ऋतू हा कधीच स्थिर नसतो. पण आपल्या वैचारिकतेला फक्त कल्पकतेचे लिंपण करून बघा... काय होईल? ऋतूराजाच्या शिरपेचातील असंख्य सौंदर्यात्मक, बोधात्मक, औदर्यात्मक तुरे क्रमाक्रमाने गळून जाऊन कल्पना विश्वात गडप होतील. हिरव्याकंच वनराईने अंथरलेल्या तृणांच्या पायघड्या... लावण्यमय मादक सौंदर्यात दंग होऊन समीरासमवेत दाहदग्ध गारव्याला, कवेत घेऊन डोलणाऱ्या अगणित झाडांची चैतन्यमय कुटुंबे... अत्तराची कुपीही ज्यांच्यापुढे न्यूनत्व स्वीकारेल असे विविध रंगी पुष्पांची मनोरम्य गंधबने. किती छान वाटेन हे सर्व काही असच राहिल तर... पण आजन्म अखंडित हे असेच राहिले तर ?
साधे कालचेच बघा! तनामनात नवचैतन्य रुजवणारा पाऊस! म्हणजे माझा जिवलग सखा... आवडता ऋतू. पाच ते सहा दिवसांपूर्वी मनांगणात सरींची सुगंधमय कलाकृती, प्रत्येक टपटपणाऱ्या थेंबातून अवनीच्या देहात्म्यावर रेखीव शिल्पाप्रमाणे तरंगमय वर्तुळाकार वलय रेखाटत होती. अंकुर संभवाच्या उद्देशाने! पावसात बेभान चिंब चिंब झालेली वृक्षराजाची प्रत्येक शाखा सृजन औत्सुक्यात मुळापर्यंत पावसाचा थेंब अन् थेंब पोहचवत होती. अधूनमधून पाऊस रूपांतरित होत होता. कधी नादमय शांतपणे पण हर्षाने बरसणारा, तर कधी विद्युलतेला सहसोबती बनून अतोनात बरसणारा. हे वर्षाचक्र न थांबता सातत्याने सुरूच होते. वाटा... पायवाटांचा ओलसरपणा ते पाण्याचे आवरण असलेल्या अस्पष्ट वाटा असा प्रवास पूर्णत्वास आला होता. मळभ दाटलेला नभोमंडप विलोभनीय तर कधी भयावह चित्रे क्षणोक्षणी चितारत होता. संध्या प्रहरी, रात्री आणि कदाचित उद्यासाठीही...
पण एवढं अखंड मळभीय चित्रालय कुणाला आवडत असेल? आनंद देत असेल? एकच एक गोष्ट मानवीय अंतर्मनात सातत्याने रुंजी घालत राहिली किंवा तोच तो पणा अंकित होत गेला तर त्याचे मूल्य, महत्त्व तितकेच प्रभावीपणे जाणवेल का? हा ही प्रश्न वैचारिक गुंता वाढवणारा आहे. यशाची पेरणी मागून पेरणी होत रहावी आणि आनंदाची उत्पत्ती होत रहावी. पण कुठवर? त्याचे खंडन होणे आवश्यक नाही का? भीतीचा स्त्रोत आंतरिक भयावह बिंबांकन झाल्याने होते याउलट सातत्याने हे बिंब मन:पटलावर प्रदीर्घ विराजमान होत राहिले तर त्याला नि:शंक लुळेपांगळेपण येऊन मरण पत्करावेच लागेल. पण भावनांची एवढी व्यापक संरचना कशी?
मनातील दडून ठेवलेल्या वृक्ष मुळांप्रमाणे वरून देहाचे, हावभावाचे कवच, चपलखपणे पांघरलेल्या, आंतरिक भावना अजबच! बरं अपूर्ण इच्छांची रांगोळी सत्यत्वात न्हावून जीवनांगणात वास्तविकपणे रेखाटली जावी, याकरिता आयुष्याचे कुरुक्षेत्र करून, पावलोपावली लढत राहतो. कधी... काही वेळा सूत्रधार सर्व सूत्र योग्य मांडून आपल्याला हवे तसे उत्तर देतो. पण पूर्णत्वास आलेल्या स्वप्नालयाचे मूल्य आपण किती दिवस जाणतो? तरीही तीच स्थिती अपूर्णत्वाची. आपला फक्त अर्जुनच होतो... अखेर पर्यंत... गोंधळलेला! असे का व्हावे?
भिंतीला पूर्णपणे रंगवलेल्या नंतर छान दिसावी... नव्हे तर तिला पडलेली पुसटशी दु:खमय चीर डोळ्यांतील अश्रूंना घायाळ करून जाते, पण बाकी रंगवलेल्या मोहक भिंतीचे काय? जर ती भेग अतिशय सचोटीने भुजवली तरी मन त्याच डागडुजीकडे! आणि भींतीला असंख्य तडा गेल्या तर?
काय करावे मनाचे
उगवतो नवांकूर
उषेतील किरणांना
औदासिन्याचा नूर
अपूर्णत्वाचा पूर्णत्वाकडे होणारा प्रवास... पूर्णत्वानंतरचा त्या गोष्टीला किंवा इच्छेला प्राप्त झालेला पूर्णविराम आणि होणारी नव इच्छांची निर्मिती... हे सर्वच पेच निर्माण करणारं! पण या अनुषंगाने सातत्याचा पुनर्विचार करता येईल.
ईप्सितांची सरिता
महासागर होते
प्राप्त झाले ते नको
न्यूनत्व मनी सलते
मानवी मनाच्या उत्खननात अनेकानेक अपेक्षांच्या, इच्छांच्या थरांचे प्रदेश सहजतेने प्राप्त होतात. सातत्यातील औदासीन्य हे इच्छांशी नक्कीच निगडीत आहे. अंतर्नाद हा सातत्यावर असो, औदासिन्यावर असो, अर्जुनासारख्या आंतरिक द्विधा स्थितीवर असो किंवा पूर्ण-अपुर्णत्वाच्या चढा ओढीचा असो... अंतर्नादाचै रूपांतर भावनिक स्थितीत व भावनिक स्थितीचे वलय मानवीय आयुष्यात वागण्यात प्रखरतेने जाणवतेच. अंतर्नाद घोंघावत राहतो... अविरत... प्रत्येक श्वासात!
मी आहे साद अंतरातील
डावलून मला जाल कुठे ?
- शालिनी बेलसरे,
अंजनगाव सुर्जी
अमरावती
0 टिप्पण्या