Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

निसर्गाचा समतोलः एक मंथन | दिपाली अष्टुरे हिमगिरे

Nisargacha Samtol, Dipali Ashture- Hingmire,

मागील वर्षभरापासून आपण सर्वजण कोरोनासारख्या महामारीच्या विळख्यात अडकलेलो आहोत. संपूर्ण जगावर या विषाणूच्या थैमानाने कित्येकांचे बळी गेले, कुटुंब उध्वस्त झाली, कित्येक मुलं पोरकी झाली. आईवडीलांविना शेतकरी, मध्यमवर्गीय रोजंदारीवरील मजूर या सर्वांची आर्थिक विवंचना सुरू झाली ती आपल्या जीवनात लॉकडाऊन हा शब्द आल्यामुळे. एक दुसरी बाजू म्हणजे सरकारी ध्येय धोरणाद्वारे लॉकडाऊन हा कोरोना आजारावर मात करण्यासाठी एक यशस्वी प्रयोग ठरला. यामध्ये शासकीय यंत्रणेचीही तितकीच ससेहोलपट झाली. डॉक्टर, पोलीस, महसूल विभाग, आरोग्यसेवक, परिचारिका, सफाई कामगार या सर्वांच्या अथक परिश्रमाने आपण कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलो.

        २२ मार्च २०२० रोजी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित झाला व आपल्या सर्वांचे जीवन एका नव्या वळणावर स्थिर झाले आणि यातून मानव कुटुंबाबाबत जोडला गेला, ग्रामीण भागात आपल्या गावी परतला. वर्कफ्रॉम होम या माध्यमातून का होईना त्याचे जीवन गतिमानतेपासून एका ठिकाणी स्थिर झाले. काही काळ का होईना तो कुटुंबाबाबत आनंदी क्षण घालवू लागला. या सर्व घडामोडी सोबत मागील वर्षात आपला शेतकरी बांधव मात्र नित्य नियमाने शेतीच्या कामात व्यस्त असताना कधी अतिवृष्टी, तर कधी महापूर, तर कधी शेतीमालाला भाव नसणे या चिंतेत ग्रासलेला.

        मा‍झ्या पाहण्यातील एका शेतकरी कुटुंबाची व्यथा आपल्यासमोर मांडते. लॉकडाऊनचा काळ सुरू होता. मा‍झ्या नणंदेचा मुलगा म्हणजे माझा भाचा. त्याचे नाव मन्मथ, वय अवघे २७ वर्षाचे. ऑगस्ट महिन्याचे दिवस. नित्याने शेतीच्या कामासाठी आई, वडील, गरोदर पत्नी, तीन वर्षाचा मुलगा यांच्या समवेत मूग कापणीसाठी शेतावर गेला होता. शेतात कामावर काही मजुरीने लावलेल्या महिलाही कामात मग्न असताना अचानक त्याच्या आईस एक साप दृष्टीस पडला. लगेच तिने आपल्या मुलाला व पतीला बोलावून घेतले व त्या सापाची शोधाशोध सुरू झाली. असे असताना साप मात्र हुलकावणी देऊन मुगाच्या कापणी केलेल्या काडाच्या ढिगार्‍याखाली दडी मारून बसला. साप सापडत नसल्याने परत सर्वजण आपापल्या कामाला लागले व जो तो आपल्या कामात गुंतला. मन्मथ गाईसाठी गवत कापत होता. त्याच्या डोक्यात सापाची जराशीही संकल्पना शिल्लक राहिली नव्हती. तोच क्षणार्धात त्याच्या पायाला त्या विषारी सापाने चावा घेतला. मग काय सर्वांचीच तारांबळ उडाली त्याच्या आक्रोशाने. त्याच्या पायात सापाचे विष चढू लागले. तो विव्हळू लागला,एकदम पायात अग्निज्वाला चढत असल्याची जाणीव होताच तो काही अंतरावर जमिनीवर पडला. त्याने लगेच भ्रमणध्वनीद्वारे त्याच्या नातलगांना संपर्क साधून ही बातमी दिली व त्याला तिथून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी त्वरित हलविले गेले. तिथे वेळीच प्राथमिक उपचार सुरू झाले व त्यानंतर खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले व तिथे योग्य उपचाराने मृत्युच्या विळख्यातून तो बाहेर पडला. आठवडाभराच्या उपचारानंतर तो त्याच्या कुटुंबात सुखरूप परतला.

        सर्वसाधारण कुटुंब, परिस्थिती जेमतेम असताना त्या शेतकरी कुटुंबाची शारीरिक, आर्थिक, मानसिक वाताहत झाली. वैद्यकीय उपचार त्वरित मिळाले व आर्थिक मदतही मिळाली नातेवाईकांकडून. परंतु ही घटना त्यांच्यासाठी शाप की वरदान म्हणावी. एकुलता एक मुलगा, आई, वडील, गरोदर पत्नी, तीन वर्षाचा मुलगा या सर्वांचे छत्र हरपण्याजोगी वेळ होती. म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असंच काहीसे त्या शेतकरी तरुणाच्या बाबतीतही झाले.

        ही घटना सांगण्या मागचा एकच उद्देश हाच आहे की, दरवर्षी अशा काही घटना घडतात. दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, शेतीमालाला भाव नसणे या सर्व घडामोडीत मा‍झ्या बळीचाच का बळी जावा. शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणतो आपण. काळ्या मातीत प्रामाणिक कष्ट करून सोने पिकविणार्‍या या मा‍झ्या बळीराजाला खर्‍या अर्थाने कधी न्याय मिळेल. कधी सावकारी कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या तर कधी अतिवृष्टी, पिकांचे नुकसान झाले, त्यातही मुलांचे शिक्षण, लग्न या विळख्यात तो स्वत:च्या जीवाची बाजी लावतो व एक दिवस कंटाळून आत्महत्या करतो. कधी नैसर्गिक आपत्तिने म्हणा तर कधी शेतीत प्रामाणिक कष्ट करीत असताना अशा प्राण्यांच्या दंशाने कित्येक निरपराध शेतकर्‍यांना जीव गमवावा लागला याची खंत वाटते.

        पण या सर्व घटनांमागे आपण सर्वजण कुठे ना कुठे जबाबदार आहोत. शहरी भागात वृक्षतोड करून निसर्गाचा समतोल बिघडला तो शहरीकरण, औद्योगिकरणामुळे मानवाने २१ व्या शतकात पदार्पण केले आहे, तो संगणक युगात रममाण आहे, याचे सर्व काही फायदे असले तरी तो दैनंदिन जीवनात व्यायाम, कसरती, खेळ, निसर्ग यांना कुठेतरी मागे सोडतोय. निसर्गाचा समतोल बिघडत आहे तो आपल्यामुळेच…आपण पर्यावरण दिनानिमित्त फक्त झाडे लावा, झाडे जगवा घोषणा करतो. व्हाट्सएप, सोशल मिडिया या सर्व माध्यमातून जनजागृती करतो, पण अंमलबजावणी फार कमी पडते. एखादे झाड लावणे सोपे आहे पण ते जगले पाहिजे, वाढले पाहिजे यासाठी कुणीही धडपडत नाही. मागील महिन्यात आपण वर्तमानपत्रातून महापूराच्या घटना पाहिल्या. अतिशय र्‍हदयद्रावक घटना होत्या. सर्वत्र महापूराने थैमान घातल्याने सर्व गावेच्या गावे उध्वस्त झाली. दरड कोसळणे, महापूर, धरणाचा बांध फुटणे या सर्व घटनांमागे निसर्गाचा समतोल ढासळलेला दिसून येतो. तसेच एखादा विषाणू यावा व आपल्या सर्वांचे जन जीवन थांबावे अशी आपण कल्पनाही केली नसेल. नवनवीन आजारांचा, विषाणूंचा शिरकाव होत आहे. मानवाची जीवनशैलीच बदलून गेली आहे.

        या सर्व घटनामागे आपण कुठे ना कुठे जबाबदार आहोत असे वाटते. शेतकर्‍यांच्या समस्यांमागे दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, सर्पदंश या सर्वांचा निसर्गाच्या समतोलाशी संबंध येतो. आपण सर्वांनी शेतीच्या बांधावर पाणंद रस्त्यावरची सर्व झाडे तोडून नाला, कालवे काढले. प्राण्यांचे, पक्ष्यांचे निवारे संपुष्टात आले. कुठेही निवार्‍यासाठी एक झाड दृष्टीस पडत नाही. लांबवर गेले तरी कुठे एखादे वारूळ आज ग्रामीण भागात पहायला मिळत नाही. यात प्राण्यांचा काही दोष नाही. प्राण्यांवर आपण भूतदया दाखवली पाहिजे. आज आपण कित्येक सर्पमित्रांच्या मदतीने शेतातील, घरातील जिथे कुठे वन्यजीव सापडतील तिथे त्यांना सुखरुपस्थळी नेऊन सोडविलेले पाहतो. शेवटी त्यांनाही निवारा हवा असतोच. आपण त्यांची निवारे संपुष्टात आणली मग स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तेही निवारा शोधतात, मग यातूनच काही सर्पदंशाच्या घटना घडतात. उष्णतेच्या दाहकतेने अन्न, पाण्याच्या शोधात पक्षी, प्राणी बाहेर पडू लागतात व यांची घरटे, निवारे उध्वस्त झाल्याने ते पावसाळ्यात निवारा शोधू लागतात. मग निवारा शोधताना बळी जातो तो शेतकर्‍याचा.

        निसर्गाचा समतोल राखण्यास आपण काही अंशी का होईना प्रयत्न केल्यास कुठे ना कुठे या घटना कमी प्रमाणात पहायला मिळतील. निसर्गाचा समतोल राखूया व शेतकर्‍यांच्या तसेच मानवी जीवनातील समस्या थांबवूया तेव्हाच सर्वजण सुखी, निरामय, निरोगी, आनंदी जीवन जगण्यास सार्थक होऊ असे वाटते.

-   दिपाली अष्टुरे हिमगिरे
    महसूल विभाग (तलाठी)
    मो.नं.८४२१६२३६८८
    ता.धर्माबाद, जि.नांदेड

Parissparsh Publication  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या