रक्ताच पाणी पाणी झाले
        त्यांची स्वप्न मातीमोल झाली
        भरायला नाही कुणी, 
        आमच्या आयुष्याचे प्रश्न सांडलेत
        आमच्या शिक्षणासाठी आई-बाबांनी
        लोकांचे बांध ओ धुंडलेत…

        सांगू किती त्रास होतोय आम्हाला
        सुशिक्षित बेरोजगार म्हणून घ्यायला,
        जीवन जगण्यासाठी काम नाही पैसा नाही, 
        दोन वेळची भाकर नाही
        मौज मजा तर राहू द्या 
        पण दोन वेळचं अन्नच मिळणं 
        कठीण झालंय ओ 
        तुमच्यासमोर किती प्रश्न मांडलेत
        आमच्या शिक्षणासाठी आई-बाबांनी
        लोकांचे बांध ओ धुंडलेत…

        आमचं काम आहे मुलांना शिक्षण देणं
        समाज घडविण्याचं पवित्र काम
        हे पवित्र कार्य आमच्या हातून होऊ द्या
        "ज्ञानदान हे श्रेष्ठ दान आहे"
        नको आम्हाला कोणतंही मंदिर
        फक्त 'विद्यामंदिर' द्या,
        आम्ही हेच गार्‍हाणे मांडलेत…
        आमच्या शिक्षणासाठी आई-बाबांनी
        लोकांचे बांध ओ धुंडलेत…

        वेळ आली आहे आई बाबांना
        सावरण्याची, त्यांची जबाबदारी घेण्याची
        (आमची शोकांतिका)
        पण त्यांनाच आम्हाला सावरावं लागतंय,
        मन आमचं आणि आर्थिक जीवन सुध्दा
        ढासळलंय,
        आत्ता डोळ्यातून अश्रुही सांडलेत.
        आमच्या शिक्षणासाठी आई-बाबांनी
        लोकांचे बांध ओ धुंडलेत…

        - मनिषा भागवत शिंगाडे
        (मु.थदाळे, ता.माण, जि.सातारा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या