Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

ओझं | मराठी कथा | डॉ.राजश्री पाटील

ओझं, मराठी कथा, डॉ.राजश्री पाटील, Dr Rajeshri Patil, Marathi Katha,

खिडकीच्या तावदानातून बाहेरचा शुकशुकाट अंगावर येणारा! स्टॅच्यू झालेले बाहेरचे जग बबनराव न्याहळत होते! वेताळासारखे मृत्यूचे सावट प्रत्येकाच्या मानगुटीवर! किती भयान शांतता! करोनाच्या जबड्यातून आपण नशीबानेच बाहेर पडलो नाहीतर त्याच्या मगरमिठीत जवळ जवळ संपलोच होतो. यमाचा रेडा समोर दिसत असताना हनुमान बनून 'संजीवनी गुटी' देणारी ती कोणी अज्ञात व्यक्ती! त्या अंतिम क्षणी शर्तीचे प्रयत्न करणारे ते डॉक्टरी देवदूत!

    भारीतल्या भारी औषधांना ही आपले शरीर रिस्पॉन्स देत नव्हते, तेव्हा डॉक्टरांनी प्लाझमा देण्याचा घेतलेला निर्णय…! त्यात आपला दुर्मीळ रक्तगट! जो कोठेच उपलब्ध नव्हता. शोधा शोधी, वणवण, समोर मृत्यूची टांगती तलवार, परिस्थितीपुढे शरणागती पत्करलीच होती जवळ जवळ… पण परत एक देवदूत धावून आला. ती प्लाझमारूपी संजीवनी गुटी स्वच्छेने देणारा. तीही गुप्तपणे!

    पोथी पुराणात वाचले होते, ऐकले होते. दान दिलेले या हाताचे त्या हाताला कळू नये. पण या कलियुगातही असे हे कर्ण अवतार आहेत? आणि तो एक असेल अवतार पण हे डॉक्टर लोकही इतके हरिश्चंद्रांचे अवतार! शब्दाला जागणारे, नाव न सांगणारे!! विचारांच्या भरलेल्या पोत्यात स्वत:चे खुजेपण, दुसर्‍याच्या उपकाराचे ओझे घेऊन बबनराव या कुशीवरून त्या कुशीवर वळले. समोर विलासने वाढदिवसाला दिलेली फोटोची फ्रेम आणि त्यातील दोघांचा हसरा फोटो. आवरलेले अश्रु पुन्हा ओघळू लागले. आपण भ्याड… कृतघ्न… स्वार्थी! त्यांच्या मनात आत्मवंचनेचा कड उसळला तसाच त्या कटू आठवणींचा समुद्रही! किती दृष्ट वागलो ना विलासशी? किती दुखावलं त्याला! एका दोस्तीमध्ये हा कोरोना घुसला. विलास प्रत्यक्ष नाही आला भेटायला. कसा येणार? आपणच भिंत उभी केली, इतक्या वर्षाच्या दोस्ती मध्ये. हा पण आपण ऍम्ब्युलन्स मधून उतरताना आडोशाला उभा राहून किती केविलवाण्या नजरेने आपल्याला पाहत होता. तेव्हा पाहिलं आपण! खरंतर गळाभेट घ्यावी वाटत होती, पण नाही धाडस झाले. आपणच कोसलो दूरचे अंतर वाढविले दोघांतील. ते कसे मिटवायचे? त्याच्या नजरेला नजर देण्याचे धाडस नाही. खरोखरच कसा विचार केला नाही ही वेळ आपल्यावरही येऊ शकते! तो जात्यात होता तेव्हा आपण सुपात होतो इतकेच! जीवश्चकंठश्च मित्र. आपला कित्येक वर्षाचा दोस्ताना, रोज ठरलेली बैठक, एकमेकांचे चेहरे पाहिल्याशिवाय आणि गप्पा मारल्या शिवाय चैन पडत नसायचा. पत्ते खेळणे, फिरणे, सुखदुःख किती किती शेअरींग दोघात. कोरोनाने प्रत्येकाला घरात डांबले तरी अंगणातून होणारी देवाणघेवाण, इशारे, बोलणे, फोनवरून होणारे संभाषण पण कैद सुसह्य करणारे! आणि एक दिवस समजते विलास करोना पॉझिटिव झालाय! तसे आपल्या मनातील विषाणू सतर्क व्हावा? त्याच्या घरातील विषाणू आपल्या घरात घुसेल या भीतीने त्याच्याशी संबंधच तोडला! मित्र म्हणून मदत करणे दूरच आपण लांब लांब राहू लागलो. एकदा दोनदा जुजबी फोनवर बोललो पण प्रत्यक्ष काहीही मदत केली नाही. कारण इन्फेक्शनची अवास्तव भीती! आठवडाभर ऍडमिट झाला. नंतर क्वांरटाईन झाला. त्यानंतर पूर्ण बराही झाला. पण तरीही आपली चार हात दूर राहून सावधान भूमिका! त्याला टाळतोय त्याच्या लक्षात आलं होत. त्या काळातील आपला बहिष्कार त्याने मोठ्या मनाने समजून घेऊन, दुर्लक्षित करून म्हणाला एकदा "अरे महिना झाला आता, घर तीन वेळा सॅनिटाईझ केलं. विसर तो करोना, आता सुरू होऊ दे दोस्तांना".पण फक्त हसून आपण हे फोनवरचे बोलणे ही आटोपते घेतलेले. जणू फोन मधून सुद्धा कोरोना घुसणार होता की काय ! विषाणूची संपूर्ण माहिती नसताना उगीच रिस्क कशाला घ्या हा सुज्ञ? का सेल्फिश विचार केला? पण आज आपण सुपातून जात्यात गेलो तेव्हा सगळं कळते. दोस्ताला जरी टाळलं तरी कुठून तरी तो घुसला मा‍झ्या शरीरातही! कदाचित माझे डोळे उघडायला, धडा शिकवायला! आत्मग्लानीची कडू गुळणी त्यांनी कशीतरी गिळली आणि त्यांना जोराचा ठसका लागला.

    विलासचा आवाज कानावर आधी मधी पडायचा. तेव्हा त्याला बोलवावे, त्याने यावे, संवाद करावा, गप्पा माराव्यात ही झालेली ऊर्मी ते आवरत होते. आता कोणत्या तोंडाने ही अपेक्षा करणार? रोज त्या प्लाजमा देणार्‍या उपकार कर्त्याबद्दल तो कोण असेल विचार करत रहायचे.

    सकाळची वेळ आणि विलासच्या घरातील मोठ्या आवाजाने बबनराव जागे झाले. लगबगीने बाहेर आले आणि बातमी ऐकून सुन्नच झाले. दारात ऍम्ब्युलन्स. रात्री विलासला अचानक दरदरून घाम सुटला, छातीत दुखू लागले म्हणून मुलाने लगच हॉस्पिटलला हलविले, पण काहीच उपयोग झाला नाही. पोस्ट कोव्हीड क्लॉट होऊन हार्ट अटॅक! विलासने जगाचा निरोप घेतला होता. बबनराव ते ऐकून सैरभैर झाले. त्यांना काहीच समजेना… करोनाची मनातील भिंत आणि खरीखुरी भिंत ओलांडून तरातरा पलीकडे धावले. त्याची क्षमा मागायची होती, कडकडून भेटायचे होते पण त्याआधीच त्याने इथून एक्झिट घ्यावी? आपल्याला रात्री बोलावले नाही… याची खंतही दाटून आली. समोर विलासचा निष्प्राण देह! आणि दुःखातिवेगाने रडत असलेल्या वहिनी आणि कोलमडलेला आकाश!

    बबनरावांना पाहताच वहिनींचा बांध फुटला,"तुम्हाला वाचवले आणि स्वत: मात्र…"रडता रडता नकळत त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले पण क्षणात भानावर येत त्यांनी ते आवरले. तरी‌ ते ऐकून स्तब्ध झालेल्या बबनरावांचे डोळे विस्फारले. म्हणजे विलासने‌ आपल्याला… त्यांना काहीच समजत नव्हते. त्यांचे डोळे फक्त प्लाजमा डोनरच्या पायावर खिळले होते. मन थिजले होते. अंग थरथरत होते. पश्चातापाच्या धगीत ते उभ्याच होरपळत होते. जाळायला नेणाऱ्या प्रेतापेक्षा ते स्वतःच जास्त जळत राहिले… अगदी आयुष्यभर…

- डॉ.राजश्री पाटील
मु.पो. खिद्रापूर, ता.शिरोळ
जि.कोल्हापूर, पिन-४१६१०२
-८०८८२११२५२
व्हाट्सअप नंबर ८८८४००६००९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या